आपलं मुलुंड

सौ. वंदना लोटणकर
सेनरुफ नाहूर मुलुंड
गृहिणी

आपलं मुलुंड

किती सुंदर विषय दिला आहे, त्याबद्दल तुमचे कौतुक आणि तुम्हाला धन्यवाद. 
   
‘मुचलिंद’ या  नागराजाच्या नावावरून मूळुंद आणि  त्याच्या अपभ्रंशावरून आजचे मुलुंड हे नाव रूढ झाले. आजचे मुलुंड हे एक अगदी छोटेसे व आटोपशीर असे उपनगर आहे. श्री रवींद्र लाड मुलुंड ची ओळख देतांना सांगतात की इतर उपनगरांपेक्षा मुलुंड ची रचना वेगळी आहे. वास्तुशास्त्राच्या अभ्यासानुसार हे नगर कमळफुलाच्या पाकळ्यांप्रमाणे डोंगर व टेकड्यांच्या रांगांमध्ये एकातएक गुंफलेले आहे. 
.
१९७० साली लग्न होऊन आम्ही मुलुंड पूर्वेला मिठागर रोडवर ,जीवननगर सोसायटीत रहायला आलो. मुलुंड हे उपनगर शांतताप्रिय व सुशिक्षीत लोकांची वस्ती असलेले ठिकाण. नन्तर थोड्याच दिवसांनी मुलांसाठी वामनराव मुरांजन  हायस्कुल ही शाळा निवडली. नन्तर पूर्वेला राणी लक्ष्मीबाई ,ठाकूर विद्या मंदिर, व्ही.पी.एम. हायस्कूल, केळकर कॉलेज अशी खूप ज्ञानपीठे झाली. तर पश्चिमेला नलिनीबाई पुरंदरे हायस्कुल,वाणी दिद्यालय आणि मुलुंड कॉमर्स कॉलेज अशी अनेक छोटी मोठी ज्ञानपीठे उदयास आली. अपना बाजार हे सुपर मार्केट झाले, प्रथमच मुलुंडला मॉल संस्कृती उदयास आली. पश्चिमेला कालिदास नाट्यगृह, जलतरण तलाव तयार झाले. त्यामुळे आमची नाटक पहायची हौस पूर्ण झाली. 
.
तसेच पूर्वेकडे गवाणपाड्यात जाताना आंब्याची खूप झाडे होती. तेथे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखे वाटायचे. तेथेच आता चिंतामणी देशमुख गार्डन उभे आहे.संभाजी पार्क सारखी छोटी मोठी मैदाने मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तेथे नाना-नानी पार्क, व्यायामाची साधने,जिमखाना या सोयी आहेत.    
.      
पूर्व द्रुतगती मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग असे दोन महत्त्वाचे मार्ग सुद्धा मुलुंड मध्ये आहेत. मुलुंडला उपनगरांचा ‘राजकुमार’ म्हणतात.      
.
आमचे मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राची मोठी भव्य वास्तू आहे.तेथे गेल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटते.तेथे संगीत,नाट्यवलोकन, नृत्य,वाचनालय, अभ्यासीका असे विविध उपक्रम चालू असतात. मराठमोळं संस्था आहे. तसेच महाराष्ट्र सेवा संघ सारख्या अनेक ज्येष्ठ संस्थांचेही उपक्रम चालू असतात. मुलुंडवासीय सगळे  उत्साहात  गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्र ढोल-ताशे- लेझीम घेऊन सामील होतात. या सणांमुळे मुलुंड ने आपली परंपरा जपली आहे आणि युवा पिढीकडे सुपूर्द केली आहे.      
.
असे निसर्गाने नटलेले आणि सर्व देवी-देवतांच्या मंदिरांनी वेढलेले आमचे मुलुंड, आमचा संपूर्ण महाराष्ट्र आणि आमचा भारतदेश कोरोनामुक्त व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.   


Leave a Reply