हेलेन केलर इन्स्टिट्यूट या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला सदिच्छा भेट
.
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित महिला मंडळाने, महापे, नवी मुंबई येथील हेलेन केलर इन्स्टिट्यूट या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला सदिच्छा भेट दिली. महिला मंडळाच्या अनेक उपक्रमांमधील हा एक आगळावेगळा, स्फूर्तिदायक, खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला !
.
या विशेष मुलांची भावनिक आणि शारीरिक वाढ अतिशय सामान्य असते, परंतु उपजतच त्यांच्यात काही कौशल्ये असतात याची जाणीव त्यांच्यासोबत संवाद साधताना झाली. अंध, मुक, कर्णबधिर अशा ३ मुलांचे कौशल्य पाहताना अवाक व्हायला झाले. आपल्या सजवलेल्या वह्या, चित्रे, प्रत्येक पान उघडून आम्हाला सर्वांना दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. विलक्षण असे हे दृश्य कधीही न विसरता येणारे असे! ब्रेल लिपीत लिहिलेले वाचून दाखवणे. आमच्या घोळक्यातून बरोबर वाट काढत कपाटापर्यंत चालत जाऊन, ते उघडून त्यातील ब्रेल (सांकेतिक भाषा) टाईप रायटर काढून पुन्हा कपाट व्यवस्थित बंद करून, मशीन घेऊन पुन्हा आमच्या घोळक्यातून बरोबर वाट काढत teacher पर्यंत पोहचत आम्हाला टाईप करुन दाखवणे तसेच एका अवघ्या ५ वर्षाच्या अंध मुलीचे, आम्हाला प्रत्येकीच्या हाताला स्पर्श करून, वास घेऊन बरोब्बर एखादे नाते जोडून हाक मारणे, शिक्षिकेच्या आवाजावरुन तिला ओळखणे सर्व विलक्षण!
.
येथे या मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे आणि त्यांच्यात दडलेले असामान्य कलागुण इतरांपुढे आणण्याचे मौलिक कार्य केले जाते. या शाळेमध्ये अतिशय प्रेमळ आणि दक्ष शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गटांच्या वर्गांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, मुलांमधील कौशल्यांबद्दल आत्मीयतेने माहिती दिली. वय ० ते १८ वयोगटातील सर्व मुला – मुलींसाठी ही शाळा काम करते.
.
मुंबईतील जवळपासची मुले रोजच्या रुटीन वेळापत्रकानुसार त्यांच्या पालकांसोबत येतात तर मुंबई बाहेरील मुलांसाठी वसतिगृहाची सोय आहे.
.
शाळेमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासोबत मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जातो. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने कलात्मक शुभेच्छापत्रे, मेणबत्त्या, आर्टिफिशियल रांगोळी नक्षीकाम, पणत्या, कंदील, राख्या, कागदी पिशव्या, उदबत्ती बनवणे, बागकाम, मातीकाम इ. उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून त्यांच्यातील क्षमतांचा विकास केला जातो. या वस्तूंची विक्रीही केली जाते. इथे अंध मुलांना, आपण खातो ती भाजी म्हणजे काय असते हे सांगताना, ती भाजी पिकविण्याची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्याकडून करुन घेतली जाते. पोळी भाजी किंवा इतर पदार्थ पालकांनी घरुन बनवून आणून शाळेत स्टॉल लावून विक्री करण्याचे…. मुलांनी यात त्यांना मदत करण्याचे…. म्हणजेच अशा प्रकारे व्यावसायिक शिक्षण, व्यवहार ज्ञान दिले जाते, जेणे करुन भविष्यात ही मुले स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करु शकतील.
.
येथे शैक्षणिक आणि कार्यात्मक विकास, दैनंदिन स्वयं कर्म, वैयक्तिक स्वच्छता, गतीशीलता इ. सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रशिक्षित शिक्षक, मदतनीस, सेवेकरी ही बहुमोलाची सेवा इमानेइतबारे, प्रेमाने, मायेने करत आहेत.
.
आमच्या ३१ जणींच्या ग्रुपने दिलेल्या या भेटीने त्यांना झालेला आनंद त्यांनी व्यक्त करुन दाखवला. लोक भेटायला येतात, आपुलकीने चौकशी करतात, कौतुक करतात, काही वेळेस सेवा द्यायलाही येतात तेव्हा आम्हाला काम करण्यास अजून प्रेरणा मिळते असे एका शिक्षिकेने प्रतिक्रिया दिली.
.
आपल्या सभासद सौ.अदिती सावंत भोसले या संस्थेत कार्यरत असून त्यांच्यामुळे आम्हाला योगदान देण्याचे भाग्य लाभले. अदिती ताईंच्या सेवाभावी कार्याला मनापासून सलाम!!
.
ही विशेष मुले समाजाच्या प्रवाहापासून दूर राहू नयेत, ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी बंद होऊ नयेत म्हणून अशा उपेक्षित मुलांसाठी आपण प्रत्येकाने जमेल तसे पोटतिडकीने काहीतरी करायला हवे. हीच खरी सर्वात मोठी मानव सेवा आहे याची अगदी तळमळीने जाणीव झाली!
समाजाचं आपण काही देणे लागतो हा मानवतावादी सकारात्मक विचार मनात घोळू लागला. खरंच ही भेट सत्कारणी लागल्याचे समाधान कित्येक काळ मनात राहिल हे निश्चित !
.
शब्दांकन : सौ. ऐश्वर्या ब्रीद.