नृत्य कला

नृत्य’ ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन ह्या ललितकला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात.

सर्वच कला श्रेष्ठ आहेत आणि एकमेकांना पूरकही. पण आपण जेव्हा ‘नृत्य’ ह्या कलेच्या वेगळेपणाचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ‘नृत्य’ ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये इतर सर्व ललितकलांचा अंतर्भाव होतो. शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन ह्या कला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात.

सर्व कलांच्या मुळाशी असणारी स्थल, काल आणि ऊर्जा ही तत्त्वे, तसंच निसर्गात आढळणाऱ्या ऋतुचक्र, दिवस-रात्र ह्यातून म्हणजे पुनरावृत्तीच्या संकल्पनेतून निर्माण होणारे ‘लयतत्त्व’ हे अन्य कलांच्या मानाने गायन, वादन आणि नर्तनात प्रामुख्याने दिसते.

नृत्यकलेमध्ये ‘गायन’कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायन आणि वादन हे नृत्यकलेचे अविभाज्य घटक आहेत. 

शास्त्रीय नृत्य ह्या कलेचे नृत्त आणि नृत्य हे दोन भाग आहेत. त्यापैकी नृत्त म्हणजे शुद्ध नर्तन. गृहीत अशा स्थलावकाशात मानवी देहाचे शुद्ध नर्तनातून होणारे संचलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. ऊर्जा खेळविली जाते आणि त्याला जोड मिळते ती रेषासौंदर्याची आकार, पवित्रे आणि अमूर्त भावाची.

नृत्यात साहित्याचा नुसता आधार घेऊन, शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ पोहचविला जातो. आणि कधी कधी साधा आणि ठोस अर्थ वाटणाऱ्या साहित्याला नकळतपणे घनता प्राप्त होते. संगीताच्या बाबतीत ‘गायन’कलेतून प्रकट होणाऱ्या अमूर्त भावाला नृत्यकला मूर्त करते. आणि श्राव्य सुरांना दृश्यरूपात आकारून तयार होणारी मानवी देहाची शिल्पाकृती एक वेगळीच अनुभूती देते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नृत्यकलेत अन्य सर्व ललितकलांचा अंतर्भाव असूनही कुठलीही कला स्वतंत्रपणे डोकावत नाही, तर ह्या सर्व कला नृत्यकलेचंच एक अंग बनून जातात; सगळ्या कला सामावूनसुद्धा ‘स्वतंत्र अस्तित्व’ दाखविणारी अशी नृत्यकला म्हणूनच अतिशय संपन्न, समृद्ध आणि इतर कलांपेक्षा वेगळी ठरते. ‘शरीर’ हे साधन आणि ‘रेषा आणि आकार’ हे माध्यम असलेली नृत्यकला अन्य कलांच्या तुलनेत विविध मितींनी, विविध पैलूंनी सजली आहे ह्यात शंका नाही.