आचार्य अत्रे १२३ वी जयंती कार्यक्रम,२०२१

*आचार्य अत्रे १२३ वी जयंती कार्यक्रम,२०२१*
**********************************

आज दि.१३ ऑगस्ट,२०२१…. उभ्या महाराष्ट्राचे लाडके, मराठी साहित्यातील जेष्ठ- श्रेष्ठ विनोदी लेखक, हाडाचे शिक्षक, सर्वोत्कृष्ट नाटककार,विडंबनकार,झुंझार पत्रकार, व्यासंगी वृत्तपत्र संपादक, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, प्रभावी विनोदी वक्ते….असे शतपैलू व्यक्तिमत्त्व असलेले…प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांची १२३ वी जयंती.

मुंबई उपनगरातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करू पाहणा-या आपल्या मुलुंड मध्ये *आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती*, मुलुंड मधील २२ विविध नामांकित संस्था एकत्र येऊन आचार्य अत्रे जयंती गेली १० वर्षे सातत्याने साजरी करत आहे. कोरोना संकटाच्या परिस्थितीतही आजच्या या कार्यक्रमाला असलेली अत्रे प्रेमींची उल्लेखनीय उपस्थिती खरंच कौतुकास्पद होती.

पत्रकारिता क्षेत्रात झुंझार पत्रकार म्हणून जनतेला परिचित असलेल्या, मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अत्र्यांचे ‘मराठा’ मधील *अग्रलेख -मृत्यू लेख* हे मराठी वाडःमयाला मिळालेली अनमोल देणगी याच त्यांच्या अग्रलेखांवर आधारित कार्यक्रम आज समितीतर्फे मराठा मंडळ संस्थेत सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे निवृत्त सहसंपादक श्री.श्रीराम शिधये हे अभ्यासू वक्ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. आपल्या घणाघाती वक्तव्यांनी आणि प्रभावी लेखणीने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या अत्र्यांच्या झंझावाती कारकिर्दीचा,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील कामगिरीचा आणि अनेक विनोदी तसेच करारी वक्तव्यांचा थोडक्यात उल्लेख करून आपल्या प्रमुख पाहुण्यांनी अत्र्यांचे अग्रलेख आणि आपले सहकारी तसेच समाजातील अनेक नामांकित व्यक्तिमत्वांवर लिहिलेले मृत्यूलेख यांवर अत्र्यांच्या हावभावांसकट विनोदी पद्धतीने केलेले उत्कृष्ट अभ्यासपूर्ण ओघवते विवेचन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

मुलुंडमधील २२ नामवंत संस्थांच्या एकत्रित परिश्रमाने आणि मराठा मंडळाच्या विशेष सहकार्याने सादर झालेला हा कार्यक्रम अतिशय संस्मरणीय असा होता.

वृत्तांत लेखन : सौ. ऐश्वर्या ब्रीद