अभिनय कला

नृत्य, नाट्य, चित्रपट यांसारख्या प्रयोगीय कलांमध्ये नटाने आशयप्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय. 

भरताने अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत : आहार्य, आंगिक, वाचिक, व सात्त्विक. या चार प्रकारांच्या विश्लेषणाने अभिनयकलेची अंगे स्पष्ट होतात : आहार्य अभिनयात नटाची कृती नसते. भूमिकेची ओळख पटण्यासाठी केलेली रंगभूषा, वेशभूषा व अलंकरण म्हणजेच आहार्य अभिनय होय. वस्तुतः ती नटाच्या भूमिकेच्या बाह्यांगाची सजावट होय. श्रीगणेश, दशानन यांसारख्या पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करीत. आंगिक अभिनय हाच भूमिकाप्रकटनाचा खराखुरा पाया आहे. हालचाली, अंगविक्षेप, हावभाव आणि चेहऱ्यावरील विकारदर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार. त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी कित्येक वेळा त्यांस उपकरणाची जोड देणे आवश्यक असते. आंगिक अभिनयातील लय आणि ताल यांची स्वाभाविक परिणामकारकता प्रतीत करून देण्याऱ्यासाठी नर्तिकेने पायात बांधलेले घुंगरू अथवा घेतलेली ओढणी यांसारख्या उपकरणांचाही आंगिक अभिनयातच अंतर्भाव करावा लागेल. भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी आंगिक अभिनयाला शब्दांची जोड देणे क्रमप्राप्त असते.

नटाने उच्चारलेला सार्थ किंवा ध्वनित शब्द म्हणजे वाचिक अभिनय. रंगाविष्कारकलेला काव्याची जोड मिळाल्यानंतर वाचिक अभिनयास  अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूमिकचे प्रकटन करण्यासाठी नट कोणत्यातरी आदर्शाची नक्कल करीत असला, तरी ती नक्कल मूळ आदर्शाचे केवळ बाह्यदर्शन घडवावे या हेतून केलेली नसते. त्या आदर्शाचे सत्त्व व वैशिष्ट्य यांचे नटाला जे दर्शन घडले असेल, त्याचा प्रत्यय प्रेक्षकाला देऊन आपली अनुभूती परिपूर्ण करावी आणि प्रेक्षकाला आपल्या अनुभूतीत सहभागी करावे, असे सर्जनशील प्रयोजन त्याला अभिनयाद्वारे साध्य करावयाचे असते. यामुळे त्याला झालेले मूळ आदर्शाचे सम्यक ज्ञान हेच त्याच्या निर्मितीचे खरेखुरे स्वारस्य असते. अशा प्रकारच्या स्वारस्यमूलक भूमिकानिर्मितीच्या प्रयत्‍नाला ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा आहे. रामाची भूमिका करणाऱ्या नटाने रामाचे बाह्य रूप अथवा त्याचें शब्द यांच्याच द्वारा प्रेक्षकांना केवळ रामाच्या भूमिकेचा परिचय व त्याच्या कृतीचे व उक्तीचे संवाहन करण्यात समाधान न मानता, रामाचे व्यक्तिमत्त्व स्वतः समजून, ते पाहणाऱ्याला समजेल व उमजेल अशा रीतीने अभिव्यक्त करणे व त्याची प्रेक्षकांना प्रतीती देणे, हा सात्त्विक अभिनय होय. अभिनयाचा वापर प्रयोगीय कलांमध्ये होत असला, तरी प्रत्येक कलाप्रकाराच्या गरजा व मर्यादा यांनुसार त्या त्या कलाप्रकारातील अभिनयस्वरूपात फरक पडणे अटळ आहे.

";