*‘ काठपदर ‘ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.* *मळलेली वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण केलेले सुप्रसिद्ध अनुभवी नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांनी फ्रेंच लेखक जॅा झने यांच्या ‘द मेड’ या नाटकाचे केलेले मराठी भाषांतर म्हणजे ‘काठपदर‘ हे नाटक.शेक्सपियरसह अनेक युरोपियन नाटककारांच्या नाट्यकृतींचे भाषांतर करून प्रा. श्री दिलीप जगताप यांनी मराठी रंगसाहित्यामधे अर्थवाही भर घातली आहे. नाट्यजाणीवांची समृध्दी, सामजीक विसंगतीचे आकलन व ते मांडण्याचे समाजभान. पिडीतांच्या वेदनेने ठसठसणारी लेखनी व प्रगल्भ शब्दसंभाराने लगडलेले बुध्दीवैभव. हि जगताप यांची गुणवैशिष्टे त्यांची नाटके वाचताना, बघताना सहजच नजरेस येतात.*
*काठपदर बघताना यांसह सामजीक पाय-यांमधील वर्गभेदावर बोट ठेवलेले दिसते. शोषक आणि शोषित, भोगणारेच, पण एक दु:ख व दुसरा सुख भोगणारा.या दर्शनी संघर्षाबरोबरच बबी आणि छबी यांच्यात असलेली आपसातील असुया, आत ऐक व बाहेर ऐक.सार्वत्रिक स्वार्थी वृत्ती. मत्सर-जिवलगत्व जेंव्हा मला हवे ते घेते तेंव्हा मत्सर निर्माण होतो. अशा तिहेरी पदरांसह मानवी स्वभावांचे विविध रंग असलेल्या या दोधी लेखकाच्या रचनेचा परमोच्च बिंदु आहेत. सत्यात नाही तर कल्पनेच्याखेळात सर्व काही मिळवायचे. त्यातच जगायचे आणि…. मरायचे. स्वतःला हरवून टाकायचे. असा मानविय अंत:संघर्ष संपुर्ण नाटकभर धगधगत राहतो. यातून एक गडद हिंसक नाट्य लेखकाने अंत: प्रवाहीत केले आहे. जे दिग्दर्शकाने व कलाकारांनी बरोबर पकडून ताकदीने ऊभे केले आहे जे अंगावर येते.त्याच बरोबर शक्यतांचे, आशयाचे शेकडो माग लेखकाने नाटकात सोडले आहेत जे श्री. जगताप यांच्या इतर नाटकांतही दिसतात.*
*श्री.राजीव वेंगुर्लेकर यांनी आशयाच्या नव्या परिघांना स्पर्श करु पहाणारा हा प्रयोग दिग्दर्शीत केला आहे.लेखनातील घनगर्द अनंतार्थांच्या पारंब्या वेंगुर्लेकरांनी घट्ट पकडून त्यावर आपल्या सर्व कलाकार तंत्रज्ञांना हवे तसे वर-वर चढवत यशोवृक्षाचे शिखर गाठले आहे. त्यांनी वापरलेली चित्रभाषा, चित्रचौकटी मनमोहक व नाट्य पुरक होत्या. रंगावकाशाच भान आणि वस्तुपयोगीत्व विचार ऊल्लेखनीयच. श्री.दिलीप जगताप यांच्या लेखनातील अवघड वळण वाटांचा हा प्रवास वेंगुर्लेकर स्वत: ड्रायव्हिंग सिटवर बसून प्रेक्षकांसाठी आनंददायी करतात. *असे नाटक दिग्दर्शकासाठी प्रचंड आव्हान असते. पकडलेले बोट हातातून सुटून अर्थविहीन अंधारात भरकटण्याचा धोका असतो. मात्र वेंगुर्लेकर या घोड्यावर ठाम मांड ठोकून बसले व आपल्याला हव्या असलेल्या इप्सीत स्थळी प्रेक्षकांना घेऊन गेले.एक अतुलनीय नाट्यानुभुती देते झाले. **
