*मागे वळून पाहताना* – सौ. सुषमा मनोहर सावंत

प्रत्येक मनुष्य आयुष्यात एकदा तरी भूतकाळामध्ये रमतोच, मग तो भूतकाळ चांगला वाईट कसाही असला तरी प्रत्येकाला आपला भूतकाळ आठवतोच. मीही बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये फार रमते. प्रेमळ आई वडीलांच्या पंखाखाली गेलेले रम्य बालपण, प्रसंगी खाल्लेले धपाटे  शाळेत जाणारी मुले पाहिली की स्वतःचे शाळेतले दिवस आठवतात. तीन भावंडांमध्ये कंपासबॉक्स शेअर करणे, माझी पुस्तके लहान भावंडांनी वापरणे, असे जरी बालपण असले तरी खाऊन पिऊन फार सुखी असल्यामुळे बालपणात भरपूर मौज-मस्ती केली. फुलपंखी कॉलेज जीवन संपल्यानंतर नोकरी करताना झालेली जबाबदारीची पहिली जाणीव. आपल्या टेबलवरचे काम ही आपली जबाबदारी असते हे जेव्हा लक्षात आले तेव्हा बालपण बरेचसे पुसलेच गेले. नंतर आली संसाराची जबाबदारी आणि त्यात पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असलेले आपले मूल. 
.
 
आज मागे वळून पाहताना लहानपणीची मस्तीखोर मुलगी आणि आत्ताचे आपण यात कुठेच ताळमेळ जुळत नाही. लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईकडे हट्ट करणाऱ्या आपण आणि संसाराची जबाबदारी पडल्यानंतर स्वतःच्या कित्येक इच्छा आणि अपेक्षांना मुरड घालून नेकीने आणि काटकसरीने केलेला संसार हे सारे एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर येते. एकत्र कुटुंबातून बाहेर पडून स्वतःचा संसार सुरू केल्यानंतर पहिले दोन महिने कुकर आणि चार महिने फ्रिज नसल्यामुळे सकाळी होणारी प्रचंड धावपळ, फ्रीज येईपर्यंत टिव्हीसाठी मुलाने दाखवलेला समंजसपणा. मुलाचे पाळणाघर आमचे दोघांचे ऑफिसचे डबे, ही सगळी तारेवरची कसरत करून ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणे, संध्याकाळी घरी आल्यावर शरीर आणि मन प्रचंड थकलेले असताना पुन्हा किचनमध्ये घुसणे आणि त्यानंतर सगळे आवरून साडेअकरा पर्यंत रात्री झोपणे, पुन्हा सकाळी 5/5.30 वाजता उठणे, हे सगळे आपण कसे निभावले हे आठवले की खरंच अंगावर काटा येतो. अर्थात प्रत्येकजण आपापल्यापरीने कष्ट करतच असतो, मी काही वेगळे केले नाही.
.
परंतु आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, आजच्यासारखी पूर्वी कोणत्याही बाबतीत जीवघेणी स्पर्धा नव्हती. जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे असलेच पाहिजे किंवा जे दुसऱ्याकडे आहे ते मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने आणि कसेही मिळविणारच अशी वाईट ईर्षा नव्हती. गरजाही फार कमी होत्या.  प्रचंड कष्ट करायची तयारी असायची शॉर्टकट माहित नव्हता अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.
.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर फार चांगले संस्कार होत असत आणि चाळसंस्कृती हे तर खरोखरच एक वरदान होते. अख्खी चाळ हे एक कुटुंबच असायचे, त्यात धर्म पंथ जात कुठल्याही गोष्टीला थारा नसायचा. अगदी तळमजल्यापासून शेवटच्या मजल्यावरील घरापर्यंत कोणाकडे काय शिजते आहे, कोणाकडे कसला समारंभ आहे किंवा अगदी काही वाईट घडले तरी सर्व चाळ प्रत्येकवेळी एकत्र येत असे.  आज मात्र हे सर्व कुठे तरी हरवले आहे. ब्लॉक पद्धतीमुळे शेजारी कोण राहते हेही आता माहीत नसते. प्रत्येक जण स्वतःची प्रायव्हसी, स्वतःची स्पेस महत्वाची मानू लागला आहे.
.
आमच्या बालपणी आम्हीही शेजाऱ्यांच्या किचनमध्ये जाऊन जे आवडतं ते हक्काने मागत असू आणि त्यात कोणालाही काही वावगे वाटत नव्हते. आता मात्र मॅनर्स, शिष्टाचार असे मोठे मोठे शब्द जन्माला आले आहेत.  हेच मॅनर्स/शिष्टाचार सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींचे चाळे चालतात तेव्हा कुठे जातात असा प्रश्न पडतो.  आमच्या बालपणी अशी दृश्य दिसणे विरळाच होते, त्यामुळे असेल कदाचित आम्हाला हे *शिष्टाचार* प्रकरण माहीतच नव्हते. आता हे बघून तिकडे दुर्लक्ष करण्याचे *मॅनर्स* आपण पाळायचे असतात हे लक्षात आले   पूर्वीची सहजता लोप पावून दिखावेगिरी, कृत्रिमपणा खूपच वाढला आहे हे पाहून फार खेद वाटतो.
.
आतातर कोरोना काळात उरलीसुरली माणुसकीही लोप पावेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. या कठीण काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण खडतर आयुष्य जगत आहेत.  त्यामुळे समाजात एकदम दोन टोके दिसत आहे एकतर स्वतःच्या स्वार्थासाठी माकडीणीच्या पिलासारखे बळी घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे स्वत:च्या तोंडचा घास काढून दुसऱ्याला भरवताना दिसत आहेत. माणूस आता या कठीण काळात अनुभवातून शहाणपण शिकत आहे. घरचा सकस आहार त्याला व्यायामाची जोड याचे महत्वही आता पटू लागले आहे. हे सर्व पाहून तर जास्तीत जास्त भूतकाळात *मागे वळून पहावेसे* वाटत आहे, कारण लहानपणापासून हेच तर आई-वडिलांनी शिकवले आहे, *घरचे खा पौष्टिक खा आणि भरपूर खेळा व्यायाम करा*.  
.
खरोखरच भूतकाळ आपल्याला खूप काही शिकवून जातो. आपल्याला अनुभवाचे धडे देणारा तोच एक गुरु असतो. म्हणून तर प्रत्येकाने आपला भूतकाळ जपून ठेवलेला असतो आणि प्रत्येकजण कठीण प्रसंगी आपल्या भूतकाळात मागे वळून पाहतोच.
.
*दिन जो पखेरू होते, पिंजरे मे मैं रख लेता, पालता उनको जतन से, मोती के दाने देता, सीने से रहता लगाये..*


Leave a Reply