प्रत्येक मनुष्यप्राणी पुष्कळ स्वप्न रंगवित असतो. परंतु काही वेळेला संधी मिळते, काही वेळेला नाही मिळत. माझ्या खूप मैत्रीणी भारत/ परदेश दौरे करून आल्या होत्या. त्यांची वर्णने ऐकून माझ्या मनात पण एक कुतूहल निर्माण झाले आणि मी ठरवले की मी सुध्दा निसर्गाचा आनंद लुटायला हवा. त्या प्रमाणे मी भारतातील स्थळे निश्चित केली.
.
प्रथम मी जम्मू मधील वैष्णोदेवीला भेट दिली. जशी मी लहानपणी घोड्यावर बसून चौपाटीवर फेरफटका मारायची तशीच त्या बर्फाच्छादित प्रदेशात घोड्यावर बसून आनंद लुटला. पुढे देवीचे दर्शन घेतांना तर प्रत्यक्ष देवी साकार झाल्याचा अनुभव आला.
.
नंतर आम्ही म्हैसूर,उटी ,बैंगलोर असा प्रवास केला. ही तिन्ही शहरं अवर्णनीय आहेत. उटी म्हणजे छोटा काश्मीरच!. नंतर वाघा बॉर्डर ला भेट दिली, खरोखरच आपल्या सैनिकांना पाहून मनात पक्के झाले की आपण जन्मभर ह्यांचे ऋणी आहोत. देशप्रेम आणि त्याग काय असतं ते पूर्णपणे मनामधे बिंबलं. ते सर्व आठवलं की अंगावर काटा येतो आणि शरीरात ऊर्जा!!
.
आमचा पुढील प्रवास झाला तो भारताच्या दक्षिणेकडे- तिरुपती. खरंच ज्या स्वच्छ अशा घाट माथ्यावरुन आपण देवळात जातो तो एक वेगळाच अनुभव आहे. ह्या नंतर माझे भारताचे नंदनवन पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वीणा वर्ल्ड ग्रुप बरोबर आम्ही काश्मीरला गेलो . तेथील हाऊस बोट मधले वास्तव्य, बर्फाच्छादित शिखरे पाहून मी एकदमच भारावून गेले. आमचे स्टेज शोज झाले. आपले बालपण आठवून आम्ही सर्व कार्यक्रमाचा आनंद लुटला. खरोखरच ते नंदनवन अजूनही मी माझ्या ह्रदयात साठवून ठेवलं आहे.
.
एवढे फिरल्यावर, मग निश्चय केला की एक परदेश दौरा करायचाच. आपली इच्छा असेल तर मार्ग सापडतो असं झालं आणि आम्ही परत एकदा वीणा वर्ल्ड ग्रुप बरोबर थायलंडला गेलो. सहा दिवसांच्या त्या दौ-यात परदेश पाहण्याची उत्सुकता सार्थ झाली. तेथे सुध्दा आम्ही सर्व कार्यक्रमात भाग घेऊन मनसोक्त आनंद लुटला आणि स्फूर्ती व प्रेरणादायी *जोडी नं १* चे बक्षीसही मिळवले!! पुढे महिला ग्रुपतर्फे अंदमानला भेट दिली. तिथे स्वातंत्रयवीरांचे राष्ट्रीय स्मारक,सेल्यूलर जेल पाहिला व क्रांतिवीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. तेथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय होते.
.
अशा तऱ्हेने जीवनाचा आनंद द्विगुणित करणारे संस्मरणीय प्रवास केले. आयुष्यात यापुढेही अजून बरंच काही पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणारच!
.
सौ.शिल्पा लाड