“असेन मी नसेन मी”

“असेन मी नसेन मी”

कवियत्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निर्माता राजेंद्र शिंगरे यांच्या धुंद निर्मित स्वरतरंग आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ८ मे २०२२, रोजी “असेन मी नसेन मी” हा शांता शेळके यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

मराठी कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका शांता शेळके यांची कितीतरी गाणी आजही आपल्या ओठांवर असतात. अश्या प्रतिभासंपन्न गीतकार यांची गाणी प्रार्थनेपासून, नाट्यगीते, चित्रपट गीते, भावगीत अनके गाणी प्रीती निमकर जोशी, केतकी भावे जोशी, मंदार पिलवलकर आणि सौमीत कुमार यांनी वेगवेगळ्या बाजात व ढंगात गाऊन रसिकांची मने जिंकली.

 

भारतरत्न स्वर साम्राज्ञी लतादीदी यांच्या स्मृतीस अभिवादन करून पसायदानाने कार्यक्रमास सुरुवात झाली.  नंतर प्रीती निमकर जोशी यांनी भक्तीपूर्णे स्वरात गजानना श्री गणराया या गाण्याने, मंगलमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर सर्व गायकांनी शांत शेळके यांची गाणी इतकी सुरेल गायली कि रसिक प्रेक्षकही तल्लीन झाले. सर्व गाण्यांचा परामर्ष इथे घेणे शक्य नाही, पण काही गाण्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

“जय शारदे वागेश्वरी” हि प्रार्थना केतकी भावे जोशी यांनी भावपूर्ण स्वरात सादर केली. केतकी भावे जोशी यांनी गायलेली “काय बाय सांगू, कसं ग सांगू ” हि लावणी तर भन्नाट होती. या लावणीला नखरा, ठसका तिच्या आवाजांत छान उतरला होता. “हि वाट दूर जाते” हे गाणे प्रीती निमकर जोशी यांनी अतिशय सयंत सुरात सादर केले, त्याला केदार गोखलेच्या बासरीची सुद्धा सुंदर साथ लाभली.

“काटा रुते कुणाला” हे शास्त्रीय बाज असलेले गाणं मंदार पिलवलकर खूप छान गायलं. गाण्यात अपॆशीत असलेले सर्व भाव त्यांच्या स्वरात पुरेपूर उतरले होते. विनय चेऊलकर व ओंकार देवस्कर यांची कीबोर्ड ची साथ निव्वळ अप्रतिम.
“नाव सांग सांग” या गाण्यात सौमीत कुमार आणि प्रीती निमकर जोशी यांनी बहार आणली आणि सुशांतची बर्वेची ढोलकीची साथ गाण्याला वेगळी उंची देणारी ठरली.

“जिवलगा राहिले दूर घर माझे” हे गाणे केतकी भावे जोशी यांनी आर्त स्वरात गायले, या गाण्यात मयूरेश शेर्लेकर यांचा तबल्यावरील ठेका सुद्धा सुंदर होता. “ऋतू हिरवा” हे एव्हरग्रीन गाणं प्रीती निमकर जोशी इतक्या आंनदी स्वरात गायल्या कि रसिकांचीही मान त्यावर डोलत होती आणि तबला, ढोलक, कोरस व सर्व वादकांचा अचूक मेळ साधला होता. मंदार पिलवलकर यांच्या “दाटून कंठ येतो” या गाण्याने डोळयांच्या कडा पाणावल्या.

सौमीत कुमार यांचे “शूर आम्ही सरदार आम्हाला”, प्रीती निमकर जोशी यांची “रेशमाच्या रेघांनी” इत्यादी गाणी सुद्धा छान होती. सुशांत बर्वे यांच्या ढोलकीची साथ व रवी महाडिक यांच्या अप्रतिम तालवाद्यांनी खुप श्रवणीय झाली. मध्यंतराआधी सर्व गायकांनी गायलेल्या कोळी गीतांनी धमाल उडवली आणि बहार आणली.सर्व गाण्यांना रसिक प्रेक्षक उस्फूर्तपणे प्रदिसाद देत होते. काही जण तर लावणीबरोबर, कोळीगीतांनाही शिट्या वाजवून दाद दिली.

