आपलं मुलुंड

सौ. ऐश्वर्या ब्रीद
नीलम नगर, मुलुंड पूर्व

आपलं मुलुंड

आपलं मुलुंड..! हो आपलं मुलुंड. मी किंवा माझं कुटुंब एवढीच ओळख नाहीये  माझी या मुलुंड सोबतची , तर मुलुंडमधील तुमच्यासारखे अनेक  मित्र-मैत्रिणी, सहकारी, आप्तेष्ट, शाळा, महाविद्यालय , माहेर ,सासर… सर्व सर्व माझे इथलेच आहात. बालपणापासून इथेच. आज ४३ वर्षे झाली मला या मुलुंडच्या कुशीत येऊन. आयुष्यात जे काही मिळाले ते सर्व इथेच या शहरातच मिळाले…अनुभवले आणि पुढेही इथेच अनुभवणार. साधारणपणे असं असतं की जिथे आपण अनेक वर्षे राहतो त्याबद्दल आपल्या मनात आदर,प्रेम असतेच. पण मुलुंडनगरी म्हणजे एक वेगळेच अनोखे रसायन आहे. आणि म्हणूनच आपण सर्व मुलुंडकरांना मुलुंड चा प्रचंड अभिमान आहे. आपण मुलुंडला राहतो हे कोणाला सांगतांना सहजच आपल्या बघा डोळ्यांत चमक दिसून येते आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर टवकार..! 
.
मुलुंड..! पूर्वीचे मूळ नाव मूलकुंद. नॅशनल पार्क अभयारण्यच्या कुशीत वसलेले गाव.  या गावातून वाहणाऱ्या मुलंदी नदीच्या नावावरून मुलुंड हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. आता या नदीचा नाला झाला आहे  पूर्वी हे ठाणे शहराचा एक भाग होते. आता एक स्वतंत्र विकसित छोटेखानी निसर्गरम्य उपनगर. मुंबईचे शेवटचे टोक. उत्कृष्ट नगररचनेसाठी प्रसिद्ध.  कोळी आणि आगरी समाजाचे मूळ स्थान. एका बाजूला नॅशनल पार्क चा डोंगर तर एका बाजूला खाडी-मिठागरे. आम्ही ४३वर्षांपूर्वी इथे रहायला आलो तेव्हा एकच रिक्षा रस्त्यावर धावत होती असे आई सांगते. मुलुंड पूर्वेकडे सर्वत्र मिठागरे, दलदल आणि त्यात उंचच उंच गवत. हे गवत काढून नेण्यासाठी बैलगाड्या यायच्या. हळूहळू शहर डोळ्यांसमोर विकसित होत गेलं.आता दिसते त्याहीपेक्षा प्रचंड हिरवळ तेव्हा होती. स्टेशन कडे जाताना दुतर्फा इतकी सावली देणारी झाडे की  कधी ऊन लागलेलं आठवत नाही.आम्ही जिथे रहायचो ते पाल्म एकर्स तसेच मुलुंडमधील अनेक सहकारी सोसायट्या या ताड,माड, आंबा,जांभूळ, चिंच, गुलमोहर, पिंपळ,वड इ. अनेक डेरेदार वृक्षांनी बहरलेल्या  आहेत. स्वछता आणि निसर्ग मुलुंड शहरात ठासून भरलेला आहे.     
.                                                                                  
काही वर्षांपुर्वी पर्यन्त मुंबईतील पार्ले शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जायचे परंतू आज मुलुंडने हा किताब आपसूकच त्यांच्याकडून आपल्याकडे खेचून आणलेला आहे. इथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. तुंगवतेश्वर मंदिर, जैन मंदिर, अंबाजी,संतोषीमाता मंदिर इ. अनेक देवळे ही मुलुंडची श्रद्धास्थाने. जन्माष्टमी-दहीहंडी,गणेशोत्सव, दिवाळी,होळी,नवरात्र तसेच ईद, ख्रिसमस सारखे अनेक सण  तसेच इथली गावदेवी श्री एकविराआई  चा उत्सव इथे एकत्र धुमधडाक्यात साजरे होतात. 
.
शिवजयंती मिरवणूक, गुढीपाडव्याला संपूर्ण मुलुंडच्या रस्त्या रस्त्यावरच्या  रांगोळ्या, नववर्ष शोभायात्रा यातून एकता ,सामाजिक संस्कार व नीतिमत्ता यांचे दर्शन घडते.अनेक सामाजिक संस्था इथे समाजासाठी कार्य करत आहेत. अनेक महिला मंडळे महिलांसाठी करमणूक तसेच महिला सबलीकरण विषयी काम करत आहेत. संगीत,नृत्य, कला विषयक विद्यालये येथे चालवली जातात. मराठा मंडळ,महाराष्ट्र सेवा संघ, मराठमोळं मुलुंड सारख्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था इथे दिमाखात उभ्या आहेत.
.
मराठा मंडळ ची वास्तू ही मुलुंडनगरीचे सौन्दर्य स्थळ..! या संस्थेत आपण सर्व  एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो तसेच अनेक उत्कृष्ट,दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो. इथे सभासदांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला जातो. सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणे इथेच शिकायला मिळाले. देशमुख उद्यान,संभाजी मैदान, जिमखाना, पाच रस्ता गार्डन सारख्या अनेक छोट्यामोठ्या उद्यानामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खेळण्याची, मॉर्निंग वॉक ची सोय आहे.सर्व वयोवृद्ध नागरिक येथे एकमेकांसोबत आपला वेळ घालवतात.
.
मुलुंड पश्चिमेला भव्य असे प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे. इथे  नाटकवेड्या मुलुंडकरांसाठी कालिदास नाट्यमंदिर हे आलिशान नाट्यगृह तसेच जलतरण तलाव आहे. जलाराम बाप्पा मंडईत भाजी मार्केट, कपडा मार्केट, भांडी मार्केट सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. मुलुंड मध्ये अनेक छोटी मोठी रुग्णालये,स्पेशालिस्ट डॉक्टर्स,महानगरपालिकेची २ मोठी रुग्णालये,हिरामोंगी सारखे गरिबांसाठी चालविले जाणारे उत्कृष्ट रुग्णालय, वझे-केळकर आणि मुलुंड कॉलेजसारखी मोठी महाविद्यालये,मराठी-इंग्लिश माध्यम तसेच इंटर्नशनल स्कुल इ.गोष्टी आपल्याला इथे सहज उपलब्ध आहेत. मुलुंडवरून आपण सहज नविमुंबई तसेच ठाण्यात प्रवेश करू शकतो.
.
कोकण रेल्वे किंवा इतर कोणतेही प्रवास मार्ग साठी आपण मुलुंडवरून सहज  जाऊ येऊ शकतो. असे हे उत्कृष्ट टाऊन प्लॅनिंग असलेले,सर्व सोयीसुविधा असलेले, निसर्गाने नटलेले असे हे सुंदर आपले मुलुंड मला आणि तुम्हालाही फार फार आवडते.


Leave a Reply