- October 4, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
धर्मदाय सामाजिक संस्था संघटना स्थापन करण्यासाठी झालेली यशस्वी सभा
महाराष्ट सेवा संघ मुलुंड या संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध सनदी लेखापाल व निरुपणकार श्री. चंद्रशेखर वझे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या धर्मदाय सामाजिक संस्था संघटना स्थापन करण्यासाठी नुकतीच मुलुंड येथील मराठा मंडळ मुलुंड या संस्थेच्या सभागृहात २९ विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची एक सभा, दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी यशस्वीपणे संपन्न झाली.
महाराष्ट सेवा संघ व मराठा मंडळ मुलुंड या मुलुंड मधील दोन नामवंत संस्थांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यांत आले होते. या सभेला सेवानिवृत्त धर्मदाय आयुक्त श्री. शशिकांत सावळे, जेष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम, मालमत्ता कर मार्गदर्शक श्री. दिलीप जाधव, ठाणे मराठा मंडळाचे अध्यक्ष व निवृत्त शासकीय अधिकारी श्री. सुरेशराव सुर्वे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांबरोबरच मुंबई – ठाणे परिसराबरोबरच अन्य ठिकाणचे विविध संस्था प्रतिनिधी या सभेला आवर्जून उपस्थित होते. कोरोना परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक अडचणींची परिस्थिती याचबरोबर सामाजिक धर्मदाय संस्थांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या सभेत सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. या सभेचे मान्यवरांबरोबरच अन्य तज्ञ व संस्था प्रतिनिधी यांनी चर्चेत सहभाग घेतला. सर्वर्श्री शैलेश निपुंगे, राजेंद्र साळवी, सुभाष कुलकर्णी, मिलिंद आचार्य, अजय खामकर, श्रीमती नीलिमा जोशी, अमरजा चव्हाण , श्रद्धा देसाई, मंजुषा परब,. इ. नी. सहभाग घेऊन आपल्या समस्या मांडतानाच सर्व धर्मदाय सामाजिक संस्थाची संघटना असावी म्हणून आग्रहपूर्वक प्रतिपादन केले, आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त केले. या सभेमध्ये सर्व गोष्टींचा व्यापक स्वरूपात विचार करून संघटना स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट सेवा संघ व मराठा मंडळ मुलुंड या संस्थांचे अध्यक्ष व या संकल्पनेचे जनक श्री. चंद्रशेखर वझे यांचेवर जबाबदारी टाकण्यात आली. धर्मदाय सामाजिक संस्थांना प्रामुख्याने मालमत्ता कर, वीजबिल, पाणीबिल इ. गोष्टी शंभर टक्के माफ असाव्यात अशी प्रमुख व एकमुखी मागणी सर्वच वक्त्यांनी केली.
या सभेचे समयोचित सूत्रसंचालन श्री. विनोद सौदागर यांनी केले, तर प्रास्ताविक व संकल्पनेबाबत स्पष्टीकरण महाराष्ट सेवा संघ मुलुंड या संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. मराठा मंडळ मुलुंडचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांनी उपस्थितांना धन्यवाद देऊन आभार प्रदर्शन केले.