- January 30, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी *निरोगी मुलुंड जानेवारी 2024* हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. मनामध्ये धास्ती होती ही एकंदरच सर्व जनजीवन राममय झालं असल्यामुळे आणि २२ तारखेच्या पूर्व संध्येला बऱ्याच सोसायटी मध्ये कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल, मात्र इतक्या व्यस्त कार्यक्रमांत सुद्धा लोकांनी निरोगी मुलुंड ला खूप चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्याध्यक्ष श्री. महेश चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून, मान्यवरांकडून दीप प्रज्वलन आणि आमच्याकडून धन्वंतरी स्तवन करून झाली. डॉ. सुचेता सावंत यांनी स्वागत , तर मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला खूप गर्दी झाली. मराठा मंडळाच्या भव्य सभागृहात वारंवार खुर्च्या वाढवाव्या लागत होत्या. सायंकाळीं साडे चार ते रात्री नऊ पर्यन्त श्रोते वक्त्यांची भाषणे ऐकायला बसले होते, हे विशेष. डॉ.राजीव कर्णिक ,डॉ. सुब्रमण्यम आणि डॉ. मंजुषा कुरुवा या तज्ज्ञांनी उत्तम व्याख्याने दिली
*श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. नटराजन सुब्रमणीयन* यांनी “प्रदूषणाचे श्वसनमार्गावर होणारे अपाय आणि उपाय” या विषयावर श्रोत्यांशी गप्पागोष्टी करत आणि नेमकी चित्रं दाखवत उत्तम व्याख्यान दिले. त्यानंतर *त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मंजुषा कुरुवा* यांनी प्रदूषणाचे त्वचेवर होणारे अपाय आणि उपाय या सर्वांच्या आवडत्या विषयावर सहज समजेल असे छान व्याख्यान दिले. त्यानंतर *हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजीव कर्णिक* यांनी प्रदूषणाचे हृदय आणि मस्तिष्क यांवर होणारे अपाय आणि उपाय या विषयावर अतिशय विद्वत्तापूर्ण, वैज्ञानिक माहिती परिपूर्ण तरीही लोकांना समजेल, आवडेल असे उत्कृष्ट व्याख्यान दिले.
सरतेशेवटी *वैद्य अश्विन सावंत* यांनी तर आपल्या व्याख्यानाने अक्षरशः श्रोत्यांना खिळवून ठेवत, लोकांचे डोळे उघडणारे व विचार करण्यास प्रवृत्त करणारे तडफदार व्याख्यान देऊन निरोगी मुलुंड कार्यक्रमावर कळस चढवला.सर्वच तज्ज्ञांनी उत्तम व्याख्याने दिली आणि लोकांना अपेक्षा होती त्याप्रमाणे प्रदूषणावर फार चांगले मार्गदर्शन केले.
सर्वच डॉक्टर मंडळींचे प़बोधन अत्यंत श्रवणीय होते, प्रेक्षक खुर्चीला खिळून बसले होते. सर्वच डॉक्टरांच्या ओघवत्या शैलीतील माहिती आणि ज्ञानाने प्रेक्षक भारावून गेले होते. डॉक्टर अश्विन सावंत यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने एकूण कार्यक्रमावर खरोखरच कळस चढवला. डॉ. सौ. सुचेता मॅडम यांचे सूत्रसंचालन सुध्दा तितकेच प़भावी आणि कार्यक्रमाला सुसंगत होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के, सचिव श्री. अजय खामकर, आरोग्य विभागाचे श्री. राजन भोसले भोसले, कार्याध्यक्ष श्री. महेश चव्हाण,उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण, ऐश्वर्या ताई, अस्मिता ताई, माधुरीताई, रश्मीताई यांचे आणि मराठा मंडळाच्या प्रवेशद्वारावर “प्रदूषण व आरोग्य” या विषयाला समर्पक अशी रांगोळी सौ.करुणा सावंत यांनी काढली समर्पक रांगोळी, चाळके साहेबांचां रुचकर नाश्ता असे इतर अनेकांचेही हातभार लागले आहेत.
हा संस्मरणीय कार्यक्रम म्हणजे प्रदूषण आणि अनारोग्याच्या धुळवडीतून निरामय आयुष्याच्या पथा प्रती मार्गक्रमणा करणाऱ्या बुध्दीजीवी पामरांना अश्विनीकुमार यांच्या अनुयायाने दिलेला महाप्रसाद म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
वैद्य श्री. व सौ. सुचेता अश्विन सावंत या विनयशील उभयतांस जनसामान्यांचे आरोग्य मार्गदर्शक म्हणून शतायुषी दीर्घायुरारोग्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना.