नवरात्र उत्सव – २०२२

पहिली माळ : सौ. प्राची प्रकाश पालव (पांढरा) 

दुर्गा देवीचे प्रथम स्वरुप शैलपुत्री आहे. नवरात्राची पहिली माळ सोमवार, २६ सप्टेंबर रोजी होती.  शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.

दुसरी माळ :सौ. नयनतारा ज्ञानेश्वर भालेराव (लाल) 

दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी आहे. नवरात्रीची दुसरी माळ मंगळवार, २७ सप्टेंबर रोजी होती . या रुपाच्या एका हातात अष्टदलाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. तप आचरणामुळे या रुपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.

 

तिसरी माळ : सौ. प्रेरणा प्रभाकर साटम (निळा)

दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा आहे. नवरात्राची तिसरी माळ बुधवार, २८ सप्टेंबर रोजी होती. चंद्रघंटा देवीने ललाटावर चंद्र धारण केला आहे. नवरात्रात तिसऱ्या दिवशी देवीच्या या रुपाचे पूजन केले जाते. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

 

   

चौथी माळ : सौ. सायली सत्यवान दळवी (पिवळा) 

दुर्गा देवीचे चौथे स्वरुप कुष्मांडा आहे. नवरात्राची चोथी माळ गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी होती.  ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रुपाला कुष्मांडा असे संबोधले जाते. कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकटे, रोग, शोक दूर करून यश, बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी, असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

 

पाचवी माळ :सौ. वृंदा नीरज पालव (हिरवा)

दुर्गा देवीचे पाचवे स्वरुप स्कंदमाता आहे. नवरात्राची पाचवी माळ शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी होती. कार्तिकेय (स्कंद) माता असल्याने हे रुप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. नवरात्रातील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे, असे सांगितले जाते. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वाहावे. तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जाते.

सहावी माळ : सौ. सायली मंदार राणे (करडा)

दुर्गा देवीचे सहावे स्वरुप कात्यायणी आहे. नवरात्राची सहावी माळ शनिवार, १ ऑक्टोबर रोजी होती. कात्यायणी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. एका कथेनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायणी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायणी देवीचे पूजन केले होते, असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सातवी माळ : सौ. शुभदा योगेश महामुणकर (भगवा)

दुर्गा देवीचे सातवे स्वरुप कालरात्री आहे. कालरात्रीचे रुप भयंकर आहे. नवरात्राची सातवी माळ रविवार, २ ऑक्टोबर रोजी होती. देवी भागवत पुराणानुसार, कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते.

आठवी माळ : सौ. श्रावणी संतोष हांदे (मोरपंखी)

दुर्गा देवीचे आठवे स्वरुप महागौरी आहे. नवरात्राची आठवी माळ सोमवार, ३ ऑक्टोबर रोजी होती.  पुराणातील एका कथेनुसार, वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते, अशी मान्यता आहे. राक्षस दैत्य शुंभ-निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरुप धारण केले. ही देवीचीच एक लीला होती, अशी कथा पुराणात आढळते. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. विवाह जुळण्यात अडचणी, समस्या येत असतील, तर त्या दूर होतात. जीवन सुखमय होते, असे सांगितले जाते. महाष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

नववी माळ : सौ. रोहिणी चंद्रशेखर चाळके (गुलाबी)

दुर्गा देवीचे नववे स्वरुप सिद्धिदात्री आहे. नवरात्राची नववी माळ मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी होती. नवरात्रातील अखेरची माळ असल्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या या स्वरुपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशी मान्यता आहे. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषि-मुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे आणि नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले जाते.