मध्यंतरानंतर तबला, पखवाज आणि ढोलकी, चोणकं यांची सुशांत बर्वे व मयूरेश शेर्लेकर यांनी सादर केलेली जुगलबंदी हे कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले.

“आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे” हे गाणे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं सौमीत कुमार आणि प्रीती निमकर जोशी यांनी.               “माझे राणी माझे मोगा” हे प्रणय गीत खूप छान मूड सांभाळत सादर केलॆ मंदार पिलवलकर व केतकी भावे जोशी यांनी.                    “नंबर ५४” हे गाणे तर वेगळ्या जोशात सादर केले ते सौमीत कुमार आणि प्रीती निमकर जोशी यांनी. यात गिटारचा वापर लाजवाब होता. पाश्चिमात्य शैली असलेल्या या गाण्याने सर्वाना डोलायला लावलं.

गझलच्या अंगानं जाणार गाणं केतकी भावे जोशी यांनी “का धरिला परदेश” यात तबल्यावर मयूरेशची साथ व हार्मोनियमचे सूर मिळून एक वेगळं आवर्तन निर्माण केलं.

गायनाच्या कार्यक्रम रंगदार होण्यासाठी गायकांना आणि गायिकांना वादकांची सुरेल साथ आवश्यक असते, ह्या कार्यक्रमातही संगीत संयोजक अंकुश हाडवळे यांनी गिटारची, सुशांत बर्वे यांनी ढोलकी पखवाजवर, केदार गोखले याने बासरीची, विनय चेऊलकर व ओंकार देवस्कर यांची कीबोर्ड व तालवाद्यांवर रवी महाडिक यांनी उत्कृष्ट साथ दिली, त्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगदार झाला.

आनंद केळकर यांची प्रकाश योजना गाण्याच्या मूडला साजेशी होती. यतिश पाटील यांचे ध्वनी संयोजन नेहमीप्रमाणे अप्रतिम.

निवेदनातील प्रकाशमान सरस्वती अनघा मोडक यांनी या कर्यक्रमाचे निवदेन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते. शांत, धीरगंभीरपणे रंगमंचावर बसणारी अनघा ज्यावेळी अभ्यासपूर्ण निवेदन करते त्यावेळी त्या कार्यक्रमाचे यश निश्चितच असते. 

अनघाच्या निवेदनाला सर्व रसिकांनी तिला उभे राहून मानवंदना दिली, हा या कार्यक्रमाचा परमोच्च क्षण होता.

एखाद्या उंची अत्तराचा सुगंध जसा बहरत जातो तसा कार्यक्रमाच्या प्रवासामध्ये अनघाच्या निवेदनाला बहर येत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांसमोर काहीतरी नवीन आणि रंजक मांडण्याचा प्रयत्न अनघा करत असते. विषयाची उत्तम समज, भाषेचा गाढा अभ्यास, शांत, धीरगंभीर पण तितकाच मिश्कील स्वभाव, निर्मळ मन आणि या सगळ्यांच्या जोडीला रसाळ वाणी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी यामुळे अनघाच्या निवेदनाने एक वेगळीच उंची आज गाठली आहे. शांता शेळके यांचा सांगितकी जीवन प्रवास सांगताना, साहित्यक शांता शेळके यांची अप्रतिम कलाकृती रसिकांसमोर मांडली.

मंदार पिलवलकर यांचं “असेन मी नसेन मी” हे शीर्षक गीत सर्वाच्या ओठावर शेवट पर्यतं होते.“मराठी पाऊल पडते पुढे” या गाण्यात सर्व गायकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची सांगता केली. एकंदरती कार्यक्रम बहारदार झाला. कांन व मन तृप्त होऊन तीन साडेतीन तास कसॆ गेले कळलेच नाही.

स्वरतरंग आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडलेला कार्यक्रम, अनघाच्या निवेदनामुळे आणि तिच्या अद्वितीय वाणीमुळे रसिकांच्या कायम स्मरणात, मनात कितीतरी दिवस रुंजी घालेल यात शंकाच नाही.

एक नितांत सुंदर कार्यक्रम बघून रसिक मंत्रमुग्ध झाले. काही क्षणचित्रं खास आपल्यासाठी……!