*’लोकसत्ता’ हया सुप्रसिद्ध वृत्तपत्रात मांडलेल्या व्याख्येनुसार ‘सोशल मिडीया’ म्हणजे घराघरातील आजी-आजोबांसाठी अनोळखी, आई-वडिलांसाठी उत्सुकता निर्माण करणारा अणि आम्हा तरुणांसाठी आमच्या ‘डीएनए’त असणारा अवलिया शब्द!!!*.
*आजकाल सोशल मिडिया वर नसणे म्हणजे काळासोबत नसल्याचे लक्षण मानले जाते. सोशल मीडिया म्हणजे खरं तर सामाजिक संबंध जोडणारे माध्यम. इंटरनेट चा शोध ही तर जगाला मिळालेली अद्भुत ठेव!!. आपण कितीही म्हटले ,”ह्या समाज माध्यमांमुळे माणसा-माणसांमधले संबंध बिघडले, त्यांच्यात दुरावा आला,संवाद कमी झाला. तरी आपल्याला हे विसरुन चालणार नाही की ह्याच माध्यमांद्वारे शाळा-कॉलेज संपल्यानन्तर दुरावलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा जवळ आले, परदेशात निवास करणारे नातेवाईक व्हिडीओ कॉल वर वाढदिवस, सण-समारंभ साजरे करू लागले. हल्ली परदेशात राहूनही भारतातील एखादया मित्राचे लग्न याची डोळा पाहता येणे शक्य झाले.*
*सोशल मीडियाने मानवी आयुष्य सोपे व सुखकर झाले आहे. आजच्या काळात कांदेपोहे ऐवजी सोशल नेटवर्किंग साइट्स वर लग्न जुळते. महिला सबलीकरण तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सोशल मीडिया ने घेतली आहे. कित्येक लघु उद्योग या समाजमाध्यमांमुळे मोठे झालेले दिसून येतात. कितीतरी महत्वाच्या मीटिंगस,चर्चासत्र या माध्यमातून होतात.पैसा, वेळ वाचतो. ‘युट्यूब’ सारख्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचते. दिग्गज लेखकांचे लेख, डॉक्टरांची भाषणे, गाणी, कविता, बातम्या, ऐतिहासिक स्थळे, जगात घडणाऱ्या असंख्य गोष्टींचा आढावा, अशी असंख्य प्रकारची माहिती उपलब्ध होते.*
*सोशल मिडीयाला ‘समाजमनाचा आरसा’ असेही संबोधतात. येथे माणसे एकत्र येतात, व्यक्त होतात, वैचारीक देवाणघेवाण होते. गुन्हेगारी, अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी समाजाचा मोठा वर्ग एकत्र येतो. लॉकडाऊन मध्येही महत्वपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचावण्याचे काम ह्या सोशल मीडियाने केले. शालेय मुलांचे ऑनलाईन वर्ग सोशल मिडीया च्या माध्यमातून घेणे सोप्पे झाले.*
*जसे येथे माणसे जोडली जातात तशी ती दुरावतातही. अत्यंत प्रक्षोभक,अश्लील अशा पोस्ट्स ,फोटो शेअर केले जातात. अशा संदेशांमुळे तरुणवर्ग चुकीच्या वळणाकडे जातो, समाजात शांतता व सुविचार नांदत नाहीत. सोशल मीडिया सामजिक नव्हे तर वैयक्तिक बनत चाललाय. प्रत्येकाने आपले फोटो फेसबूक , इन्स्टाग्राम वर पोस्ट करताना आपली प्रायव्हर्सि settings बरोबर आहेत ना याची काळजी घेतली पाहीजे. आजकाल सोशल नेटवर्किंग साइट्स वर लग्न जमतात तशी मोडतात ही. प्रत्येक माणसाचे सोशल लाईफ हे त्याच्या पर्सनल लाईफ सारखेच असेल असे नाही. ह्यातून फसवणुकीसारखे प्रकार घडतात. सोशल मीडिया वर प्रेमासारख्या नाजूक गोष्टींचाही बाजार झाल्याचे दिसते. आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात रस घेताना दिसून येतो. सोशल मीडिया चे व्यसन तरुणवर्गाचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक जीवन धोक्यात टाकत आहे.*
*सोशल मीडिया ही जादूई दुनिया आहे. त्यात हरवून जायचे की सद्सदविवेक बुद्धीने विचार करून त्याचा योग्य रीतीने वापर करायचा हे आपल्याच हातात असते.ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चुकीचाच. तरुण वर्गाने सोशल मिडीयासोबतच आपले छंद जोपासावेत, क्रीडा-संगीत-नाटक इ.गोष्टींमध्ये आपले मन आणि वेळ गुंतवावा.आपला दृष्टीकोनच आपले व्यक्तीमत्व घडवत असतो हे ध्यानात ठेवावे. सोशल मीडिया शाप की वरदान हे आपले आपणच ठरवायचे. शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार!!!! आपण आपले विचार स्वच्छ व शुध्द ठेवले तर सोशल मीडिया शाप वाटणारच नाही.*
*चला तर मग, आपण सर्वांनी आपल्या मनाशी पक्कं ठरवूया “आम्ही सोशल मीडियाचा गरजेपुरता आणि योग्य वापर करू”. सोशल मीडिया आमच्यासाठी कायम वरदानच ठरेल, आम्ही त्याला शापाचे स्वरूप येऊ देणार नाही!!!*
कु.साक्षी ब्रीद