“अष्टपैलू अत्रे”

संपूर्ण आयुष्य मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी वेचणारा एवढा मोठा प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भीड माणूस या महाराष्ट्रात होता, हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. महाराष्ट्र कळायचा असेल, तर आचार्य अत्रे वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत, म्हणून मुलुंड आणि पूर्व उपनगरातील २६ सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन झालेल्या आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती मुलुंड या संस्थेनेअष्टपैलू अत्रेहा संगीतमय आणि नाट्यविष्कार असलेला एक  देखणा कार्यक्रम, १२५ व्या आचार्य अत्रे जयंती निमित्त मराठा मंडळ मुलुंड मुंबई या संस्थेच्या सांस्कृतिक इमारतीच्या सभागृहात १३ ऑगस्टला संपन्न झाला.

पडदा उघडण्यापूर्वीच्या निवेदनातून, अत्र्यांच्या साहित्यातुन काय निवडावं आणि काय पाखडावं हे भलं मोठं प्रश्न या कार्यक्रमाची गुंफण करताना आला असं सांगितलं गेल, कारण अत्र्यांसारख्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा वेध, एका अडीच तासांच्या कार्यक्रमात सुसूत्रपणे घेणं ही कठीण गोष्ट आहे.

या कार्यक्रमाचेअष्टपैलू अत्रेहे शीर्षक गीत गाणारे गोड गळ्याचे गायक श्री. राजेश सावंत आणि डॉ. नेहा सावंत यांनी हे गाणं गाऊन कार्यक्रमाची सुंदर सुरवात झाली.   

पडदा  उघडल्यावर माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करणारे अत्रे, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हि गर्जना आणि गेल्या दहा हजार वर्षात होणार नाही हे अत्र्यांचे ठरलेले वाक्य या तीन ठळक वैशिष्टयांनीअष्टपैलू अत्रेया सुरुवातीच्या प्रसंगाने प्रेक्षकांची पकड घेतली

छडी लागे छम छमगाण्यावर वामनराव मुरांजन या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले नृत्य राहुल शेरेकर यांच्याकडून बसवून घेतल होत आणि त्याच तेव्हढंच चांगलं सादरीकरण विद्यार्थ्यांनी जणू काही, अत्र्यांच्या बालपणीचा काळचं दाखवला.

विहान थिएटर या हौशी नाट्य संस्थेच्या निलेश जाधव, किरण नवीन आणि निलेश ठाकर या तीन कलाकारांनी अत्र्यांचे मराठी रंगभूमी वरील पहिले नाटकसाष्टांग नमस्कारया नाटकाचा मधु शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला देखणा नाट्य प्रवेश खूप सुंदर पद्धतीने सादर करून यात निलेश जाधव अभिनयात भाव खाऊन गेला.      त्याआधी, निनाद परसणीकर आणि डॉ. नेहा सावंत यांच्या नांदीने तर बहार आणून प्रेक्षकांना जुन्या संगीत नाटकांच्या काळातच नेलं.               

                                         

नाट्यसंगीत  म्हणून  ‘ती पाहताच बाला’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, पासून तेटांग टिंग टिंगा’, ‘देह देवाचे मंदिरअशी पदं तसंच  चित्रपटगीतं म्हणूनयमुना जळी खेळू खेळ कन्हैया’, ‘श्यामची आईमधलंभरजरी गं पितांबर  अशी गाणी सादर केली गेलीडॉ. नेहा सावंत, मधुश्री काकिर्डे, निनाद पसरणीकर, प्रणय बनसोडे  या सर्व गायकांनी आपापली जबाबदारी चोख सांभाळून रसिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले.

भरजरी पितांबर‘, ती पाहताच बाला आणियमुना जाळी खेळू‘  या तीनही  गाण्यावर सादर केलेली  नृत्य संरचना अतिशय देखणी होती. यात भाग घेतलेल्या सोनल सावंत, रुपाली  शेलार, ऐश्वर्या ब्रीद, सोनाली कदम, शुभांगी ठाकरे आणि समीक्षा पाटील यांच विशेष कौतुक व्हायला हवं.

 

युगंधरा वळसंगकर आणि वेदांगी कुलकर्णी यांचे कथा वाचन अत्र्यांच्या साहित्याचे महत्व अधोरेखित करत कार्यक्रमाची मागणी पूर्ण करणारे होतेयुगंधरा वळसंगकर यांचं अभिवाचनाचे संवाद कौशल्य, आवाजातील माधुर्य आणि त्यावरची पकड वाखाणण्याजोगी होती. वेदांगी कुलकर्णी यांनीदिनुच बीलया कथेतून आईच्या निस्वार्थ प्रेमाची महती अधोरेखित करून आपल्या आवाजाच्या वेगळ्या शैलीतून आवाजातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं.    