*तीनही कलावतींच्या उत्कृष्ट अभिनयाने नाटकाला उंचीवर नेले.बबी आणि छबी झालेल्या दर्शना रसाळ व सोनाली मगर या दोघींनी तर आपल्या बोलक्या चेह-याने, डोळ्यांनी , शारीरभाषा व मुद्राभिनयाने दोन तास गारूड केले होते. या दोघींच्याही अभिनयाचा पोत वेगळा आहे. वाचीक अभिनयात वैविध्य आहे.एकच पात्र दोघी वेगवेगळ्या वेळी जगतात मात्र पोहचवणं ऐकीपेक्षा दुसरीचे भिन्न होते. एकीची सावली दुसरी-बहीण/वैरी.मात्र तरीही भिन्न कि अभिन्न .हि स्वतंत्र अस्तित्व रेषा व एकमेकींत विरघळणे या दोन अभिनेत्रींनी आपल्या अभिनय सामर्थ्याने स्पष्टपणे दाखवले आहे. त्यांच्यात तुलना करणे दोघींवरही अन्याय करणे होईल.या दोघींनी आपल्या रसपरिपोषक अष्टावधानी अभिनय गुणांनी नाटकाचे काठपदरच नव्हे तर संपुर्ण महावस्त्रच स्वर्णीम केलेय. बाईसाहेब झालेली मानसी तावडे-सावंत कमी कालावधीत आपले असणे नाटकभर पेरते.बबी आणि छबीच्या ठसठशीत व्यक्तीरेखाटनासमोर व जुगलबंदी समोर ठाम अस्तित्व दाखवते आणि हा सामुहीक अभिनयोत्सव पुर्ण होतो. दिग्दर्शकाने हाती दिलेल्या पारंब्यांवर कलाकार मन:पुत सुर-पारंब्या खेळलेत. विशेषत: बबी आणि छबीचे प्रेक्षकांना आपल्या सोबत या खेळात सातत्याने खालीवर- वरखाली घेऊन जाणे-येणे,परत आनणे. नंतर प्रेक्षकच त्यांची अंगुली धरून घेतात शेवट पर्यंत सोडत नाहीत. रौप्य पदक यापेक्षा छोटेच असावे.*
*नाटक हा सामुहीक अविष्कार आहे. बबीचे बसल्या बसल्या मरणे,ऋदय बंद पडणे हि कल्पना व पार्श्वसंगिताचे थांबणे कल्पक होते. प्रकाश योजना प्रसंगी स्वत:च बोलत होती. यात सारे आले. काठपदरचे वेगळी वाट चोखाळणारे ध्वनीसंकेत- प्रकाश- नेपथ्य- रंगभुषा- वेषभुषा या सर्वांगाने रंगलेला अभिनय संपंन्न प्रयोग काल बघायला मिळाला. सर्व संघाचे मन:पुर्वक अभिनंदन ! हे नाटक कथावस्तु शोधण्याचे नाटक नाही.निबीडातुन वेगळया पायवाटा शोधणारे नव्या युगाचे सांगाती असलेले हे नाटक आहे. हे अनुभवण्याचे नाटक आहे. ‘काठपदर’च्या या नाट्य प्रयोगाने हि सायंकाळ रंगप्रवासातील एक आनंददायी सायंकाळ म्हणून स्मृतीत मोहरबंद केली आहे.*
✍️ *राजेश टाकेकर*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*शेवटपर्यंत गुढतेचा अनुभव देणारे शब्दबंबाळ नाटक - काठपदर*
राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात गौरवले गेलेले, उत्कृष्ट प्रकाश योजनेचे पारितोषिक पटकावलेले *काठपदर* हे प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करणारे विलक्षण असे दोन अंकी नाटक आज मराठा मंडळाच्या रंगमंचावर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. पहिला अंक अक्षरशः डोक्यावरून गेला.परंतु दुसऱ्या अंकात पहिल्या अंकात पडलेल्या प्रश्नांची उकल होत गेली. छबी आणि बबी यांचा अंगावर येणारा अभिनय थक्क करणारा होता. तिन्ही स्त्री कलाकारांनी आपापल्या भुमिका ताकदीने निभावल्या. दोन वेळा लाईट गेल्यामुळे अडथळा निर्माण झाला तरी या कलाकारांनी आपले बेअरिंग अजिबात सोडले नाही. तिघींच्याही भूमिका कसदार होत्या.त्यांचा संपूर्ण रंगमंचावरचा वावर कधी गूढ,कधी भय,कधी विनोद, मत्सर, प्रेम, वैर,कधी हिंसक, अवघड संवाद...सर्व सर्व भन्नाट. विशेष भावली ती छबी....बहिणीचे केस सोडवून अंबाडे घालताना, लिपस्टिक,गजरे आवरताना, साडीची घडी घालताना, नेसवताना..... हाताने कृती करताना सराईतपणे अवघड संवादफेक कौतुकास्पद????
