- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
सौ. शिल्पा लाड
महिला दिनाचे औचित्य साधून आपण ८ मार्चला महिलादिन साजरा केला. सर्व कर्तृत्ववान महिलांना मानाचा मुजरा केला. खरं तर ३६५ दिवस महिलांचा सन्मान व्हायला हवा.
.
आपल्याकडे पूर्वी मातृसत्ताक जीवनपद्धती होती. आजही त्याचे धागेदोरे टिकून आहेत. ते आज अधिक बळकट व्हायला हवेत असे मला वाटते. मी आजच्या आणि कालच्या स्त्री चा विचार करते तेव्हा मला अनेक प्रश्न भेडसावू लागतात. सन्मानाने जगण्याच्या आणि जगू देण्याच्या वाटा तीला मिळाल्या आहेत काय? गेल्या ५० वर्षांच्या महिला मंडळाच्या स्वरूपात आणि आजच्या स्वरूपात अमुलाग्र बदल झाला आहे.
.
महिलामंडळ, महिला समाज यानिमित्ताने अनेक महिलांसोबत माझा बरच संबंध आला आहे. हिरीरीने पुढाकार घेण्याची वृत्ती, एखादं काम पार पाडण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. कालच्या स्त्री पेक्षा आजची स्त्री निश्चितच चार पावलं पुढे गेली आहे. त्यात व्यासपीठावर भाषणं देणे, विविध स्पर्धांत भाग घेणे, हळदी-कुंकू, खेळ या सर्व गोष्टी येतात. फारच थोड्या स्त्रिया सामाजिक परिवर्तनात सहभागी होतांना दिसतात. प्रत्येक स्त्री खूप काही करू शकते. आजच्या सुशिक्षित स्त्रीला ते अशक्य नाही. नाटक, सिनेमा,सहली, महिला मंडळाचे कार्यक्रम, अन्य करमणूक यात ती स्वेच्छेने सहभागी होऊ शकते.
.
आजच्या स्त्रीशक्तीला एक नवा अर्थ प्राप्त झाला आहे. सावित्रीबाई फुले,आनंदीबाई जोशी या तर आजच्या सुशिक्षित स्त्रीच्या माताच म्हणाव्या लागतील. पण या स्त्रिया ध्येयवादाने प्रेरित होऊन, समाजासाठी काही करायला पाहिजे या जाणिवेने, समर्पित जीवन जगणाऱ्या होत्या. भगिनींनो, एक साधी- सरळ गोष्ट आहे, आपण घरी चैत्रगौरीचे हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण देतो. गजरे,तिळगुळ या सगळ्यावर खर्च करतो. भगिनींनो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुमचा आनंद हिरावून घेत नाहीये. आनंद-उत्सव ह्या तर जगण्याच्या शक्ती आहेत. आपण अनेक मार्गांनी आनंद घेत असतो. पण आजच्या जीवनात अंधार आहे. तो नाहीसा करण्यासाठी आपण काय करतो? ऋण, कर्तव्य ह्या गोष्टी बाजूला राहू देत. पण आपण तर माणसं आहोत नं?
.
माणुसकीचा एवढासा विचार जरी मनात घोळत असेल तरी सुद्धा आपण खूप काही करू शकतो. आजची स्थिती मागच्या पिढीतल्या तुलनेत खूप अनुकूल आहे. आज अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांना खरंच काही करावंसं वाटतं पण मार्ग सापडत नाही. समाजकार्य हा अवघड शब्द मनातून काढून टाकूया व माणूस म्हणून जगूया! दुसऱ्याला जगवूया! मात्र मी काय करू शकणार? असा विचार कधीही मनात आणू नका.
.
मला जे मनापासून वाटते ते मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
.
धन्यवाद!!!