- February 20, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – शिवजयंती उत्सव, २०२२
मराठा मंडळ मुलुंड या संस्थेच्या वतीने,१९ फेब्रुवारी सायंकाळी ६.४० वाजता शिवजयंती उत्सवकार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम साजरा झाला. संपूर्ण सभागृह शिवप्रेमींनी ओसंडून भरले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या परंपरेनुसार महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
मंडळाचे सहचिटणीस श्री.राजनजी भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
कार्याध्यक्ष श्री.महेशजी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्री . महेशजी चव्हाण आणि उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन डॉ. वारदराज बापट यांचं स्वागत केले.
कार्यक्रमाचे वक्ते डॉ. वरदराज बापट यांचे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्यावरील ओघवते विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण होते. मंडळाच्या विविध समित्यांमार्फत मंडळाचे काम उत्तमरित्या चालते. सर्व समिती कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करतात. अशा शब्दांनी त्यांनी मंडळाप्रती आदर व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर झालेल्या ‘पोवाडा’ आणि ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीतांमुळे छान वातावरणनिर्मिती झाली असे म्हणत मंडळाच्या हौशी कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. शिवरायांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की राजे हे उत्तम कीर्तनकार होते. तसेच संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. शिवरायांच्या प्रजा आणि सैन्य याबाबतच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी माहिती दिली. महाराजांनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले. आपण आपल्या पूर्वापार चालत आलेल्या सर्व रूढी परंपरा जपल्या पाहिजेत. सोशल मीडियावर येणारे धर्मविरोधी, परंपरा-रुढी विरोधी पोस्ट्स वर विरोध दर्शवून आपणही समाजाप्रती आपले निदान एव्हढे तरी दायित्व सिद्ध केले पाहिजे. या आणि अशा अनेक वक्तव्यांनी संपूर्ण सभागृह अगदी भारावून गेले होते.
युद्ध हे फक्त शस्त्रास्त्रांनी करायचे नसते तर ते वैचारिक दृष्ठ्याही करणे जरुरीचे आहे त्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी ज्ञानाची कास धरून सध्या प्रचलित असलेल्या मोबाईल, लॅपटॉप यासारख्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून ज्ञान वाढवावे. आणि उभ्या ठाकलेल्या वैचारिक युद्धास सामोरे जाण्याची गरज आहे. आता युद्धे आणि त्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे त्यामुळे काही लोक कशाचाही कुठलाही सन्दर्भ घेऊन वैचारिक तेढ निर्माण करून जाती जातीत भांडणे लावतात, अशाना देखील वेळीच उत्तर दिले पाहिजे.
शिवाजी महाराजांच्या किंवा त्या आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये तेंव्हा जात हा मुद्दाच नव्हता, त्यावेळी ज्ञाती म्हणजे ज्ञानावर आधारित वर्गीकरण होते त्यांना बारा बलुतेदार , अलुतेदार म्हणत, पण त्यामुळे दुही नव्हती तर सन्मान होता त्यांच्या कामाचा. इंग्रजी आक्रमणांनंतर हेतुपुरस्सर जात ही पसरवली गेली आणि मग भारतीयांमध्ये दुही पसरवण्यासाठी जात हा फॅक्टर वापरला गेला.भारत मधला भा हा ज्ञानाचा आहे, भावनेचा आहे, हे लक्षात घेऊन एक व्हा आणि छत्रपतींचे खरे स्वराज्य आणायला एक पाऊल पुढे करा.
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विषयीचे अतिशय गुढ व गुपित असे असणारे ज्ञान मा. डाॅ. बापट यांच्या वक्तव्यातुन श्रवण करणार्या अनेकांना प्राप्त झाले. या बाबत विचारमंथन करणेसाठी श्रवण करणार्या प्रत्येकांस प्रेरणा देणारे, प्रवृत्त करणारे, दिशादर्शक असे ओघवते विचार या निमित्ताने ऐकण्यास मिळाले.
श्री.हेमंत भोगले यांनी शिवजन्मावर आधारित स्वरचित पोवाडा श्री.अजय माने,सौ.चित्रलेखा शिंदे,सौ.ऐश्वर्या ब्रीद या सहकलाकारांसोबत आपल्या भारदास्त आवाजात सादर केला.
मराठी पाऊल पडते पुढे…हे गीत श्री.निलेश सुर्वे,श्री.हेमंत भोगले,श्री.रवींद्र शिंदे,सौ.मुण्मयी सुर्वे व कु.साक्षी ब्रीद यांनी अप्रतिम सादर केले.
सौ.शुभदा महामुणकर यांनी पाहुण्यांची करून देत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन उत्तम रित्या केले.
श्री. उदयजी दरेकर, श्री. हेमंतजी भोगले आणि श्री. विजयजी सुर्वे यांनी आपला बहुमुल्य वेळ देऊन, रंगमंचावरील पडद्यावर स्वहस्ते बनवलेली शिवमुद्रा आणि केलेली इतर अप्रतिम सजावट, सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होती. दर वेळी नवनवीन कलाकृती या कलाकारांकडून अपल्याला बघायला मिळते.
श्री.आत्माराम मोरे यांनी केलेली रंगमंचाखालील उत्कृष्ट सजावट, शिवाजी महाराज प्रतिमा सजावट निव्वळ अप्रतिम ….!
सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी मंडळाच्या प्रवेशद्वारी घातलेली रांगोळी प्रसंगाला अनुरूप आणि तितकीच नयनरम्य….!
सहचिटणीस श्री.राजनजी भोसले यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
मा. अध्यक्ष श्री.रमेशजी शिर्के आणि सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि पाठींबा तसेच कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती आणि सोबत सर्व समिती सदस्य यांनी केलेल्या उत्तम आयोजन आणि नियोजनामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाचा शिवजयंती उत्सव उत्तमरीत्या साजरा झाला.