*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.*

आज सर्वच क्षेत्रात महिलांच्या प्रगतीचा रथ चौफेर उधळत गगनभरारी घेत आहे.प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत असताना दिसत आहेत; याचे श्रेय जाते स्त्री शिक्षणाचे पहिले बीज पेरणारे अग्रणी दाम्पत्य क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांना .स्त्री शिक्षणाला वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आज आपण आत्मनिर्भर होऊन मोकळेपणाने व्यक्त होत आहोत. त्या बद्दल मी त्यांची ऋणी आहे.
.
३ जानेवारी १८३१ ला जन्मलेल्या सावित्रीबाईंचा विवाह नवव्या वर्षी तेरा वर्षाच्या जाणकार शिक्षणाची ओढ असणार्‍या ज्योतीरावांशी झाला. हा त्यांच्या जीवनातील सुवर्ण क्षण ठरला. लहानपणापासून जिद्दी, धाडशी ,संस्कारी स्वभावाच्या सावित्रीला पतीने त्यावेळच्या समाजाची दशा व दिशा समजावून दिली. त्यावेळी समाज अज्ञान ,अंधश्रद्धा ,रूढी परंपरा यांच्या विळख्यात अडकलेला होता .स्त्री ही ‘चूल आणि मूल’ आणि रांधा वाढा…..च्या कक्षात बंदिस्त होती .अस्पृश्यता, गरीबी, शोषित पीडितांच्या व्यथांनी दोघे अस्वस्थ होत.या गर्तेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग तो म्हणजे ‘स्त्रीशिक्षण’! एक पुरुष शिकला तर घर चालवतो;पण एक स्त्री शिकली तर ती घर घडविते. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धारी “हे दोघांना पटले होते.
.
सुरूवात सावित्री पासून. प्रथम तिला लिहायला वाचायला शिकविले. या नवदांपत्याने स्वतःच्या संसाराची स्वप्ने विसरून समाजाचा संसार करण्याचा वसा घेतला. मोठ्या धैर्यानं १८४८ ला पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. भारतातील त्या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका व संस्थापिका ठरल्या. 
.
कवी महेंद्र कांबळे ‘अर्घ्यदान’ या कवितेत सावित्रीबाई विषयी म्हणतात *”तिने घडविली क्रांती स्वतः अ,आ,इ शिकून! डगमगली ना कधी गोळे शेण मातीचे झेलून! ज्योतीने ज्योत पेटवली सावित्री झाली वात! रात काळोख भेदाया केली तिने सुरुवात!!”* पण ही सुरुवात सोपी नव्हती. पुण्यातील कर्मठ सवर्णांनी ‘धर्म बुडाला’ म्हणून आकाशपाताळ एक केले. निंदानालस्ती, अवहेलना केली. त्यांच्या बहिष्काराच्या भीतीने फुले यांच्या वडिलांनी दोघांना घराबाहेर काढले. सावित्रीचे सासर-माहेर सारे तुटले; पण तिने ज्योतीराव नावाच्या सत्यवानाची साथ सोडली नाही. हळूहळू लोकांचा विरोध मावळून अनेक मुली शिकू लागल्या. १८५२ पर्यंत चार वर्षात त्यांनी जवळजवळ अठरा शाळा त्यात महार मांग मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी अशा काढल्या.
.
“मानवता हाच धर्म “मानत सर्व जाती-धर्माच्या मुलींना शिक्षण दिले. मुस्लिम बांधव उस्मान शेख यांच्या घरीही मुस्लिम मुलींसाठी शाळा काढली, केवढे हे कार्य ! शेवटी कष्टाचा विजय झाला. शिक्षण कार्याची दखल इंग्रज सरकार दरबारी घेतली गेली. मुंबईचे गव्हर्नर मेजर कँडी यांनी पुण्याला जाऊन शाल श्रीफळ देऊन दांपत्याचा गौरव केला. शाळांना अनुदान देऊन त्यांचा भार सरकारवर घेतला. अशा तऱ्हेने प्रतिकूल परिस्थितीत खेचून आणलेले यश असामान्यत्व देऊन जाते हेच खरे!
.
त्यावेळच्या बालिका-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली विधवा होत . त्यांचा गैरफायदा पुरुषवर्ग घेई. त्यातून विधवा गरोदर स्त्रियांचा छळ होई. भ्रूणहत्या, आत्महत्या होत. स्त्रियांच्या दुःखाने सावित्रीबाईंचे मन कळवळले. त्यांनी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक व प्रसूती गृह सुरू केले.विधवांची बाळंतपणे व सुश्रुषा केली. इतकेच नव्हे तर काशीबाई या विधवेचा ‘यशवंत’नावाचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. त्याला शिकवून डॉक्टर बनविले; त्यानेही पुढे दवाखाना काढून रोग्यांची सेवा केली.
.
ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेत दत्तक पुत्र यशवंत यास टिटवे धरण्यास घरच्यांनी विरोध केला तेव्हा ही माऊली स्वतः टिटवे धरून अंतयात्रेच्या अग्रभागी चालली. स्वतः
पार्थिवाला अग्नी दिला व स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला.विधवेचा मुलगा म्हणून यशवंतला मुलगी देण्यास कोणी तयार होईना तेव्हा त्यांनी कार्यकर्ता ज्ञानोबा ससाने यांच्या राधा या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ ला त्याचा विवाह केला आणि आंतरजातीय विवाहाचा पाया घातला.जे आता अलीकडे समाजात सर्रास होऊ लागलेत. 
.
आपले अनुभव, विचार याचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्यातून केला.काव्यफुले, बावनकशी,सुबोध, रत्‍नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह! शिक्षणाची महती गाताना त्या म्हणतात *”विद्या हेच धन श्रेष्ठ सा-या धनाहूनी l ज्या पाशी, तो ज्ञानी मानिती जन “* स्वाभिमानाने जगण्यासाठी खूप शिका ज्ञान वाढवा म्हणजे ख-या शक्तीची ओळख होऊन पुरूषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळच येणार नाही,असे त्या सांगत. एक उल्लेखनीय  प्रसंग  १४जानेवारी १८५३ रोजी मकर संक्रांतीला त्यानी सर्व जातींतील सधवा , विधवा, परित्यक्ता, कुमारिका यांच्यासाठी एकत्रित  हळदीकुंकु केले.
.
सर्वाच्या, सारख्या अधिकाराबाबत त्याकाळातील  हे कार्य किती प्रेरणादायी आहे !बालविवाह,केशवपन विरोध,विधवा पुनर्विवाह, महिलामुक्ती, स्त्री सशक्तीकरण, सतीबंदी यांसाठी अविरत कार्य व क्रांती करणा-या अशा या महान समाजसेविकेला क्रांतिज्योती म्हणून गौरवण्यात आले. ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन ‘बालिकादिन’ म्हणून १९९५ पासून साजरा होतो. त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार, मदत योजना केंद्र  राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. अशा या क्रांतिज्योतीला माझा शतशः प्रणाम 
 
शब्दांकन: सौ.शुभदा परब


Leave a Reply