एक दिवसीय अभिनय कार्यशाळा

मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आयोजित ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळेला’ शिबिरार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद.
.
रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ मुलुंड येथे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेत ‘थिएटर बेसिक आणि भरपूर प्रॅक्टिकल्सने परिपूर्ण अशी ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. सदरच्या कार्यशाळेत ४० पेक्षा अधिक १५ ते ७५ वयोगटातील शिबिरार्थी सहभागी झाले होते.
.
अभिनय कार्यशाळेची सुरवात मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांच्या हस्ते मंडळाच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप प्रज्वलनाने झाली. मुक्तछंद नाट्यसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. संदीप गचांडे यांनी रंगदेवतेच्या मूर्तीला वंदन करत, हार-पुष्प वाहून व नारळ वाढवून अभिनय कार्यशाळेचा शुभारंभ केला.
.
सकाळी १० ते १२ चे पाहिले सत्र मुंबई विद्यापीठ, कलिना येथून नाट्यशास्त्रात पदवी संपादन केलेले नाट्यप्रशिक्षक, अभिनेते व दिग्दर्शक श्री. दिग्विजय चव्हाण यांनी घेतले. दुसरे सत्र ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्रात पदवी प्राप्त नाट्यप्रशिक्षिका व अभिनेत्री करिश्मा वाघ यांनी घेतले तसेच तिसरे सत्र नाट्यशास्त्रावर उत्कृष्ट पकड असलेले लेखक, दिग्दर्शक व अभिनेते सुयश पुरोहित यांनी घेतले. तिन्ही नाट्यप्रशिक्षकांनी सहभागी शिबिरार्थ्यांना रंगमांचाचे मूलभूत घटक, देहबोली, हावभाव, अभिनयाचे प्रकार, पात्र अभ्यास, शब्दोच्चार, आवाजाचा चढउतार व नवरसांची ओळख या विषयांवर उत्कृष्ठ व शिबिरार्थ्यांना खिळवून ठेवेल असे मार्गदर्शन केले. सहभागी शिबिरार्थ्यांनी देखील सदरच्या कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे खूप काही उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण शिकायला मिळाल्याचे सांगत आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त केले. 
.
सदरच्या अभिनय कार्यशाळेचे सूत्रसंचालन मराठा मंडळाचे सांस्कृतिक विभाग सदस्य  श्री. संतोष सावंत यांनी उत्कृष्टपणे केले. श्री. उदय दरेकर यांच्या सहकार्याने आणि मराठा मंडळाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रश्मी राणे व निमंत्रक सौ. ऐश्वर्या ब्रीद तसेच मुख्य कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळेचे आयोजन, नियोजन उत्तमरित्या करण्यात आले. तसेच मुक्तछंद नाट्यसंस्थेच्या वतीने सिद्देश बागवे, नितेश पाटील व सोनल चव्हाण यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली. केलेला वाव देणारे असे उपक्रम पुढे भविष्यात सातत्याने राबविणार असल्याचे मनोगत मराठा मंडळचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांनी व्यक्त केले. सहभागी शिबिरार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी झाल्याचे प्रमापत्र देत सदरच्या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
.
मुक्तछंद  नाट्यसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. संदीप गचांडे यांनी उपस्थित शिबिरार्थ्यांना संस्थेची, संस्थेच्या आजवरच्या उपक्रमांची व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसे मुक्तछंद नाट्यसंस्थेच्या ५ ते १५ वर्ष या वयोगटासाठी घेतली जाणारी नियमित अभिनय कार्यशाळा व १५ वर्षांपासून पुढील वयोगटासाठी घेतली जाणारी नियमित अभिनय कार्यशाळा यांची माहिती दिली. उपस्थित शिबिरार्थ्यांनी मुक्तछंदच्या आगामी कार्यशाळेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आपली नावनोंदणी केली. लवकरच मुक्तछंद नाट्यसंस्था व मराठा मंडळ मुलुंड यांच्या सहयोगाने मराठा मंडळ येथे नियमित अभिनय कार्यशाळा सुरू करण्यात येणार आहे.
.