संस्कार

सौ. सुषमा सावंत

“काय तुम्ही आज कालच्या मुली ग, आई-वडिलांनी काही संस्कार केले की नाही की फक्त नोकऱ्याच केल्या”  एक चिडलेला आवाज ऐकू आला आणि सहजच लक्ष त्या मोठ्या आवाजाकडे गेले.  साधारण माझ्याच वयाची एक बाई एका वीस बावीस वर्षाच्या तरूणीवर रागवत होती.  स्टेशनजवळच्या गर्दीत त्या बाईचा चेहरा मास्क वरील आठ्यांमुळे रागावलेला कळत होता तर संपूर्ण चेहऱ्यावर बुरखासदृश्य मास्क घातल्यामुळे त्या तरुणीचे काहीसे मिश्किल हसणारे फक्त डोळेच दिसत होते.   माझ्या डोक्यात मात्र या बाईच्या वाक्याने विचारांचे काहूर माजले. मुलांवर संस्कार फक्त आईवडीलच करतात का? आणि खरंच का नोकरी करणारे आईवडीलच मुलांवर संस्कार करायला कमी पडतात  मग आम्ही दोघेही नोकरी करत होतो त्यामुळे माझा मुलगा साडेचार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या आजीकडे आणि नंतर babysitting मध्ये लहानाचा मोठा झाला.  मला नाही वाटत त्याच्यावर काही कमी संस्कार झाले आहेत. आणि त्याचे पूर्ण श्रेयही आम्ही दोघांनी कधीही घेतलेले नाही त्यात अनेकांचा वाटा आहे.
.
मुळात संस्कार म्हणजे काही खाऊ नाही वाटी चमच्याने भरवायला.  संस्कार करणे आणि ते ग्रहण करणे ही एक दुहेरी प्रोसेस आहे, जसं एकाच प्रकारचे अन्न खाल्लं तरी एकाच्या ते पचनी पडतं आणि अंगी लागतं तर दुसऱ्याच्या ते अंगी लागत नाही हा काही अन्नाचा दोष नाही.  आपल्यावर पिढ्यान पिढ्या पासून चालत आलेले काही संस्कार आहेत जे आपल्या रक्तात भिनलेले आहेत त्यानुसारच आपण वागत असतो आणि ते पाहूनच नकळत लहान मुले या गोष्टी आत्मसात करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर पुस्तकाला पाय लावू नये ती सरस्वतीदेवी असते असे सांगितल्यामुळे आपण आजही रद्दी पेपरला जरी पाय लागला तरी नकळत हात जोडतो तसेच जेवताना अन्न वाया घालवू नये अन्नपूर्णा देवी रागवेल अशी शिकवण असल्यामुळे आजही आपण ताटात घेतलेले सर्व संपवतो. हीच शिकवण आपण आपल्याही नकळत आपल्या मुलांच्या मनावर बिंबवत असतो. ( तीन वर्षाचा असताना माझ्या मुलाने विचारले होते सगळ्या देवी अशा कशा कशातही लपून बसतात ‌)  मोठ्या माणसांच्या पाया पडाव्यात, त्यांना उलट उत्तरे देऊ नयेत ही आपल्याला मिळालेली शिकवण आपणही लहान-मोठ्याची जाण नसणाऱ्या बाळाला बालवयातच देत असतो. 
.
ही लहान मुले आपले आई-वडील, आजी-आजोबा इतर नातेवाईक, शेजारीपाजारी यांचे नकळत अनुकरण करीत असतात. म्हणजे असे की आई वडील कामावरुन आल्यानंतर आपल्याला सांभाळणाऱ्या मावशीकडून घरी घेऊन आल्यानंतर आपल्यासकट आई-वडीलही कपडे बदलून हात पाय तोंड स्वच्छ धुऊन झाल्यावर प्रथम देवाला दिवा लावतात नंतर आपल्याला खाऊ देऊन स्वतः खाल्ल्यावर आई जेवण बनवते तर बाबा आपला अभ्यास घेता घेता आईला भाजी साफ करून देतात किंवा कांदा चिरून देतात, आईही जेवण करता करता आपल्याला दिवसभर काय काय मजा केली ते विचारते किंवा दुसरे उदाहरण म्हणजे आजी आजोबा आजारी असताना आपले आई वडील त्यांची कशी काळजी घेतात, आई-वडिलांचे आजी-आजोबांशी काही मतभेद झाले तर आपले आई-वडील त्यांना दुरुत्तरे न करता समजून सांगण्याचा प्रयत्न करतात कितीही राग आला तरी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत नाहीत, ही मोठी माणसे आपापसात कसे वागतात हे सर्व ते मूल नकळत शिकत असते त्यासाठी वेगळ्या संस्काराची गरज नसते.  यात सिंहाचा वाटा शिक्षकांचाही असतो मुलांना जीव ओतून घडविणारा शिल्पकार शिक्षकच असतो.  एकदा गुरुजनांबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण झाला की आपोआपच हे गुरू-शिष्याचे नाते कायमचे होउन बसते.  ( आता गर्भसंस्काराचे क्लास असतात म्हणे  आम्हाला गर्भसंस्कार म्हटल्यावर अभिमन्यूच माहीत होता  असो हा विषय वेगळा, तसे आई आजीच्या सांगण्यावरून गर्भारपणात देवाची पुस्तके वाचणे श्लोक म्हणणे हे चालायचेच )
.
जगातील कोणतेही आई-वडील आपल्या मुलांवर‌ जाणूनबुजून वाईट संस्कार करीत नाहीत. (चित्रपटातील आई-वडील सोडून ) जरी प्रत्येक गोष्टीला अपवाद असला तरी मला नाही वाटत या गोष्टीला अपवाद असेल. मग असे असताना काही मुले किंवा व्यक्ती का बरे चुकीचे वागतात. मला वाटते लहानपणी नकळत जे संस्कार त्याने आत्मसात केलेली असतात त्याचाच हा परिणाम असतो.  म्हणजे आई वडील मुलाला चांगले संस्कार तोंडीच देत असतील आणि घरात मात्र आपापसात शिव्या देत भांडण असतील, मारहाण करीत असतील किंवा स्वत:च्या म्हाताऱ्या आई-वडिलांना दुरुत्तरे करीत असतील, त्यांच्याशी तुसडेपणाने वागत असतील किंवा कोणाचा तरी राग मुलावर काढून त्याला मारत असतील तर ते मूल हे वाईट संस्कार लगेच ग्रहण करते.  एखादा नातेवाईक किंवा नात्यातले भावंड जर चुकीचे वागत असेल तर ते पाहूनही मुले काही अंशी तशीच वागू लागतात.  पण जस जसे हे मूल मोठे होत जाते चांगल्या वाईटाची समजूत येऊ लागते तेव्हा जर ते मूल चांगल्या संस्काराने वाईटावर मात करण्यात यशस्वी झाले तर चांगली व्यक्ती बनू‌ शकते.  वाल्याचा वाल्मिकी होऊ शकते.  इतिहासातील अशा आदर्श व्यक्तींची खूप उदाहरणे सर्वांना माहीत असतीलच. जिजाऊंनी शिवबांवर केलेले संस्कार सर्वश्रुत आहेतच. शिवाजी महाराजही आईची आणि गुरुजनांची शिकवण आदर्श मानून जनतेचे कल्याण करणारा एक फार मोठा जाणताराजा म्हणून अजरामर झाले 
.
एखाद्या लहान मुलावर तोंडी संस्कारापेक्षा आपल्या वागण्या बोलण्यातून नकळत झालेले संस्कारच फार महत्त्वाचे असतात. कारण तोंडी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकाने मिळालेले ज्ञान जास्त लवकर समजते व कायम लक्षात रहाते.  त्यासाठी आई वडील नोकरी करणारे आहेत की नाही, गरीब आहेत का श्रीमंत, सुशिक्षित आहेत का अशिक्षित, झोपडीत राहतात की बंगल्यात याचा काही संबंध नसतो.  आज कचरा गोळा करणाऱ्या महिलेचे मुलही उच्चशिक्षित झाल्याचे उदाहरण आपण पाहतोच की.  आपल्या आई-वडिलांचे आपल्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न पाहूनच ही मुले त्या कष्टाची जाणीव ठेवतात.  परिस्थिती त्यांचा गुरु असते.
.
खरोखरच लहान मुल म्हणजे मातीचा गोळा असतो. त्या गोळ्याला आई-वडील जवळचे नातेवाईक शिक्षक आणि आजूबाजूची परिस्थिती जसा आकार देईल तसे ते मूल घडत जाते.  त्यानंतर स्वत:च्या अक्कलहुशारीने आणि सद्सद् विवेक बुद्धीने ते मूल स्वतःला घडवते.  त्यातूनच त्या व्यक्तीची चांगली बाजू आणि वाईट बाजू याच्या तुलनेत ती व्यक्ती कशी आहे, संस्कार कसे झाले आहेत हे ठरवले जाते. 
.
आम्ही दोघे नोकरी करत होतो तरीही आमचा मुलगा अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षित झाल्यानंतरही विमानतळावर सर्वांदेखत आमच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना लाजत नाही किंवा माझी मोठी पुतणी डॉक्टर असूनही प्रत्येक वेळी घरी आल्यावर आमच्या पाया पडते हे संस्कार त्यांच्यातील नम्रपणा टिकवून आहेत.  म्हणजेच त्यांच्यावर झालेल्या कळत नकळत संस्कारातून त्यांनी काय वेचले ते दिसते.
.
म्हणुनच मला वाटते लहान मुलांच्या देखत बोलताना वागताना आपण भान ठेवले तर आपल्या या कृतीतूनच मुलांना संस्कार मिळतील.  आमच्या वेळेस तीन-तीन किंवा त्यापेक्षा जास्त भावंडांचा काळ होता त्यामुळे ‘असे का’ असे प्रश्न विचारल्यावर धपाटा मिळत असे.  पण आता एकुलते एक असल्यामुळे धपाटे बंद झाले आहेत, हे धपाटे सुद्धा एक संस्काराचा भाग आहे असे मला वाटते.  
.
मना संग हा सर्वसंगास तोडी |
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ||
मना संग हा साधना शिघ्र सोडी |
मना संग हा द्वैत नि:शेष मोडी ||२०४||
.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
.
( संस्काराबाबत विचार मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे )