*मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – महिला मेळावा २०२३*

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई च्या महिला आघाडीने रविवार दि.१९ मार्च,२०२३ रोजी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
मराठा मंडळाच्या सभासद महिला तसेच मुलुंड मधील सर्व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सभागृह उत्साहाने भारून गेले होते.
 

                         

सुप्रसिद्ध सुसंवादिनी, उत्तम व्याख्यात्या, निवेदिका, मुलाखतकार, लेखिका सौ.मंगलाताई खाडिलकर यांच्या, मनात आलेल्या विचारांचं जनांतले प्रगटीकरण म्हणजे “मनोमनी” या त्यांच्या आजपर्यंतच्या निवेदन क्षेत्रातील प्रवासातील मनात ठसलेल्या अनेक अविस्मरणीय अनुभव,घटना यांचे रसपूर्ण विवेचन असलेल्या अप्रतिम कार्यक्रमाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. निवेदन क्षेत्रात काम करत असताना भेटलेल्या काही साहित्यातील, काही वास्तवातील व्यक्तींच्या, मनोमनी ठसलेल्या तर कधी समृद्ध करणाऱ्या, मनाला सुखावणाऱ्या – दुखावणाऱ्या अशा अनेक चांगल्या-वाईट आठवणींचा आलेख मांडताना, रसिकांमध्ये काही क्षणी हास्याची कारंजी उडत होती तर काही भावनिक क्षणांचा अनुभव येत होता. आपल्या सुमधुर मधाळ वाणीने, मंगलाताईंनी श्रोतृवृंदाची मने जिंकली.

   

यावेळी अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या अध्यक्षा सुवर्णाताई पवार, लोकसत्ता अर्थ वृत्तांत मध्ये गुंतवणुकीवर अभ्यासपूर्ण लेख लिहिणाऱ्या सी.ए. तृप्ती राणे, शून्य कचरा शहर आणि प्लास्टिक निर्मूलन साठी काम करणाऱ्या अथक फाउंडेशनच्या अस्मिता गोखले, दोन वेळा ३७०० किमी.ची नर्मदा परिक्रमा एकटीने पायी चालून संपन्न करणाऱ्या रश्मी विचारे, राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळविणाऱ्या मंगल सराफ या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या मुलुंडस्थित महिला मंडळांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले मुख्य प्रायोजक “वाघ बकरी चहा” यांच्या तर्फे सर्व सन्मानित महिलांना भेटवस्तू देण्यात आली.तसेच सभागृहात उपस्थित प्रत्येक महिलेला एक छोटी भेटवस्तू देण्यात आली.

                                         

                                          

वाघ बकरी चहा आणि इतर प्रायोजक सारस्वत बँक,लोकमान्य मल्टिपर्पज बँक,भागीरथी फूड्स, विची ट्रॅव्हल्स यांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष मा.रमेश शिर्के आणि महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरीताई तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली सावंत व सौ.शुभदा म्हामुणकर यांनी खूप उत्तमरित्या केले. तसेच आभार प्रदर्शन सौ. करुणा सावंत यांनी केले. सौ.सोनाली सावंत यांनी मंगलाताई खाडिलकर यांचे आभार मानताना त्यांच्याबद्दल खूप छान भावना व्यक्त केल्या.

ध्वनी संयोजन श्री.निलेश सुर्वे यांचे होते. मंडळाच्या प्रवेशद्वारी, स्त्रीच्या मनोमनीचे भाव दर्शवणारी सुंदर रेखीव रांगोळी सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी घातली होती. श्री लक्ष्मी कॅटेरर्स च्या शामल चाळके यांच्या सुग्रास बटाटेवड्यांचा आणि ‘वाघ बकरी चहा’ यांच्या सुमधुर चहाचा सर्वांनी आस्वाद घेतला.

या संपूर्ण सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के काका यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदाधिकारी-कार्यकारिणी सदस्य यांचा पाठींबा, सल्लागार सौ.चित्रा धुरी,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रश्मी राणे, सांस्कृतिक विभाग निमंत्रक सौ. ऐश्वर्या ब्रीद,महिला आघाडी निमंत्रक सौ.मनीषा साळवी, संपूर्ण महिला आघाडी, विविध समित्यांचे उत्स्फूर्त कार्यकर्ते, सहकारी सेवक वर्ग,हितचिंतक आणि सोहळ्यास लाभलेला तब्बल ४७० जणांचा श्रोतृवृंद यांच्यामुळे हा सोहळा दिमाखदार जाहला!

 

वृत्तांत लेखन : ऐश्वर्या ब्रीद.