*लाॅक डाऊन आणि मी*

सध्या जगभरात कोरोना विश्वव्यापक महामारी ने धुमाकूळ घातला आहे .एक अदृश्य विषाणू करतोय राज्य जगातील घडामोडी वर भलेमोठे पूज्य अशी स्थिती आलीय; कारण कोरोना साखळी तोडण्याचा प्रभावी उपाय म्हणजे ‘लाॅक डाऊन’! इतर देशांप्रमाणे भारतातही 23 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाला.
.
” घरी रहा स्वस्थ रहा “कोरोना विरुद्ध लढ्यात जो घरी थांबेल तो ‘हुशारच ‘यात जिंकेल;️असा विचार प्रशासन,डाॅक्टर व पोलिस 
लोकांवर बिंबवू लागले. 
.
काहीही झाले तरी आपल्या घराकडे कोरोनाला फिरकू द्यायचे नाही व जिंकायचेच असा मी चंग बांधला. वाॅट्सअप गुरू होताच दिमतीला!त्यावर काय म्हणे ज्याची इम्युनिटी उत्तम तो जिंकणार !त्यासाठी संदेश व्हिडिओ सुरु झाले .त्यानुसार मग माझे ते ॲक्युप्रेशर,
आयुर्वेदिक काढे ,होमीओपॅथी, अध्यात्मिक एक ना अनेक प्रयोग सुरू झाले.त्यामुळे घरात सकाळी आयुर्वेदिक दवाखाना,दुपारी सकस पाककृतींचा मुदपाकखाना, तर संध्याकाळी पवित्र मंदिराचा भास होऊ लागला.अभ्यासा अन्ती माझी गाडी  वाफ घेणे ,वारंवार हाथ की सफाई व ध्यानधारणा यावर आली.
.
घरात मी-कष्टाळू,मुलगी -कष्ट टाळू,नवरा -कसे टाळू असे तिघे .आतापर्यंत नेहमी कामवाल्या मावशी व मी (कामवालीची कामवाली) असा गाडा रेटत होतो.आता त्यांनाही बंदी ;मग काय तिला “तुझ्या घरी तू सुखी रहा ” असा आशीर्वाद देऊन टाकला!आता कसे होणार?मिस्टरांनी कधी चहा केला तरी भांड्यांची अदलाबदल, सांडासांड यामुळे “काम नको पण पसारा आवर”ही स्थिती! मग काय स्वयंपाकादी कामे एका हाती मी करायची ;प्रत्येकाने आपापली स्वच्छता ,भांड हातासरशी घासून ‘भांड’ण टाळायच;बाहेरून आणणे-सवरणे मिस्टरानी(अनुभव-शुन्य) करायची अशी विभागणी ठरली.मग एखादा किल्ला लढवायला चाललोय अशा थाटात ते निघत .अहो अमुक अमुक दुकानात हे हे चांगलं …..पण ऐकतय कोण ?त्यांच्या त्या न ऐकण्याच्या सवयी मुळे अव्वाके सव्वा भाव,क्वालिटीकी ऐशीतैशी, भलत्याच वस्तू ,भाज्यांचा अतिरेक असे पराक्रम व्हायचे. मी मात्र पडली पदरी पडले ते.. निमूटपणे स्विकारायचे धोरण ठेवले.उपलब्ध वस्तूंमधून सकस चविष्ट जेवण बनवत अन्नपूर्णेबरोबर’न्यूट्रीपूर्णा ‘ही बनण्याचा प्रयत्न करत होते.
.
टीव्हीवर पूर्वी रामायण लागले की रस्ते ओस पडत .आता रस्ते ओस पडावेत म्हणून रामायण महाभारत चालू केले .तेवढे आणि एकदाच बातम्या बघणे या माझ्या शहाणपणामुळे बराच वेळ मिळू लागला.मग आमचे लग्नाचे, विविध प्रसंगाचे ,सहलीचे अल्बम  बाहेर निघाले. अलीकडील मुलीचे लग्न, नातवंडाचे बारसे याच्या सीडीज लावल्या.मनाने त्या त्या वयात फेरफटका मारून आले.
.
एकत्र बसून पाहताना गमतीजमती सांगताना संवाद सुरू झाला.एकमेकांत विश्वास वाढला म्हणूनच की काय एकदा मिस्टर म्हणाले “केस वाढलेत सलून बंद आहेत ;तू कापशील का केस?मी म्हटले “त्यात काय !मध्येतर पूर्णचंद्र आहे.मग फणी व कात्री यांची झटापट, करत आजूबाजूचे केस कापले आणि काय आश्चर्य त्यांच्या पसंतीस उतरले की!
आणखी एक गोष्ट केली. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून ज्या सामाजिक संस्था गरीब गरजूना धान्य किंवा जेवणाची सोय करत होत्या त्यातही मी योगदान देऊन खारीचा वाटा उचलला. एकट्या राहणाऱ्या मैत्रिणी,नातेवाईक यांना आवर्जून फोन करून आपुलकीने चौकशी केली.त्यांना खूप धन्यता वाटली.स्नेहबंध घट्ट झाले️
.
सेवानिवृत्ती नंतर विरंगुळा केंद्र,गायन, भजन,महिला मंडळे यात गुंतून छंद जोपासत होतेच.अशाच काही संस्थांमार्फत झालेल्या पत्रलेखन ,कथा, काव्य अशा स्पर्धेत मी सहभाग घेतला.’या वयातही ‘मला चक्क बक्षिसे ,प्रशस्तिपत्रके मिळालेली पाहून स्वर्ग दोन बोटे उरला .आमचे अहोभाग्य म्हणजे आमच्या मराठा मंडळ महिला आघाडीने ऑनलाइन विविध खेळ व स्पर्धा घेऊन या काळात आम्हाला गुंतवून ठेवले.स्पर्धांच्या किती तर्हा!हाऊजी ,भेंड्या उखाणा क्वीन ,कविताक्वीन अशा अनेक!हा लेख प्रपंच हाही त्याचाच एक भाग आहे.किती मज्जा !खरंच यामुळे आम्हाला मराठी टायपिंग ,इंटरनेट, गुगलचा  वापर कळला व आम्ही अधिक जवळ आलो.सख्यांची दाद ,अभिप्राय ,कौतुक यामुळे प्रेरणा मिळून सुप्त गुण वाढीस लागले. खरंच आयोजकांच्या कल्पकतेला व मेहनतीला माझा सलाम !त्यांमुळेच या लाॅकडाऊन मध्ये माझी ‘ मी’ मला नव्याने गवसले.
.
सौ.शुभदा परब.


Leave a Reply