सौ. विभा भोसले
निवृत्त शिक्षिका
आपलं मुलुंड
“आपलं मुलुंड”, वा! किती सुंदर कल्पना आहे! आम्हाला प्रेम देणारे, आमच्या सुख-दुःखांसोबत असलेले “आपलं मुलुंड”! “तुम्ही कुठे राहता?” या प्रश्नाचे उत्तर “मुलुंडला राहते” असे दिल्यावर समोरील व्यक्तीकडून “वा!” तुम्ही भाग्यवान आहात” अशी प्रतिक्रिया ऐकून छाती अभिमानाने भरून येते.
.
एप्रिल १९८५ मध्ये मी परेलहुन मुलुंड(पूर्व) ला सहकुटुंब महाकाली नगर मध्ये नवीन ब्लॉक मध्ये रहायला आले. सुरुवातीला मुलुंड दूर व नवखे वाटले. माझी शिक्षिकेची नोकरी परेलला आणि निवास मुलुंडला, कसे जमणार? घरी 3 मुले, सासू-सासरे आणि आम्ही उभयतां नोकरी निमित्त दिवसभर घराबाहेर. पण सुदैवाने प्रेमळ शेजार आणि मुलुंडमधील शांत , सुरक्षित वातावरण यांमुळे अल्पावधीतच कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी दूर झाली.
.
मुलुंड मधील निसर्गाने तर मला मोहिनीच घातली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरव्या झाडांनी आम्हाला कायम सावली दिली. येथील चिंतामणी उद्यान, संभाजी पार्क, तारासिंग उद्यान व इतर अनेक छोट्या उद्यानांनी माझी फिरण्याची व मुलांना बागेत खेळायला नेण्याची कायम हौस पूर्ण केली. मुलुंड मध्ये शैक्षणिक व्यवस्था उत्तम असल्याने मुलांचे प्राथमिक, माध्यमिक विद्यालयीन शिक्षण सुरळीतपणे पार पडले. मुलुंड मध्ये वी.स. खांडेकर वगैरे अनेक सुसज्ज वाचनालये असून रसिक वाचक नित्य या वाचनालयांचा लाभ घेतात. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड मराठा मंडळ हे तर मुलुंडकरांना मोठे आकर्षण आहेत. येथील साहित्य, नाट्य, संगीत कार्यक्रमाना उपस्थित राहून आनंद लुटण्याची आम्ही कायम संधी घेतो. शिवाय कालिदास नाटक मंदिर आमची नाटकांची आवड पुरविते.
.
संभाजी पार्क सारखी मैदाने मुलांना खेळण्यासाठी कायम उपलब्ध असतात. कल्पना विहार,आराधना, मराठा महिला आघाडी, मैत्रेयी या महिला मंडळांनी मला खूप मैत्रिणी दिल्या. येथील विविध उपक्रमांत मी नेहमी सहभागी होते. गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्री इ. उत्सवांनी मुलुंडची संस्कृती कायम जपली आहे. असे हे “आपले मुलुंड” मला फार आवडते.