*ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात तिखट रस बळावतो*

*ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात तिखट रस बळावतो*

(संदर्भ - अष्टाङ्गसंग्रह १.४.६)

शरीराचे पोषण  होते आहाराने आणि आहार तयार झालेला आहे सहा रसांपासुन.औषधे सुद्धा ज्या विविध नैसर्गिक पदार्थांपासुन तयार होतात,त्यांना सुद्धा स्वतःचा असा रस असतो. गोड,आंबट,खारट,तिखट, कडू व तुरट हे ते सहा रस ,ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये ‘चव’ म्हणतो.

आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे,जे प्रत्येक ऋतुमध्ये निसर्गामध्ये आणि साहजिकच यच्चयावत सजीव पदार्थांमध्ये कोणत्या रसाचा (चवीचा) प्रभाव असतो व त्याचा शरीरावर-आरोग्यावर काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो याचा अभ्यास करते. इतकंच नाही तर  त्या-त्या रसाचा शरीरावर संभवणारा विपरीत परिणाम  कमीतकमी व्हावा,यासाठी त्याच्या विरोधात त्या-त्या विशिष्ट ऋतुमध्ये कोणत्या रसाचे सेवन आधिक्याने करावे, याचेही मार्गदर्शन करते. जसे की शरद ऋतुमध्ये (ऑक्टोबर हीट च्या दिवसांमध्ये) खारट रसाचा प्रभाव वाढतो,म्हणून त्याच्या विरोधात गोड रसाचे सेवन करण्याचा सल्ला, अर्थात यामध्ये तारतम्य महत्त्वाचे.

ग्रीष्म ऋतुमध्ये (एप्रिल-मध्य ते जून-मध्य या कालावधीतल्या उन्हाळ्यात) निसर्गतः तिखट रस बळावतो.हे घडते नैऋत्येकडून वाहून येणार्‍या तिखट चवीच्या वार्‍यांमुळे (वारे कोणत्या चवीचे असतात,हे आपल्या पूर्वजांना कसं समजत होतं किंवा आजही आपण ते कसं ओळखू शकतो हा मोठा प्रश्नच आहे) 

ग्रीष्मऋतु मधील हे वारे पाण्यावरुन वाहून येताना पाण्यामध्ये तिखट चवीचा प्रभाव वाढवतात.ते तिखट चवीचे पाणी वनस्पतींच्या मुळांकडून शोषले जाते,त्यामुळे वनस्पतीमध्ये सुद्धा तिखटपणा वाढतो.त्या वनस्पतींचे सेवन करणार्‍या प्राणिपक्ष्यांमध्ये सुद्धा तिखट रसाचा प्रभाव वाढतो आणि अंतिमतः त्या तिखट पाण्याचे प्राशन करणार्‍या व तिखट रसावर पोसलेल्या वनस्पती व प्राणीपक्ष्यांचे सेवन करणार्‍या मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा तिखट रस प्रबळ होतो.

ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात मानवी शरीरामध्ये होणार्‍या विविध बदलांमागे अनेक कारण असली तरी निसर्गात आणि पर्यायाने शरीरामध्ये वाढणार्‍या तिखट रसाचा प्रभाव हे सुद्धा त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे हा आयुर्वेदाचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यासला गेला पाहिजे.

ग्रीष्मातल्या या उन्हाळ्यात निसर्गतःच जर शरीरात तिखट रसाचा प्रभाव वाढत असेल तर त्यात पुन्हा तिखट खाल्ल्याने शरीरावर काय विपरीत परिणाम होतील याचा अंदाज तुम्हीं सूज्ञ वाचक करु शकता आणि "या कडक उन्हाळयात तिखट टाळा किंवा तारतम्याने खा" हा सल्ला आयुर्वेदाने का दिला हे सुद्धा समजू शकता.


( *ऋतुचर्या* या आयुर्वेद शास्त्राने मानवजातीला केलेल्या महत्त्वाच्या विषयाचे सर्वांगीण मार्गदर्शन करणाऱ्या वैद्य अश्विन सावंत लिखित *ऋतुसंहिता* या आगामी पुस्तकामधून)

*उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम होते का आणि ते का?*

*उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम होते का आणि ते का?*


तुमच्या घरात किंवा कार्यालयात सोबतच्या स्त्रिया  "किती उकडतंय, किती गरम होतंय, पंख्याचा वारा लागतच नाही, एसी लावा, एसी चे तापमान कमी करा..." वगैरे तक्रारी करत असतील तर त्यांमागे तथ्य आहे, स्त्रिया उगाच तसं बोलत नसतात.

सभोवतालच्या उष्ण तापमानाचा आरोग्यावर होणारा बरा- वाईट परिणाम अभ्यासताना असे दिसून येते की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री-शरीरावर उष्ण तापमान अधिक विपरित परिणाम करते.स्त्रियांवर उच्च तापमानाचा अधिक वाईट परिणाम का होतो,त्याचे स्पष्टीकरण देताना जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो असा.

