- October 21, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कोजागिरी पौर्णिमेला स्थापन झालेल्या आपल्या मराठा मंडळाला ४३ वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने ४३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात, मंडळाच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीचे सरचिटणीस यांचे प्रास्ताविक आणि अध्यक्ष,कार्याध्यक्ष यांचे मनोगत भावनिक, हृदयस्पर्शी होतं. ४३ वा वर्धापनदिन साकारताना मंडळाचा आजवरचा प्रवास, सुरु असलेला कार्यकाळ याचा आढावा घेत पुढच्या प्रवासात कशी पाऊले टाकता येतील याची माहिती सादर करताना उज्वल भवितव्याचा सकारात्मक मानस कसा असेल हे सर्वांसमोर मंडळाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्यातर्फे जाहिर करण्यात आला.
सरचिटणीस माननीय श्री. अजय खामकर यांनी त्यांच्या प्रास्तावीकेत सद्यस्थितीत मंडळ अत्यंत बिकट अश्या आर्थिक अडचणीतून जात असून, या समस्येवर मात करण्यासाठी कार्यकारिणीने काही संकल्पना सभासदांसमोर मांडल्या आहेत. यापैकी कमीत कमी १०,००० रुपयांची बीन व्याजी ठेव योजना, तसेच कमीत कमी ५,००० रुपयांची देणगी, याशिवाय मंडळाच्या इमारतीचा काही भाग व्यावसायिक करून त्यातून उत्पनाचा मार्ग शोधणे, यावर कार्यकारणीचा विचार चालू आहे, यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असॆ प्रतिपादन केले.
कार्यध्यक्ष माननीय श्री. महेश चव्हाण यांनी, काळाच्या गरजेनुसार मराठा मंडळाच्या डिजिटलीकरण प्रक्रियेत सभासदांनी techno savvy आणि व्यवसायिक दृष्टिकोन ठेवण्याबरोबर उत्पनाचे विविध स्रोत निर्माण करून प्रत्येक सभासद कुटुंबीयांनी किमान पाच हजार रुपये मंडळास देणगी देऊन सध्याच्या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी मंडळास भरीव यॊग्यदान द्यावे, अशी कळकळीचे आवाहन केले. तसेच, आजच्या काळात संस्था चालवताना सर्व नियम अटी तसेच बदलती करप्रणाली याचा सखोल अभ्यास करणारी मंडळास मार्गदर्शक ठरणारी अभ्यासू आणि नवीन युवा पिढी मंडळास आगामी काळात वाटचाल करण्यास पुढे यावी असी अपेक्षा व्यक्त करीत मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थीत सभासद व कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश शिर्के यांनी ४३ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आपल्या संस्थेच्या दिवंगत ऋषीतुल्य मान्यवरांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन करून आजही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी संस्थापकांपैकी काही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सहवास व शुभाशिर्वाद ही आम्हा कार्यकर्त्यांची फार मोठी श्रीमंती आहे असा विश्वास व्यक्त केला. संस्थेमध्ये आत्मियतेने सहभागी होणारे तरुण कार्यकर्ते ,कांही मान्यवर व विशेषतः महिला वर्गाचा मिळणारा प़तिसाद, कलाकारांची अदाकारी हे सर्व पहाताना आपल्या मंडळाचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असल्याचा अभिमान वाटतो.
शासनाचे सर्व नियम पाळून ४३ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. आता सर्वत्र नीट सुरळीत सुरू होत आहे याची खात्री पटली. सभागृहातील वातावरण अत्यंत भारावलेलं होतं. २ वर्षांनी खऱ्या अर्थाने रंगमंचावरील पडदा उघडला गेला. कोविड संकटात सापडलेल्या आपल्या सर्वांनाच आज सूर गवसला. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आता पुन्हा नवी झेप घेण्याची उमेद आजच्या कार्यक्रमामुळे निर्माण झाली.
मध्यंतरा नंतर “आपण सारे गाऊ या! ” प़स्तुत ” स्वरगंध ” हा कार्यक्रम सादर झाला. सर्वच कलाकारांनी सादर केलेली गाणी श्रवणीय आणि नृत्ये नयनरम्य होती. जवळजवळ दीड वर्षानंतर रंगमंचासमोरचा पडदा उघडत असतानाची भावना शब्दात व्यक्त करणे खरच कठीण आहे. सौ. सोनाली कदम यांच्या नृत्य दिग्दर्शनात साकार केलेल्या सुंदर श्री गणेश वंदनेने झाली. सर्वोत्तम नृत्याविष्कार सर्व बालकलाकारांनी उत्तमप्रकारे सादर केला.
सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे रंगमंच एका आगळ्यावेगळ्या ढंगात सजला होता. कोजागरी पौर्णिमेच्या धर्तीवर काळ्या पडद्यावर असंख्य चांदण्यांमध्ये, कोजागरीचा धवल चंद्रमा खूपच शोभून दिसत होता.
श्री. अजय खामकर यांच्या मार्गदर्शनात रंगमंचावरील थीमला अनुसरुन केलेली ही सुंदर नयनरम्य सजावट श्री. उदय दरेकर आणि श्री. हेमंत भोगले या आपल्या हुशार नेपथ्यकारांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. या कार्यामध्ये जवळपास सर्वच गायक मंडळींनी मदतीचा हातभार लावला. ही सजावट अशी साकार झाली की एखाद्या चॅनलचा रिऍलिटी शो पहातोय की काय असा भास व्हावा.
गायनाचा हळुवार प्रवाह चंद्राची शीतलता धारण करत करत मधुर भावगीताच्या रुपाने सादर होत असताना मध्यंतरीच्या गाण्यातुन उंच भरारी घेत, उत्तरार्धात जोशात गाण्यासोबत थिरकत, नृत्य अविष्कार सादर करत सर्वांना आनंदाची पर्वणी देत छानपणे संपन्न झाला. श्री. निलेश सुर्वे यांची ध्वनी संयोजन आणि श्री. कृणाल शिंदे यांची प्रकाश योजना या कार्यक्रमाला चार चांद लावणारी ठरली. नेहमीप्रमाणेच प्रत्येकी एक एक कलाकाराचे भरभरुन कौतुक मराठा मंडळाकडुन आणि रसिकांकडुन झाले ही खुपच आनंदाची, समाधानकारक बाब वाटली.
आपण सारे गाऊयाचा संपुर्ण परिवार जेंव्हा सहभागी होतो तेंव्हाचा आनंद आणखी खरोखरचा द्विगुणित करणारा असतो. भरभरुन असलेल्या गुणी कलाकारांचा संच जेंव्हा तयार होत जाईल. तेंव्हाच ख-या अर्थाने मराठा मंडळाला भवितव्यात सर्वोत्तम सांस्कृतिक वारसा चालविणारी एक भरभक्कम फळी निर्माण करता येईल. यात शंका नाही. सर्व गायकांना सुंदर रंगमंच देऊन मंडळ मंडळ, प्रत्येक कार्यक्रमात कौतुकाची थाप पाठीवर देत गौरवांकीत करत असते.
मंडळाची कार्यकारिणी, सांस्कृतिक समितीचे कार्यकर्ते, त्यांना सर्वतोपरी मदत करणारे विविध समित्यांचे कार्यकर्ते, आपण सर्व गाऊया चे सर्व कलाकार, मंडळाचा कर्मचारी वर्ग या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. मोठ्या उत्साहाचा, रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा, प्रसन्न हास्यात डुंबवुन ठेवणारा ठरला. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फुर्तपणे डोक्यावर घेतले.
सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. आशाताई राणे आणि निमंत्रक सौ. ऐश्वर्या ब्रीद, त्याचबरोबर सर्व समिती सदस्य यांनी नियोजनपूर्वक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने या ४३ व्या वर्धापनदिनाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
‘आपण सारे गाऊया’ च्या सर्व कलाकारांचे उत्तम सादरीकरण, राजेश सावंत आणि नेहा सावंत या बहिण – भाऊ जोडीचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाजवाब होते. तसेच श्री. संतोष सावंत यांनी सादर केलेले अप्रतिम आभारप्रदर्शन कार्यक्रमाचा एक भाग होऊन गेले. या दर्जेदार,आनंददायी कार्यक्रमाचा समारोप सर्व कलाकारांनी रंगमंचावर एकत्र येऊन गायलेल्या राष्ट्रगीताने झाला आणि सर्वांना पुढील कार्यक्रमाचे वेध लागले.
वर्धापनदिंनाचा सोहळा हा मराठा मंडळाच्या प्रतिष्ठेला साजेसा झाला. सोहळ्याला चार चांद लावणाऱ्या सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नेहमीच हौशी आणि तरुण कलाकारांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या, नवनवीन संधी देऊन हौशी कलाकारांना उत्तेजन देणाऱ्या मंडळाच्या कार्यकारी मंडळास सर्व कलाकारांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा मंडळातील गुणवंत गायक कलाकारांचा शोध लागला! या क्षेत्रात मराठा मंडळाचा भविष्यकाळ निश्चितपणे उज्ज्वल आहे. याची खात्री पटली. सर्व कलाकार, सांस्कृतिक समिती, कार्यकारी मंडळातील उत्साही कार्यकर्ते या सर्वांचे भरभरून कौतुक व अभिनंदन…..!