*ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात तिखट रस बळावतो*

*ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात तिखट रस बळावतो*

(संदर्भ - अष्टाङ्गसंग्रह १.४.६)

शरीराचे पोषण  होते आहाराने आणि आहार तयार झालेला आहे सहा रसांपासुन.औषधे सुद्धा ज्या विविध नैसर्गिक पदार्थांपासुन तयार होतात,त्यांना सुद्धा स्वतःचा असा रस असतो. गोड,आंबट,खारट,तिखट, कडू व तुरट हे ते सहा रस ,ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये ‘चव’ म्हणतो.

आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे,जे प्रत्येक ऋतुमध्ये निसर्गामध्ये आणि साहजिकच यच्चयावत सजीव पदार्थांमध्ये कोणत्या रसाचा (चवीचा) प्रभाव असतो व त्याचा शरीरावर-आरोग्यावर काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो याचा अभ्यास करते. इतकंच नाही तर  त्या-त्या रसाचा शरीरावर संभवणारा विपरीत परिणाम  कमीतकमी व्हावा,यासाठी त्याच्या विरोधात त्या-त्या विशिष्ट ऋतुमध्ये कोणत्या रसाचे सेवन आधिक्याने करावे, याचेही मार्गदर्शन करते. जसे की शरद ऋतुमध्ये (ऑक्टोबर हीट च्या दिवसांमध्ये) खारट रसाचा प्रभाव वाढतो,म्हणून त्याच्या विरोधात गोड रसाचे सेवन करण्याचा सल्ला, अर्थात यामध्ये तारतम्य महत्त्वाचे.

ग्रीष्म ऋतुमध्ये (एप्रिल-मध्य ते जून-मध्य या कालावधीतल्या उन्हाळ्यात) निसर्गतः तिखट रस बळावतो.हे घडते नैऋत्येकडून वाहून येणार्‍या तिखट चवीच्या वार्‍यांमुळे (वारे कोणत्या चवीचे असतात,हे आपल्या पूर्वजांना कसं समजत होतं किंवा आजही आपण ते कसं ओळखू शकतो हा मोठा प्रश्नच आहे) 

ग्रीष्मऋतु मधील हे वारे पाण्यावरुन वाहून येताना पाण्यामध्ये तिखट चवीचा प्रभाव वाढवतात.ते तिखट चवीचे पाणी वनस्पतींच्या मुळांकडून शोषले जाते,त्यामुळे वनस्पतीमध्ये सुद्धा तिखटपणा वाढतो.त्या वनस्पतींचे सेवन करणार्‍या प्राणिपक्ष्यांमध्ये सुद्धा तिखट रसाचा प्रभाव वाढतो आणि अंतिमतः त्या तिखट पाण्याचे प्राशन करणार्‍या व तिखट रसावर पोसलेल्या वनस्पती व प्राणीपक्ष्यांचे सेवन करणार्‍या मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा तिखट रस प्रबळ होतो.

ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात मानवी शरीरामध्ये होणार्‍या विविध बदलांमागे अनेक कारण असली तरी निसर्गात आणि पर्यायाने शरीरामध्ये वाढणार्‍या तिखट रसाचा प्रभाव हे सुद्धा त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे हा आयुर्वेदाचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यासला गेला पाहिजे.

ग्रीष्मातल्या या उन्हाळ्यात निसर्गतःच जर शरीरात तिखट रसाचा प्रभाव वाढत असेल तर त्यात पुन्हा तिखट खाल्ल्याने शरीरावर काय विपरीत परिणाम होतील याचा अंदाज तुम्हीं सूज्ञ वाचक करु शकता आणि "या कडक उन्हाळयात तिखट टाळा किंवा तारतम्याने खा" हा सल्ला आयुर्वेदाने का दिला हे सुद्धा समजू शकता.


( *ऋतुचर्या* या आयुर्वेद शास्त्राने मानवजातीला केलेल्या महत्त्वाच्या विषयाचे सर्वांगीण मार्गदर्शन करणाऱ्या वैद्य अश्विन सावंत लिखित *ऋतुसंहिता* या आगामी पुस्तकामधून)