पुरुष आणि स्त्रियांच्या पेहरावामध्ये-कपड्यामध्ये असणारा फ़रक हे स्त्रियांच्या शरीरावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातही भारतासारख्या ज्या देशांमध्ये  स्त्री-शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे घालण्याचा रिवाज आहे, तिथल्या स्त्रियांनी एकावर एक घातलेले अंगावरचे कपडे,(त्यात पुन्हा आधुनिक काळात हवेचे अजिबात आवान गमन (व्हेंटीलेशन) होऊ न देणारी जीन्स) आणि त्याखालील अन्तर्वस्त्रे यांमुळे शरीरा ला वारा लागत नाही आणि आतली उष्णता आतल्या आतच वाढत जाते.संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यांमुळे  बाह्य त्वचेला घाम निर्माण करून शरीराला थंड करण्याचा उपाय सुद्धा करता येत नाही (जिन्स मुळे तर अधिकच) त्यात पुन्हा स्वयंपाकघरात उष्णतेजवळ सरासरी दोन ते चार तास काम केल्यामुळे  वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्त्रियांचे शरीर अधिकच उष्ण होत जाते, जे विविध उष्णता जन्य विकारांना बळी पडू शकते.

उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते, यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे.शास्त्रीय कारणाचा विचार करता स्त्रियांच्या शरीरामध्ये त्वचेखाली असणारी अधिकची चरबी  त्याला जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्वचेखाली अधिक मात्रेमध्ये असणार्‍या  चरबीमुळे स्त्री-शरीराला  सौष्ठव व  सौंदर्य प्राप्त होते.हीच चरबी स्त्रियांच्या शरीराला अधिक ऊब देते. ऊब देण्याचा चरबीचा हा गुण  हिवाळ्यात उपकारक सिद्ध होत असला तरी उन्हाळ्यात मात्र शरीराला सहजी थंड होऊ देत नाही व स्त्री-शरीर उन्हाळ्यामध्ये तुलनेने अधिक गरम राहते.

एकंदरच उन्हाळ्याचा आणि उष्ण तापमानाचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम  होत असेल, याची पुरुषांना कल्पना सुद्धा करता येणार  नाही.मात्र त्याची कल्पना करुन, त्यामागील कारणे ओळखून त्यामध्ये बदल व्हायला हवा.

संस्कृतीला धक्का न लावता स्त्रियांना हवेशीर कपडे कसे मिळतील याची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातली उष्णता कशी वाहून जाईल व स्वयंपाकघर कसे हवेशीर होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे.महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी घरातल्या प्रत्येक सदस्याने उचलायला हवी.घरातल्या सर्वांच्या  उदरभरणासाठी अन्न तयार करणे, ही काही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही.

स्त्रियांनी सुद्धा पाणी व अन्य द्रवपदार्थ (चहा, कॉफी, मद्य वगळून) पित राहावं. केवळ दहा बारा ग्लास पाणी पिऊन चालत नाही, शरीरातून घटलेले क्षार व उर्जा मिळायला हवी. दिवसातून निदान एक शहाळ्याचे पाणी प्यावे. पाणी व थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करावे, जसे केळं, कलिंगड, काकडी, टरबूज, द्राक्ष,पेरू, वगैरे. दिवसातून एक तरी फळांचा रस प्यावा.

वैद्य अश्विन सावंत

Shashwat Ayurvedic Clinic

Mulund.

आरोग्य

भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, असे सतत ऐकायला-वाचायला मिळते; पण तरीही आपण जीवनशैलीत बदल करत नाही, हे वास्तव आहे. यावर बोट ठेवून डॉ. अश्विन सावंत यांनी ‘मधुमेह विरुद्ध आपण!’ या पुस्तकातून संपूर्ण माहिती दिली आहे. मधुमेहाचा धोका कोणाला, त्याची कारणे, लक्षणे, मधुमेह झाल्यावर शरीरात काय घडते, मधुमेहींनी काय खावे, काय टाळावे, इन्सुलिन म्हणजे काय हे त्यांनी पुस्तकातून समजावून दिले आहे. दूध व दुधाच्या पदार्थांच्या अतिसेवनाचे परिणाम, व्यापारी डावपेच, मैद्याचे अर्थकारण याचे गणित त्यांनी सोडवून दाखवले आहे. कोल्ड्रिंक्स, साखर, चहा, गोडाचा अतिरेक व त्याचे विविध वयातील परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. प्रौढ वयातील मधुमेह, पीसीओएस म्हणजे काय, लक्षणे, कारणे, अति इन्सुलिनचे परिणाम, मेटाबोलिक सिन्ड्रोम, मधुमेहाची पूर्वरूपे, गर्भारपणातील मधुमेह, मधुमेहासाठी आवश्यक प्रयोगशालेय तपासण्या, रक्तातील साखर कधी तपासावी, ती नियंत्रणात आहे का, मधुमेही हायपो का होतात, मधुमेहजन्य दीर्घकालीन घातक विकृती, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, मूत्रपिंडविकृती, मधुमेह आणि लैंगिक अकार्यक्षमता अशा अनेक मुद्द्यांवर या पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पुस्तक : मधुमेह विरुद्ध आपण!
लेखक : डॉ. अश्विन सावंत
प्रकाशन : नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे : २२०
मूल्य : २०० रुपये