माणसाच्या मूलभूत गरजा जरी अन्न, वस्त्र आणि निवारा या असल्या तरी मला वाटते पृथ्वीतलावरील सर्व सजीवसृष्टीसाठी *स्पर्श* ही देखील मूलभूत गरज आहे.
.
बाळ जन्माला आल्यावर त्या मऊ मखमली इवल्या जीवाचा होणारा स्पर्श त्या बाळाच्या आईवडिलांनाच नाहीतर आजी-आजोबा इतर नातेवाईक सर्वांनाच स्वर्गसुख देतो. त्या इवल्या जीवालाही स्पर्श कळतो. आपण रडल्यावर कोणीतरी जवळ घेतले आहे हे मायेच्या स्पर्शाने त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. ते बाळ जसजसे वाढत जाते तसे त्याचे स्पर्शाचे ज्ञानही वाढत जाते. आता त्या बाळाला मायेच्या प्रेमाच्या स्पर्शाबरोबर रागाने केलेला स्पर्श म्हणजे मार आहे हे कळते. आई किंवा बाबा रागवले तर आजी-आजोबांकडे हा मायेचा स्पर्श मिळतो हे त्याला कळू लागते. आपल्या चेहऱ्यावरून फिरणारा आजी-आजोबांचा खरखरीत हातही तेव्हा रेशमासारखा मऊ वाटतो. हळूहळू त्या बाळाला वाईट स्पर्शही कळू लागतात, जरी लैंगिकता कळत नसली तरी हा स्पर्श मला आवडत नाही एवढे कळते.
.
शाळेत जाऊ लागल्यावर मित्र-मैत्रिणींचे खेळताना होणारे स्पर्श, मिठी, मारामारी आवडू लागते. आपोआप मैत्रीची भावना वाढू लागते. जसजसे तारुण्यात पदार्पण होते तसे भिन्नलिंगी आकर्षण वाढू लागते. हा स्पर्श हवाहवासा वाटू लागतो. प्रेम, वासना कळू लागते. *”स्पर्श होता तुझा विसरलो भान मी”* या ग. दि. माडगूळकरांच्या ओळीचा प्रत्यय येऊ लागतो. आत्ताच्या तरुणाईच्या ‘लॅंग्वेज’ मध्ये ‘करंट’ लागतो. तरुणींच्या लाजण्याची गंमत वाटू लागते.
.
पती-पत्नी मधले प्रेमाचे स्पर्श – एखाद्या कठीण प्रसंगात हातात घेतलेला हातच किती धीर देतो. म्हणूनच कदाचित लग्नाच्या विधीत भटजी नवरा-नवरीला हातात हात घेऊन सात फेरे मारायला सांगतात. हा स्पर्श नवीन आयुष्य जगण्याची उमेद देतो. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात आपला जोडीदार आपल्या सोबत असणार आहे याची खात्री देत असतो.
.
बाळाला जवळ घेताच आईला आपोआपच पान्हा फुटतो. म्हणूनच ‘मायेचा पाझर फुटणे’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. मुले मोठी होऊन शिक्षणासाठी किंवा नोकरी-धंद्यासाठी परदेशात जातात. रजेच्या अडचणीमुळे वर्षभर घरी येणं त्यांना जमत नाही. पण नवीन टेक्नोलॉजीच्या उपकारांमुळे व्हिडिओ कॉलची सोय उपलब्ध झाली. या व्हिडिओ कॉलमुळे मुले आणि त्यांचे पालक समोरासमोर बसून तासन्तास एकमेकांशी बोलतात, एक-मेकांच्या अडी-अडचणी/सुखदुःखे एकमेकांना सांगतात. पण अगदी तास-दोन तास जरी या अशा गप्पा मारून झाल्या तरी त्या पालकांना आपल्या पाल्याला जवळ घ्यावं, स्पर्श करावा हा मोह आवरता येत नाही. मग कॉल संपल्यावर थोडावेळ आपोआपच डोळे पाणीदार दिसू लागतात.
.
जसजसे पालक वर्धाक्याकडे झुकू लागतात तसतसे त्यांना आपल्या पाल्याचा स्पर्श तीव्रतेने हवाहवासा वाटू लागतो. त्यांच्यासाठी ती नवसंजीवनी असते. मुलांच्या शालेय जीवनातील किंवा इतर कोणत्याही कठीण प्रसंगी त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर धीर देण्यासाठी ठेवलेला हात किंवा पाठीवर थोपटणे त्या मुलाला तेव्हा जेवढे आश्वासक वाटलेले असते तसा स्पर्श आता त्या मुलांकडून आई-वडिलांना हवासा वाटू लागतो.
.
मुलांना मात्र वाटत असते मी आता मोठा झालोय त्यांना आईने जवळ घेतले की ‘नको ग’ करून संकोचतात. आईच्या डोळ्यासमोर तिचं बाळ बाळच असतं. पण स्पर्शाची जादू त्या मुलांना नंतर कळणारच असते केव्हातरी. सासरी गेलेली मुलगी माहेरी येते तेव्हा तिची आई आणि ती मुलगी एकमेकींच्या स्पर्शासाठी तेवढ्याच आतूर असतात. एखादे काम प्रेमाने सांगून, रागाने किंवा बळजबरीने होत नसेल तर खांद्यावर फक्त हात ठेवला तरी त्या आश्वासक स्पर्शाने नक्कीच होते. पक्षांनाही आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन मायेची ऊब द्यायची असते, प्राण्यांना आपल्या पिल्लांना जीभेने चाटून प्रेम व्यक्त करायचं असतं. झाडेझुडपे यांच्याबाबतीत तर आपल्याला माहीतच आहे की त्यांना आपण मायेने हात फिरवला तर ती झाडे बहरू लागतात त्यांनाही स्पर्श कळतो. मग एखादे लाजाळूचे झाड स्पर्श करताच लाजतेही. स्पर्शाचे महत्त्व दृष्टिहीन लोकांपेक्षा जास्त कोणाला माहित असेल.
.
परंतु आता मात्र या कोरोनाच्या महामारीत आपण माणसे या स्पर्शाला पारखे झालो आहोत. अगदी परदेशातून विमानतळावर आपले पाल्य जरी आले तरी मिठी मारता येत नाही, 14 दिवस लांबूनच डोळ्यात पाणी आणून पहायचे. विदेशातील आजी आजोबा काचेपलीकडून नातवंडांना पाहात स्पर्शासाठी तळमळतात ते पाहून मन विदीर्ण होते. या महामारीने सर्वांनाच स्पर्शाची किंमत कळू लागली आहे.
स्पर्श ही देवाने सजीव सृष्टीला दिलेली देणगी आहे. एखादे गोंडस बाळ किंवा सुंदर फूल पाहिल्यावर स्पर्श करावासा वाटतोच तर एखादी गैरसमजाने दुरावलेली नाती/मैत्री अनेक वर्षांनंतरही एकमेकांना मिठी मारल्यावर दुरावा विरघळवते. तसेच मुलांची मिठी पालकांना जगण्याची नवी उमेद देते. म्हणूनच कदाचित *हृदय स्पर्शी, भावस्पर्शी* हे शब्द रुढ झाले असावेत. किती जादू असते या *”स्पर्शात”* ते प्रत्येकाने अनुभवले असेलच!
.
सौ. सुषमा सावंत