.
‘माझ्या आवडत्या विषयावरील लेख’ या संदर्भात जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनात विचारांची चक्र फिरू लागली आणि मनातून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद आला की, आपण योगविषयी लिहावं. हो, माझा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे “योग”. परंतु मंडळी.. मी योगी वैगरे नाही बरं का, तर संसारात राहून योगविषयी मला मिळालेले ज्ञान आणि माझे अनुभव आपणांसमोर थोडक्यात मांडता यावे यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. योग चा अर्थ होतो ‘जुळवणे’ ज्याप्रमाणे सध्या कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये विविध माध्यमातून आपण आपल्या मनाच्या तारा जुळवून ठेवल्या आहेत. अगदी तसंच योगशास्त्रामध्ये शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘योग’ होय. थोडा वेळ शांत बसून आपल्या श्वासांचे निरीक्षण करणे हाच तर योगचा ‘श्रीगणेशा’ आहे. तरंग थांबल्यावर तलाव जसा शांत होतो व त्याचा तळ दिसू लागतो अगदी तसेच मनाचेही असते. मन शांत झाले की आपले स्वरूप आपल्याला दिसू लागते. परंतु सतत कामाच्या दगदगीमुळे आपण वेळ देऊ शकत नाही म्हणूनच तर संतांनी देखील लिहून ठेवले आहे.
.
*बैसोनि निवांत, शुद्ध करी चित्त*
*तया सुखा अंत पार नाही.*
.
माझा योगचा प्रवास हा योगायोगच म्हणावा लागेल. माझं योगशी नातं कसं जुळलं तर 2002 मध्ये माझे मिस्टर ऑफिसच्या ट्रैनिंग साठी बाहेर गेले होते, त्यावेळी त्यांना इतर कार्यक्रमांबरोबर एक तास योग शिकवून करून घेत होते. ते घरी आल्यानंतर मलाही योगविषयी मनामध्ये आस्था निर्माण झाली आणि राहत्या परिसरात योगवर्ग शोधण्याची मोहीम हाती घेतली आणि मग त्याविषयीची जिज्ञासा वाढतच गेली. त्यावेळी योग माझ्यासाठी बाल्यावस्थेत होता, आता अठरा वर्षानंतर तो प्रौढावस्थेत आहे. परंतु म्हणतात ना, ज्ञान हे अगणित असते. त्याला अंत नसतो. त्यामुळे खूप गोष्टी आत्मसात करावयाच्या आहेत.
.
योग हे रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक अश्या दुहेरी स्तरावर अमृततुल्य आहे. सर्वांना माहीतच असेल की आपलं शरीर आणि हे विश्व, पंचमहाभूतांपासून बनलेले आहे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे सामर्थ्यही आपल्यातच आहे. शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन झाले नाही तर अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून योगमध्ये शुद्धिक्रिया, यम नियमाचे पालन, आसनं, प्राणायाम इत्यादींचा अभ्यास करून शरीरांतर्गत इंद्रियांची कार्यक्षमता विकसित करता येते. यामध्ये होणारी सामुदायिक प्रार्थना, मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करते. एकात्मता वाढून सामाजिक विकास साधता येतो. आत्मविश्वास वाढून मनातील भीती, अमंगल दूर करता येते. आपलं शरीर म्हणजे जणू एक बंद खोली आहे, शुद्धिक्रिया करून योगासने, प्राणायामाद्वारे एक-एक खिडकी, एक-एक दरवाजा उघडून ती खोली, थोडक्यात आपलं शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवता येते.
.