निवेदकांच्या चार जोडगोळ्या अत्र्यांचे साहित्य, संगीत, अग्रलेख, कथा, कविता या सर्व भागांची आपल्या निवेदनातून चांगली गुंफण करून उत्तम प्रकारे दुवा साधण्याचे काम चोख पार पाडत होते. यात शुभदा महामुणकर, मनाली महाडीक, रूही घोरमाडे, अमित बोगर, समृद्धी घोसाळकर, हेमंत लाड, सचिन भूसारी, सुजित कवे, पार्थ, अंकिता सोवनी  या सर्वानी निवेदकाची भूमिका चोख बजावली.

                                             

कार्यक्रमाचा शेवट वेध अकॅडेमी डोंबिवली या हौशी नाट्य संस्थचे दिग्दर्शक संकेत ओक यांनी बसविलेल्या मोरूची मावशीने झाला, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. विशेष आकर्षण म्हणजे निलय घैसास यांनी साकारलेली मोरूच्या मावशीने सर्व प्रेक्षकांची हसता  हसता पुरेवाट झाली. बक्षीस समारंभाच्या वेळी प्रेक्षकांनी  ‘टांग टिंग टींगा’  या गाण्यावर वर निलय घैसास याला वन्स मोर घायला लावला.

                                   

                                     

अत्र्यांच्या अग्रलेखाने मराठी माणसांच्या मनात मशाल पेटवण्याचे काम केले. त्यांच्या अग्रलेखाची भाषा जळजळतीं जरी असली तरस्वरलताया अग्रलेख मध्ये मराठी भाषेच सौदंर्य, मराठी भाषेचे सौष्ठव काय असतं हे दाखून देतांना  “स्वरलताया अग्रलेखाचे वाचन  करताना संतोष सावंत यांनी अत्र्यांचे शब्द मोठया समर्थपणे नजाकतीसह सादर केले, तसच प्रफुल आचरेकर यांनीमहाराष्ट्र गौरगाथाया अग्रलेखाचे वाचन सुद्धा आपल्या खर्जातील आवाजातून योग्य रीत्या  सादर केले.  

                                             

सिने नाट्य अभिनेता विघ्नेश जोशी यांनी काही भागाचे निवेदन करूनलखोबा लोखंडेही भूमिका साकार करताना त्यांच्यातला कलाकाराची विशेष छटा दाखवून दिली. विशेष म्हणजेतो मी नव्हेचनाटकातील भूमिका अजरामर केलेले  पंत प्रभाकर पणशीकर यांच्या सोबत विघ्नेश जोशी यांनी काम केलं आहे आणि तोच धागा पकडून पणशीकरांनी अत्र्यांच्या सांगितलेल्या आठवणी, विघ्नेश जोशी यांनी अत्रे प्रेमी रसिकांसमोर ताज्या केल्या.

     

विघ्नेश जोशी यांना अत्रे थिएटरचे मराठी रंगभूमीला योगदान काय ? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी “तो मी नव्हेच” या नाटकामध्ये फिरता रंगमंच ही संकल्पना रंगभूमीवर पहील्यांदा सादर केली गेली हे अत्रे थिएटरचे खूप मोठे योगदान आहे असं सांगत तो फिरता रंगमंच कश्या पद्धतीने बनला याची संपूर्ण हकीकत आपल्या खुमासदार पद्धतीने सांगून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ भागाचे विघ्नेश जोशी यांचे निवेदन सुद्धा तेव्हढेच दमदार होते. विघ्नेश जोशी  यांनी कार्यक्रमाच्या शेवटी  मराठीत बोला, मराठीचा वापर करा, मराठी अस्मिता जपा या निवदेनामुळे या कार्यक्रमाचा शेवट अधिक टोकदार झाला.

