सुख…..! सुख म्हणजे समाधान, सुख म्हणजे आनंद, सुख म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्तता, सुख म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी केलेली तगमग, सुख म्हणजे आयुष्याच्या सरीपाटावरची तडजोड की सुख म्हणजे जाणिवांच्या स्वप्नांना नेणिवांकडे नेणारा दुवा…..! सुख म्हणजे नेमकं काय…? हे कळतच नाही. सुखाची परिभाषा कधीच उमगत नाही. सुख हा दोन अक्षरी शब्द….! पहायला गेलं तर किती छोटा, पण त्यातून मिळणारा आनंद मात्र अवर्णनीय…..!सुख जेव्हा अचानक उंबऱ्यात येतं तेंव्हा आनंदरूपी सोनसळी किरणांचा कवडसा ओंजळीत येतो हे मात्र नक्की…..!
.
सुखद क्षण, सुखद आठवणी, सुखाचे हे पाढे कितीही गायले तरी ते खरे असतात का हो….? पूर्वी हे सगळं खरं वाटायचं ! पूर्वी सुंदर अशा बेटावर पण आपण वस्ती करायचो. अथांग निळाईकडे बघत आपण वाळूत स्वप्नांची घरं बांधायचो, शांत किनाऱ्यावरून अनवाणी पायाने बरीच फरफट करायचो, वाळूत सापडलेले शंख शिंपले वेचत स्वप्नांचे खेळ मांडायचो….त्यावेळी हरलो काय जिंकलो काय…? पण त्यातही एक सुख होतेच की…..!हिरमुसलो , गहिवरलो तरी त्यातून मिळणारा आनंद मोठाच होता नाही का…? पूर्वी नात्यांमध्ये फार सुंदरता होती. प्रत्येक नात्याला भक्कम असा आधार होता. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे नात्यांमध्ये एक सक्षमपणा, एक मजबुती होती.एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची ताकद प्रत्येक नात्यात होती. नातं जितकं मोठं तितकी त्याची स्पंदनं जास्त….! त्यावेळी नात्यांची ही हिरवळ वर्षानुवर्षे ताजी टवटवीत असायची. आजही त्या हिरवळीवर निवांत पडून आपुलकीचे तारे पहावे असे मनोमन वाटते. आनंद देखील माणसाला उपभोगता आला पाहिजे तरच त्यातून मिळणारे सुख हे शाश्वत वाटेल…..!
.
आज सगळंच बदललं आहे. आता विभक्त कुटुंब पद्धती आकार घेत आहे. सगळ्यांचे जीवन नुसतं यांत्रिक झाले आहे. आज मोठी मोठी घरं आहेत पण त्यात सुख विराजमान नाही. प्रत्येकाजवळ गाड्या आहेत, बँक बॅलन्स आहे पण त्यात सुखाला किंमत नाही. आज सर्व सुखसोयींनी माणूस समृद्ध झाला खरा पण ह्या साऱ्याला सुखाची झालर नाही. पूर्वीसारखा नात्यांमध्ये आता ओलावा राहिला नाही. आज प्रत्येकाच्या जगण्याला म्हत्वाकांक्षेची खोटी कवाडं लावली गेली आहेत ज्यातून माणसाला बाहेर पडायला किती वेळ लागेल याचा अंदाज नाही….! असं सगळं असताना सुख शोधायचं कसं….? हा एक गहन प्रश्न आहे. त्यासाठी प्रत्येकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद हा हृदयात खोलवर साठवला पाहिजे, त्याला मुक्तपणे दूरवर उधाणलेल्या सागरासारखं पसरवलं पाहिजे. चांदणे पिण्यासाठी चकोर जसा आतुरतो तसंच आनंदरूपी सुखाचं असलं पाहिजे…..एकंदरीत काय लहान सहान गोष्टींमधला आनंद आणि त्यातून मिळणारे आत्मिक समाधान म्हणजेच वारेमाप उधळलेले सुख असावे……..!!!!!
.
सौ. शिल्पा भोसले