*नर्मदे हर!!नर्मदे हर!!नर्मदे हर!!*
.
बुधवार दि.१२ ऑक्टोबर,२०२२ रोजी मराठा मंडळ,मुलुंड मुंबई येथे “नर्मदा परिक्रमा” हा सौ.रश्मीताई विचारे यांच्या एकटीने पायी चालत संपन्न केलेल्या नर्मदा परिक्रमेतील रोमांचकारी अनुभव कथनाचा विलक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सभागृह अध्यात्मिक वातावरणाने अक्षरशः भारून गेले होते.
.
नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा, इच्छापूर्ती साठी कुटुंबातील सदस्यांची केलेली तयारी, अचानक उद्भवलेल्या गुडघेदुखी वर केलेली मात ते संपूर्ण परिक्रमा संपन्न करण्यापर्यंतचा आंतरिक प्रवास अक्षरशः अंगावर रोमांच उठवणारा, प्रेरणादायी होता. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे, श्रद्धापूर्वक एकटीने पायी चालत विधिपूर्वक संपूर्ण परिक्रमा यशस्वीपणे संपन्न करणाऱ्या रश्मीताईंच्या चिकाटी,जिद्द आणि अविचल निष्ठेला शतशः प्रणाम!!
.
नर्मदा नदीची नर्मदा मैया आणि रश्मीताईंची रश्मी मैया कधी झाली आम्हाला कळलेच नाही. रश्मी मैयानी त्यांच्या गोड आवाजात, प्रासादिक वाणीने, सहज बोलण्यातून नर्मदा मैयाचे दर्शन घडविले.अगदी किलो मीटर, स्थळे, स्वामींची आज्ञा,वेळोवेळी मिळणारे संकेत,अश्रमांची नावे, प्रवासात भेटलेले संत-महंत,तिथले आदरातिथ्य, मनाच्या श्रीमंतीने काठोकाठ भरलेले नर्मदा काठावरील सेवाभावी लोक, अडचणीच्या वेळी कोणाच्याही रुपात दर्शन देणारी मैया अशा अनेक अनुभव,आठवणीनी नर्मदा मैयाला आपल्या ओघवत्या भाषा शैलीत प्रकट केले. परिक्रमा कशी असते, मैया कशी आपल्याकडून करून घेते,कशी परीक्षा घेते,लाड ही करते, माया करते हे सर्व ऐकताना आमचीही मानसिक परिक्रमा सुरू होती. आमच्यातील अध्यात्मिक दृष्टिकोन दृढ होत होता. हा सर्व प्रवास सांगताना त्यांचे मन नर्मदा मैयाच्या आठवणीने हळवे होत होते आणि ऐकताना आमच्याही डोळ्यांत भावपूर्णतेने अश्रू दाटत होते.
.
मंडळाचे अध्यक्ष आ.रमेशजी शिर्के काका यांच्या संकल्पनेनुसार आखलेल्या या कार्यक्रमात, रश्मी मैयांची मुलाखत घेणाऱ्या आमच्या सोनाली सावंत यांनीही योग्य आणि उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न विचारून, रश्मी मैयाना बोलते करून कौतुकास्पद कामगिरी बजावली.
ही अनुभव-अनुभूतीची अध्यात्मिक यात्रा अशीच पुढे सुरू रहावी असे वाटत होते. आपणही या परिक्रमेचा भाग आहोत असे वाटत होते. स्वतःच्या अंतरंगात स्वतःला तपासून पाहण्याची संधी मिळाली. अशा या जीवन समृध्द करणाऱ्या परिक्रमेने आमच्याही मनात अध्यात्मिक सकारात्मकता निर्माण केली. आम्ही किती भाग्यवान…. परिक्रमा केलेली नसतानाही प्रत्यक्ष परिक्रमेत आहोत अशी अनुभूती मिळाली. इच्छुकांच्या मनात परिक्रमा करण्याची ओढ निर्माण झाली. परिक्रमेचे धाडस करावे असे अनमोल मार्गदर्शन लाभले.
प्रत्येक इच्छुक माणसाची, नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आता पूर्ण होईल.
.
मंडळात एक अद्भुत, सुंदर असा सत्संग घडला….आम्ही अजून थोडे समृध्द झालो… !
.