माझा एक अनुभव मला इथे शेअर करायला आवडेल. नुकताच माझा योगचा ञैमासिक वर्ग पूर्ण झाला होता आणि आम्ही जम्मू ला गेलो होतो वैष्णोदेवीच्या दर्शनाला. तिथे पोहचल्यावर आम्हांला जाणवले की, तेथील तापमान खूप कमी झाले आहे आणि मला सर्वात जास्त थंडीचा त्रास जाणवू लागला, काय करावं काहीच सुचेना त्याप्रसंगी मी योगमधील काही क्रियांबरोबर उज्जयीघर्षण केले त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होऊन मला हळू हळू आराम वाटू लागला आणि त्यादिवसापासून माझा योगवरचा विश्वास वाढत गेला. अशाप्रकारचे अनेक अनुभव घेत घेत मनामध्ये एक ठाम मत झालं की *योग हे एक अनुभवाचे शास्त्र आहे.*
.
माझ्या अनुभवानुसार योग करण्यासाठी आत्मश्रद्धा आणि संयम असावा लागतो आणि या दोन्ही गोष्टी स्त्रियांमध्ये सर्वांत जास्त असतात म्हणूनच तर ‘स्त्री’ला शक्तीचे प्रतीक मानले आहे आणि ही शक्ती – योग, प्राणायाम व भक्तीने प्राप्त होते आणि तिथूनच योगची व्याख्या सुरु होते जी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व पुढे जाऊन सामाजिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते. माझ्यामते आजची स्त्री सशक्त तर आहेच आणि योगाभ्यासाने तिच्या पंखांना अजून बळ प्राप्त होऊन होणारी भावी पिढी अधिक सशक्त व बुद्धिमान होईल यात शंका नाही. मला इथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, योग म्हणजे केवळ आसने नव्हेत. बऱ्याच वयस्कर मंडळींची खंत असते की वयोमानानुसार आसने त्यांना जमणार नाही. याबाबतीत माझे वैयक्तिक मत असं आहे की अशा मंडळींनी सत्संग बरोबर योगमधील काही श्वासांशी निगडित प्राणायाम, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्याने निश्चितच लाभ मिळतील.
.
भारतातील काही जगविख्यात योगसंस्थाने उदा. बिहार स्कूल ऑफ योगा, स्वामी विवेकानंद योगकेंद्र कन्याकुमारी, परमार्थ निकेतन ऋषिकेश, अम्बिका योग कुटीर ठाणे, इत्यादी संस्थांनी पुरातन ऋषी मुनींपासून मिळालेल्या पारंपरिक योग पध्दतीचा प्रसार करण्याचे अनेक उपक्रम करीत आहेत. ज्याप्रमाणे भगवद्गीता समजण्यास कठीण होती, ती संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ तून सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत सांगितली तसेच योग हे महाकठीण कार्य आहे आणि हे काम अनेक संस्थानांमधून होत आहे आणि ते निश्चितच स्तुत्य आहे.श्री अंबिका योग कुटीर संस्था ही तर योग,आयुर्वेद व अध्यात्म म्हणजे गंगा, यमुना व सरस्वती यांचा सुरेख त्रिवेणी संगमच आहे. याच धर्तीवर आम्ही योगशक्षिका गेले तीन वर्षांपासून मराठा मंडळ मुलुंड सारख्या प्रचलित सामाजिक संस्थेमध्ये महिलांसाठी योगवर्ग चालवीत आहोत. तेथील कर्मचारी वर्गापासून ते पदाधिकारी या सर्वांचे मिळालेले योगदान हे सर्वांसाठी अमूल्य आहे.
.
*आजच्या काळात योग हा चर्चेचा विषय (Hot Topics)आहे. जनजागृती झाली आहे.* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने सुद्धा ‘योगविषयी जागृती’ दर्शवली आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन मी व माझी योगशिक्षिका मैत्रीण मागचे चार महिने ऑनलाईन विनामूल्य योगवर्ग घेत आहोत. तांत्रिक अडचणींवर मात करीत करीत साधकांकडून येणारा सकारात्मक प्रतिसाद मनाला आनंद, समाधान आणि उभारी देऊन जातो
आणि म्हणूनच विश्वासाने लिहावेसे वाटते.
.
*An hour of yoga in a day, keeps physical and psychological problems away.*
सौ. शुभदा चव्हाण