वेगळी वाट शोधायला भाग पाडणारी प्रा .दिलीप जगताप यांची विलक्षण कथा, दिग्दर्शक राजीव वेंगुर्लेकर यांचे अवघड कथा स्वतः समजून घेऊन आपल्या कलाकारांकडून जातीचा अभिनय करवून घेणारे नेटके दिग्दर्शन, सर्व कलाकारांचे भन्नाट अभिनय,अनोखे असे शिर्षकाला साजेसे... काठपदरी साड्यांचे आगळे वेगळे नेपथ्य, काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा समय,गोठविणारी थंडी दाखवताना केलेला धुराचा वापर, गूढता निर्माण करणारे पार्श्वसंगीत आणि संपूर्ण प्रयोगाला अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवणारी, मोलाचा वाटा असणारी प्रकाशयोजना यामुळे अत्यंत परिणामकारक असा वेगळी वाट चोखाळणारा दर्जेदार नाट्याविष्कार सादर झाला!
सौ. ऐश्वर्या ब्रीद
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी मराठा मंडळ मुलुंड, मुंबई येथे " लक्ष्मण झुला " थिएटर्स निर्मित * काठ पदर* या प़ा. दिलीप जगताप लिखित व श्री. राजीव वेंगुर्लेकर दिग्दर्शित नाटकाचा अत्यंत देखणा प़योग पाहण्याचा योग आला. राज्य नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावणारा हा नाटय प़योग पहाताना मुलुंडकर नाट्य रसिक खरोखरच मंत्रमुग्ध झाले होते. या प़योगाला नाट्य रसिकांची प़चंड उपस्थिती लाभली होती. प़ामुख्याने या नाटकातील तीनही महिला कलाकारांच्या भूमिका अत्यंत लाजवाब होत्या. या नाटकातील छबी, बबी,आणि बाईसाहेब या तीनही कलाकारांच्या भूमिका अप्रतिम!! व्यावसायिक कलाकारांपेक्षाही काकणभर सरस अभिनय, पाठांतर, मुद्राभिनय, अचूक टायमिंग या सर्वच बाबतीत हे तीन महिला कलाकार उत्तमच!! नाट्य दिग्दर्शक श्री. राजीव वेंगुर्लेकर यांचे सुरेख, सर्वोत्तम दिग्दर्शन ही या प़योगाची जमेची बाजू होती. शाम चव्हाण यांची प़काशयोजना म्हणजे जणू चौथा कलाकारच असल्याचे जाणवले. संगीतही तितकेच प़भावी व श्रवणीय होते. नेपथ्य सुद्धां फारच प़संगोचित व छानच होते.
मराठा मंडळाच्या रंगमंचावर एक आगळा - वेगळा परंतु देखणा नाट्य प़योग सादर केल्याबद्दल लक्ष्मण झुला थिएटर्स आणि श्री. राजीव वेंगुर्लेकर यांना मराठा मंडळाच्या विद्यमाने मन:पूर्वक धन्यवाद! प़योगाच्या शेवटी रसिकांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी निर्मात्यांनी उपलब्ध करून दिली होती. श्री. सुनील नाईक यांनी या प़योगासाठी सहकार्य करणारे मराठा मंडळ मुलुंड, मुंबई, श्री. अरविंद राणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुलुंड शाखा, श्री. कुमार सोहनी इ. चे आभार व्यक्त केले.
