माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण

        प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अविस्मरणीय अनुभूती नक्कीच असतील! तसेच माझ्या आयुष्यातील कधीही विसरता न येणारा मौल्यवान क्षण म्हणजे ,’लेह- लडाख’चा प्रवास! सन २०१३ मध्ये निवृत्त झाल्यापासून मी लेह लडाखला जायचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि जुलै २०१६ ला माझे स्वप्न सत्त्यात उतरले. काय आनंद  झाला म्हणून सांगू? बरेच वर्षे ‘लेह -लडाख’ चे वर्णन फक्त ऐकत होते. पण आता एका सहलीबरोबर आम्हा उभयतांना प्रत्यक्ष जाण्याचा योग आला. 
 
         सर्व प्रकारची तयारी करून २५ जुलैला लेहच्या दिशेने आमचे विमान रवाना झाले. जस जसं लेह जवळ येऊ लागलं, तसं धुक्याने वेढलेले बर्फाच्छादित डोंगर, ढगांच्या विविध नयनरम्य छटा दिसू लागल्या. लेह-लडाख अतिशय उंचीवर असल्यामुळे , तिथे वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी एक दिवस पूर्ण विश्रांती घेतली. सर्व हालचाली इथं अगदी सावकाश करायच्या असतात. लेह विमानतळावर उतरल्यावर ,सतत या सूचना चालूच असतात. 
 
          दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाने कारगिलकडे प्रयाण केले. द्रासमधील ‘कारगिल विजय स्मारक’बघितलं. तिथे जवानांच्या प्रत्यक्ष भेटीने अत्यानंद झाला. हळूहळू वातावरणाशी जुळवून घेतल्यामुळे तिथे असलेले नमकिला पास (उंची १२१९८ फूट) , फोट्यूला पास(उंची १३४७९ फूट), तांगलांगला पास, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा चांगला पास(उंची १७८००फूट) आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्वात उंच खारदुंगला पास (उंची १८३८० फूट), येथे मनमुराद थांबलो. इतक्या उंचीवर प्राणवायूची खूप कमतरता जाणवते. त्यामुळे जास्त वेळ थांबायची परवानगी नसते. इथल्या निसर्गाचे विहंगम दृश्य काय वर्णावे? क्षणाक्षणाला निसर्गाचे बदललेले रूप पहायला मिळते. आजूबाजूचा मनमोहक परिसर बघून हलावेसेच वाटत नाही. कधीही इथे सुरूंग लावून रस्ते बंद केले जातात व पुढील सूचना मिळेपर्यंत तिथून हलता येत नाही. निसर्गाच्या बदलाची अनिश्चितता असूनही, त्या ठिकाणी देशाचे रक्षण करणारे जवान बघितल्यावर उर अभिमानाने भरून येतो. तिथले जवान जिवाची बाजी लावून प्रसंगी प्राणपणाने संकटाचा मुकाबला करतात. म्हणूनच आपण आपआपल्या ठिकाणी सुरक्षित आहोत, याची प्रकर्षाने जाणीव होते. 
 
             जोरदार वाऱ्यामुळे तेथील डोंगरही विविध आकारात कापल्यासारखे भासतात. डोंगराच्या इंद्रधनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या छटाही अवर्णनीयच ! इथल्या ‘पेंगाॅंगलेक’ चे निळेशार पाणी पाहून मन मोहून जाते. नजर पोहचत नाही इतकी १३५ किमी लांब व ७ किमी रूंद अप्रतिम असा हा लेक आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा खाऱ्या पाण्याचा लेक असून ,पाणी अतिशय थंड आहे.लडाखमधील हुंडेर येथील  ‘सॅण्डड्यून्स’ हे आणखी एक आश्चर्य! वाऱ्याचा वेग इतका प्रचंड असतो की,त्यामुळे इथे वाळूचे विविध आकार तयार होतात. लेहमध्ये ‘ हाॅल आॅफ फेम’ हे तर युद्धाच्या आठवणी जाग्या करणारे जीवंत म्युझिअम बघितले. तिथे असलेली पत्रे वाचून मन गलबलून गेले. इथल्या प्रवासात “सिंधु- झंस्कार“ नदीचा खूपच विलोभनीय असा संगम पाहिला. सिंधु नदीचे पाणी काळसर व झंस्कार नदीचे पाणी निळसर पांढरट.अतिशय रमणीय असे दृश्य अनुभवले. निसर्गाच्या रौद्र रूपाचाही अनुभव घेतला.
 
        लेह-लडाखला जाणे म्हणजे जणू स्वर्गसुखच ! निसर्ग सौंदर्याचा जणू सुंदर नजराणाच ! इथले निसर्ग सौंदर्य डोळ्यात मनसोक्त साठवून आम्ही परतलो.अजूनही लेह-लडाखचा विषय निघाला की,तिथली दृष्ये डोळ्यांसमोर येतात. ही सहल म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच !     
 
सौ.प्राची पालव