संयुक्त महाराष्ट्रासाठीमराठातील  घणाघाती अग्रलेख आणि लाखोंच्या सभांपुढे तुफानी भाषणं करून जनजागृती केली. दिल्लीच्या जबड्यातून महाराष्ट्र अक्षरशः खेचून आणला. एवढंच नव्हे, तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कुटिल डावही हाणून पाडला. अनेक वर्षाच्या लढयानंतर, पराकोटीचा अन्याय सहन करून, लेखणी आणि वाणी झिजवल्यानंतर, आंदोलन मोर्चे, सत्याग्रह केल्यानंतर, अमानुष गोळीबारात शेकडो जणांच्या हौतात्म्यानंतर आपले महाराष्ट्र आपल्याला मिळाले, हे सर्व  नाट्यविष्कारातून अतिशय प्रभावीपणे सर्व कलाकारांनी सादर करून पेक्षकांची वाहवा मिळवली. शेवटी मंगल कलश येऊन मुंबई महाराष्ट्रात आली, त्यावेळी दाखवलेला महाराष्ट्राचा नकाशाच्या सीन वर प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट  केला.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठीमाझी मैना गावाकडं राहिली”  हा पोवाडा प्रणय बनसोडे यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर  केला.  गीतकार राजा बढे यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत रात्री १० वाजता संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या हातात आल, ११ वाजता त्याला चाल लावली गेली आणि मध्यरात्री १२ वाजता शाहीर साबळे यांनी हे आकाशवाणीवरून थेट सादर केलं, या महाराष्ट्र गीताचे चोख सादरीकरण  सारंग कुलकर्णी आणि त्यांच्या साथीदारांनी तितक्याच ताकदीने सादर केलेलं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं

                                       

सर्व गायकांनी जुन्या गाण्यांना खऱ्या अर्थानं न्याय दिला. सुशांत बर्वे आणि ओंकार या दोंन्ही वादकांनी सगळी गाणी अगदी तश्याच ढंगात वाजवली. ध्वनी संयोजन राजेश गायकवाड  आणि प्रकाश योजनाकार आनंद केळकर यांनी आपापलं योगदान दिलं.

आचार्य अत्रे ज्या ज्या क्षेत्रांत गेले, तिथं सर्वोच्च कामगिरी केली. ‘गीतगंगाआणिझेंडूची फुले’  हे कवितासंग्रह अजरामर झाले. झेंडूची फुले यावर रुही घोरमाडे मगर, अंकिता सोवनी आणि युगंधरा वळसंगकर यांनी केलेलं अभिवाचन प्रेमाचा गुलकंद, परीटा येशील कधी परतून, धाव पाव देवा आताअश्या विडंबन कवितांचे सादरीकरण जुन्या कवितांच्या आठवणींना उजाळा देणार ठरलं. तीघीचा कवितांच्या गप्पांमधून साधलेला सवांद  अत्र्यांच्या विडंबन कवितेचे महत्व अधोरेखीत करणारा ठरला 

                                                                           

अत्र्यांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाचा वेध घेत अभ्यासपूर्ण धांडोळा रंगमंचीय परिभाषेत मांडण्याचा हा प्रयन्त वेगळा ठरला आहे. मनोरंजन आणि कलात्मकता यांची सांगड घालण्याचा एक सुंदर प्रयन्त करत  रंगमंचीय कार्यक्रमाचा फॉर्म जाणतेपणी एक उंचीवर नेऊन ठेवला आहे.

खरं म्हणजे कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षक  गाण्यांवर किंवा परफॉर्मन्सवर बोलण्यापेक्षा, खरोखर अत्रे किती मोठे होते, हे तुमचा कार्यक्रम बघून कळतं, अशी प्रतिक्रिया होते आणि हेच या कार्यक्रमाचं यश होत.

                                                                                

या कार्यकमात काय होत हे ज्याने त्याने पाहूनच अनुभवल आहे, त्याचे तपशील देण्यापेक्षा हा कार्यक्रम काय सांगू पाहत होता वा अधोरेखित करीत होता, हे जाणणं अधिक उचित ठरेल. “अष्टपैलू अत्रेया कार्यक्रमाचा हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. अतिशोयक्ती अलंकार  वापरून अगदी अत्र्यांच्या शब्दात सांगायचं झालं तरगेल्या दहा हजार वर्षात असा कार्यक्रम कधी झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षात होणार नाही.”

मूळ संकल्पना मराठा मंडळाचे सांस्कृतिक समिती सदस्य श्री. संतोष सावंत यांची होती आणि त्यांच्या जोडीला संगीत क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक श्री. निलेश सुर्वे  यांनी गायकांची गाणी बसवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाला आवश्यक असलेले संगीताचे तुकडे शोधून अप्रतिम परिणाम साधलाया कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक श्री. उदय दरेकर यांनी अत्र्यांचे साहित्य विविध माध्यमातून मिळवून लिहिलेल्या संहिताप्रमाणे ६० कलाकारांच्या संचात हा देखणा कार्यक्रम सादर केला गेलाअत्र्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जीवनावर त्यांच्याच साहित्यातून कार्यक्रम बसवणं, म्हणजे शिवधनुष्यच होतं.

