*माहुली फार्म…संस्मरणीय महिला स्पेशल सहल:*
——————————————–
.
थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून,नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे सहल ! प्रपंचाच्या रहाटगाड्यातून वेगळा आनंद घेण्याची सवड – निवांत काढलेला वेळ म्हणजे सहल!
.
शनिवार दि.११/०६/२०२२ रोजी, मराठा मंडळ मुलुंड,मुंबई महिला आघाडीने…मंडळाच्या सभासद महिलांसाठी… माहुली फार्म,शहापूर येथे सहल आयोजित केली होती. मंडळाच्या इतिहासातील – तब्बल ७१ महिला,असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही पहिलीच महिला स्पेशल सहल!!
.
मार्च मधील महिला दिनानिमित्त आयोजित “आम्ही उद्योगिनी” या ग्राहक पेठेच्या यशस्वी पाऊलामागून टाकलेले हे पुढचे सहलीचे पाऊलही अत्यंत यशस्वी ठरले!
.
महिलांसाठी सहल जाहीर केली आणि सर्वांत जास्त उत्साह कोणामध्ये संचारला असेल तर वयाने ज्येष्ठ परंतु मनाने तरुण असणाऱ्या मैत्रिणींमध्ये. सहलीला येणाऱ्यांच्या उत्फुर्त प्रतिसादासोबत आयोजकांचाही आत्मविश्वास वाढत होता. सहलीची जोमदार तयारी सुरू झाली. व्हॉटसॲप मेसेजेस, सहलीचे ठिकाण निश्चित करणे,तेथे भेट देऊन व्यवस्था पाहणे,मेन्यू ठरवणे,सहलीचे पैसे रोजच्या रोज कार्यालयातून जमा करणे, सहलीच्या व्हॉटसॲप ग्रुप वर वेळोवेळी सूचना देणे, खेळ आयोजित करणे, खेळाचे सामान,बक्षिसे,भेटवस्तू यांची खरेदी करणे, म्युझीक सिस्टीम व्यवस्था, यांसारखी अनेक कामे प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्य स्वतः करत होते. यातून समितीतील एकजूट अजून भक्कम झाली.
.
सर्व कार्यकर्त्या आणि सहलकरणींचा उत्साह ऊतू जात होता आणि तो दिवस उजाडला. दिलेल्या वेळेआधीच सकाळी सगळ्याजणी मंडळात हजर. नेहमीच्या पारंपारिक पोषखापेक्षा वेगळ्या वेशभूषेत सर्वजणी भारी दिसत होत्या. मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून ,बाप्पा मोरया चा गजर करत दोन्ही बसेसनी शहापूर कडे वेग घेतला आणि सुरू झाला फक्त आणि फक्त धुमाकूळ! सुरुवात आरत्यांनी… व्हाया कोळी डान्स करून द एंड अर्थातच सैराट धुमशान!
.
“माहुली फार्म”…सुंदर निसर्गरम्य ठिकाण. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी. पावसाने दगा दिल्याने धबधबा अनुभवता आला नाही. रायवळ,हापूस, केसर आंब्याची राई, फणस, चिकू सारखी अनेक झाडे, करवंदाच्या जाळ्या, शेत तळं, गाई गुरांचे हंबरण्याचे आवाज, सारवलेलं मोठ्ठं अंगण… सारवलेल्या अंगणात पाऊल ठेवले आणि त्या थंडगार जमिनीवर गालीच्याचे सुख मिळाले. आपल्याच कोकणातील गावात आल्याचा फिल आला. उत्कृष्ट नाष्टा,स्वादिष्ट शाकाहारी – मांसाहारी जेवण. पोटासोबत मनही तृप्त झाले. सर्व मैत्रीणीना सामावून घेणारे मजेशीर खेळ आयोजित केल्याने सर्वजणी वय विसरून मनसोक्त खेळल्या. जिंकल्यानंतरचा गगनात न मावणारा आनंद जणूकाही ऑलिंपिक पदक जिंकल्याचा!! तेथील तरण तलावात मनसोक्त डुंबून पोहण्याचा आनंद घेतला.जेवणाच्या आधी डान्स मध्ये गॉगल लावून दिलखुलास नाचताना आनंदाला उधाण आले होते.
.
सत्तरी पार केलेल्या २१ मैत्रिणींचा, सुंदर भेटवस्तू देऊन केलेला सन्मानाने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी दाटी केली होती. सर्व सहभागी मैत्रिणींना छान भेटवस्तू दिल्या.याबद्दल सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले. संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही. तिथून पाय काढणं जड जात होतं. चहा,कॉफी,भजी, बिस्किटे यांचा आस्वाद घेऊन…संस्मरणीय आठवणी मनात साठवून ….पुढील सहलीची योजना आखत जड पावलांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दिवसभर भटकून,डुंबून,खेळून,नाचूनही न थकलेल्या मैत्रिणी, परतीच्या प्रवासातही धम्माल करत घराकडे परतल्या.
.
या पहिल्या महिला स्पेशल सहलीच्या संस्मरणीय आठवणी हृदयाच्या एका गोड कप्प्यात कायम कोरलेल्या राहतील!
.
शब्दांकन : ऐश्वर्या ब्रीद.
.