मराठा मंडळ मुलुंड मुंबई अध्यक्ष आदरणीय श्री. रमेशजी शिर्के
नृत्य, नाट्य, चित्रपट यांसारख्या प्रयोगीय कलांमध्ये नटाने आशयप्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय.
भरताने अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत : आहार्य, आंगिक, वाचिक, व सात्त्विक. या चार प्रकारांच्या विश्लेषणाने अभिनयकलेची अंगे स्पष्ट होतात : आहार्य अभिनयात नटाची कृती नसते. भूमिकेची ओळख पटण्यासाठी केलेली रंगभूषा, वेशभूषा व अलंकरण म्हणजेच आहार्य अभिनय होय. वस्तुतः ती नटाच्या भूमिकेच्या बाह्यांगाची सजावट होय. श्रीगणेश, दशानन यांसारख्या पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करीत. आंगिक अभिनय हाच भूमिकाप्रकटनाचा खराखुरा पाया आहे. हालचाली, अंगविक्षेप, हावभाव आणि चेहऱ्यावरील विकारदर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार. त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी कित्येक वेळा त्यांस उपकरणाची जोड देणे आवश्यक असते. आंगिक अभिनयातील लय आणि ताल यांची स्वाभाविक परिणामकारकता प्रतीत करून देण्याऱ्यासाठी नर्तिकेने पायात बांधलेले घुंगरू अथवा घेतलेली ओढणी यांसारख्या उपकरणांचाही आंगिक अभिनयातच अंतर्भाव करावा लागेल. भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी आंगिक अभिनयाला शब्दांची जोड देणे क्रमप्राप्त असते.
नटाने उच्चारलेला सार्थ किंवा ध्वनित शब्द म्हणजे वाचिक अभिनय. रंगाविष्कारकलेला काव्याची जोड मिळाल्यानंतर वाचिक अभिनयास अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूमिकचे प्रकटन करण्यासाठी नट कोणत्यातरी आदर्शाची नक्कल करीत असला, तरी ती नक्कल मूळ आदर्शाचे केवळ बाह्यदर्शन घडवावे या हेतून केलेली नसते. त्या आदर्शाचे सत्त्व व वैशिष्ट्य यांचे नटाला जे दर्शन घडले असेल, त्याचा प्रत्यय प्रेक्षकाला देऊन आपली अनुभूती परिपूर्ण करावी आणि प्रेक्षकाला आपल्या अनुभूतीत सहभागी करावे, असे सर्जनशील प्रयोजन त्याला अभिनयाद्वारे साध्य करावयाचे असते. यामुळे त्याला झालेले मूळ आदर्शाचे सम्यक ज्ञान हेच त्याच्या निर्मितीचे खरेखुरे स्वारस्य असते. अशा प्रकारच्या स्वारस्यमूलक भूमिकानिर्मितीच्या प्रयत्नाला ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा आहे. रामाची भूमिका करणाऱ्या नटाने रामाचे बाह्य रूप अथवा त्याचें शब्द यांच्याच द्वारा प्रेक्षकांना केवळ रामाच्या भूमिकेचा परिचय व त्याच्या कृतीचे व उक्तीचे संवाहन करण्यात समाधान न मानता, रामाचे व्यक्तिमत्त्व स्वतः समजून, ते पाहणाऱ्याला समजेल व उमजेल अशा रीतीने अभिव्यक्त करणे व त्याची प्रेक्षकांना प्रतीती देणे, हा सात्त्विक अभिनय होय. अभिनयाचा वापर प्रयोगीय कलांमध्ये होत असला, तरी प्रत्येक कलाप्रकाराच्या गरजा व मर्यादा यांनुसार त्या त्या कलाप्रकारातील अभिनयस्वरूपात फरक पडणे अटळ आहे.