रंगमंचावरील कलाकार आपली कला दाखवत असताना, अंधारात झटकन पुढच्या भागाचे नेपथ्य लावणारे प्रसाद साळवी आणि अजय माने यांनी केलेल्या घावपळीमुळे कार्यक्रम कुठेही रेंगाळणार नाही याची काळजी घेतली

सभागृहाच्या प्रवेशद्वारी जुन्या वस्तूंचे संग्राहक सजावटकार श्री. आत्माराम मोरे यांनीअष्टपैलू अत्रेया कार्यक्रमची सभागृहाच्या प्रवेशद्वारी केलेली वस्तू रूपाने मांडणी सर्वांचे लक्ष वेधत होतीअत्र्यांचे चित्रपट आणि त्यातील योगदान, रंगभूमी आणि अत्र्यांची लोकप्रिय नाटकेअत्र्यांच्या चष्म्यातून त्यांचे पैलूवेगवेगळ्या ठिकाणी अत्र्यांची गाजलेली भाषणे , दैनिक मराठा, अत्रे कट्टा, हुतात्मा चौक आणि त्यामागील जुनी मुंबई, १०७ हुतात्म्यांची नावे, रेडिओवर अत्र्यांच्या आवाजातील  भाषणे  हा संपूर्ण देखावा अत्रे प्रेमी रसिकांसाठी अत्र्यांच्या भावविश्वात डोकावण्याची नामी संधी देऊन गेला.  

   

सर्वश्री हेमंत भोगले यांनी गेले दीड महिना मेहनत घेऊन तयार केलेला अत्र्यांच्या पूर्णाकृती पुतळा ही एक अप्रतिम कलाकृती होती. तो मी न्हवेच या नाटकातील लखोबा लोखंडे यांच्या स्वगतचा जो सीन होता त्यासाठी हेमंत भोगले यांनी कोर्टात ज्या साक्ष फिर्याद करताना वापरात येणार आरोपींचा कठडा हुबेहूब बनवला होता आणि त्यात उभे राहून विघ्नेश जोशी यांनी लोखोबा लोखंडे यांचे स्वगत सादर केले. साहित्यिक अत्रे आणि त्यांचे विपुल लेखन लेखणी आणि हात हे सर्व त्यांनी तयार केले होते.

                                                                               

कार्यक्रमाच्या शेवटी, रुईया कॉलेज मधील कुमारी सिद्धी मयेकर ही आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समितीने आयोजित केलेल्या वकतृत्व स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेती, या संपूर्ण कार्यक्रमामधून आजच्या तरुण पिढीला काय मिळाले हे विशद करून सांगिलेत. तिच्या मनोगतात ती म्हणाली कि, अत्र्यांनी स्वतः माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करून आमच्या झोळीत भरभरून दिल आहे आणि आम्हांला श्रीमंत करून सोडलं पण इथे आमची झोळी कमी पडली असे सांगितले. अत्रे सर नेहमी म्हणतभारताला भूगोल आहे तर माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे पण याही पुढे जाऊन आम्ही आज अभिमानाने म्हणतो कि भारताला भूगोल आहे तर माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे पण आमच्याकडे अत्रे सरांचं सांस्कृतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे. या वाक्याने . आजच्या तरुण पिढी पर्यंत साहित्य सम्राट आचार्य अत्रे पोहचवल्याचा निर्मळ आनंद अत्रे जयंती कार्यक्रमाचे सर्वेसर्वा ८२ वर्षाचे चिरतरुण श्री. श्रीकांत फोजदार काका, अध्यक्ष श्री. महेश चव्हाण आणि मराठा मंडळ अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांच्यासह  सर्व संयोजकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या प्रवेश द्वारी सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी साकारलेली विषयाला अनुरूप अशी नयनरम्य आणि आकर्षक रांगोळी सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेणारी होती

मराठा मंडळ मुलुंड या सामाजिक संस्थेंचे अध्यक्ष आदरणीय श्री. रमेश शिर्के आणि त्यांची संपूर्ण कार्यकारणी, तसंच सांस्कृतिक समिती यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट  आयोजन करूनअष्टपैलू अत्रेसर्व रसिकांच्या मनात घर करून राहिले.