.
प्रत्येक व्यक्तीमध्ये(IQ) हा उच्च दर्जाचा असतो. अशा अनन्यसाधारण व्यक्ती मी माझ्या या लिखाणात आणल्या आहेत. या आयुष्यात वाटचाल करतांना त्यांची पायवाट खूप खडतर व काट्याकुटयांनी, दगडधोंड्यानी भरलेली होती. कधी कधी अपमानीत होऊन त्यांना वाटचाल करावी लागली. अशाच काही स्त्रीशक्तींचा मी येथे ऊहापोह करणार आहे.
.
संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांची बहीण. वारकरी संप्रदायाला भक्तिमय वातावरणात आणण्याचे काम मुक्ताबाईने केले. दरवाजा बंद करुन रुसून बसलेल्या आपल्या भावाने(ज्ञानेश्वरांनी) ताटी(झडप) उघडावी म्हणून *’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’* हा अभंग रचला. संत वाड्ःमयात त्यांचा ज्ञानबोध हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. दुसऱ्या संत जनाबाई…. संत कवयित्री. यांनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. त्यांनी आपल्या *विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा* हा अभंग व इतर ३५० अभंगांतून लोकांना भक्तिमार्गात आणले व जनजागृती केली. अशा थोर स्त्रीसंतांना माझा प्रणाम
.
शिवकालीन युगात शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतावणारी माता, शिवाजी महाराज शूरवीर,आदर्श शासनकर्ता,संस्थापक अशा अनेक विशेषणांनी प्रसिद्ध व्हावे म्हणून जिजाऊने खूप कष्ट केले. पेशवेकाळात प्रजेच्या कर्तव्यदक्ष,शक्तिशाली, हुशार गुणवन्त माता,धुरंधर राजकारणी तसेच लढवय्या अशा अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक या पदवीने लोक संबोधू लागले. तसेच मुलाला पाठीशी बांधून लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई या साहसी व पराक्रमी स्त्री ने इंग्रजांशी कडवी झुंज देत इतिहासात आपली विजयगाथा अजरामर केली.
.
समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात विधवांच्या बाळंतपणासाठी पुण्यात दवाखाना आणि स्त्रियांसाठी आश्रम काढला. उजळ माथ्याने आई होता यावे म्हणून उचललेले हे कृतीशील पाऊल!! अथांग सागर ममतेचा आधार वृक्ष असलेल्या, निराधार, मंदबुद्धी, विकलांग बालकांना जवळ घेऊन त्यांना प्रेम आणि माया देणाऱ्या थोर समाजसुधारक विश्वमाता मदर तेरेसा याना त्रिवार वंदन!! तसेच आधुनिक काळातील अनाथ मुलांची आई बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांचे मातृत्व स्वीकारून त्यांना वत्सल्य आणि प्रेम दिले.
.
आपल्या कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर अमेरिकेत जाणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. तेथे त्यांनी वैदयकीय शिक्षण घेऊन MD ची पदवी मिळवली. MD साठी त्यांनी (हिंदू आर्य लोकांमधील प्रसूती शास्त्र) हा प्रबंध लिहिला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर चा मान मिळविला. आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील… अतिशय प्रेमळ व कर्तव्यदक्ष आणि आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी… अतिशय कर्तव्यदक्ष व राजकारणी व्यक्तिमत्त्व!! आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्या खूप झटल्या. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला. भारताची माजी धावपटू पी. टी. उषा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, नेमबाजीत अंजली भागवत, महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि आय. पी.एस. अधिकारी नीला सत्यनारायण, तरुण स्त्री पोलिस कमिशनर रश्मी करंदीकर , या सर्वांनी आपल्या अंगभूत गुणांनी व चिकाटीने आपला हा खडतर प्रवास चालू ठेवला.
.
अशा या अनेक दिव्यशक्ती आपल्या देशाला लाभल्या. यांनी आपला समाज सुधारण्यासाठी अपार कष्ट घेतले. म्हणून या आणि इतर समाजधुरीणींच्या चरणी *कर माझे जुळती!!*
.
सौ. वंदना लोटणकर.