- October 15, 2011
- Posted by: horizon
- Category:
सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद सर्वांनी एकत्रित पणे उपभोगावा, मंडळाच्या कार्याचा प्रसार, प्रचार व सादरीकरण मोठ्या प्रमाणात व देखण्या स्वरूपात केला. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारती समोरील रस्त्यावर भव्य सभा मंडप व तितकाच प्रशस्त रंगमंच उभारून उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या साठी कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून उभारलेले व्यासपीठ व त्यावरील देखणा रंगमंच अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्राचे उदघाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री.संजय दिना पाटील, आमदार सरदार तारासिंह , आमदार शिशिर शिंदे, नगरसेवक श्री.प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती इ. मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते श्री. नितीन चंद्रकांत देसाई याना एक सुंदर व संस्मरणीय अशी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी श्री. रमेश शिंदे यांच्या सौजन्याने संकल्पित केलेल्या सरस्वती वाचनालयाचे उदघाटन सुद्धा ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या दिवशी सकाळ पासूनच इमारतीमध्ये विविध धार्मिकविधि बरोबरच श्री. जनार्दन वामन राणे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे क्षात्रतेज श्री तुळजाभवानी मातेच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना व त्या छोटेखाणी मंदिराचा शुभारंभ करण्यात आला. या नेत्रदीपक अशा सोहळ्याप्रसंगी दूरदर्शनवर गाजलेला “मराठी पाउल पडते पुढे!” हा विविध व लोकप्रिय कलावंतानी सादर केलेला देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्वांगसुंदर सभारंभासाठी उभारण्यात आलेला भव्य सभामंडप उपस्थितांनी ओसंडून गेला होता. यावेळी तळमजला व पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक पद्धतीचे प्लाझमा टी.व्ही. सेट्स बसविण्यात आले होते. अनेकांनी हा सोहळा त्या पडद्यावर पाहण्याचा आनंद लुटला. या नयनरम्य सोहळ्याचे संपूर्ण निवेदन सुप्रसिद्ध निविदिका उत्तरा मोने यांनी उत्तम प्रकारे केले. तमाम मुलुंडकरांबरोबरच मुंबई, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई अशा विविध ठीकाणाहुन आलेल्या अनेक हितचिंतक मित्रांनी, सभासदांनी व काही संस्था प्रतिनिधीनि मुलुंड मराठा मंडळाच्या या सर्वांगसुंदर सोहळ्याचा मुक्त कंठाने गौरव केला.