- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
*एक दिवसाचा कर्फ्यू संपल्यानंतर दोनच दिवसांत आपले मोदीजी हे टीव्ही वर लाइव्ह येऊन काहीतरी घोषणा करणार हे समजताच काळजात कुठेतरी चर्रर्रर्र झाले. आणि ती घोषणा झाली, पुढील १५दिवसीय लॉकडाऊनची! दोनच दिवसांवर असलेला माझा वाढदिवस, गुढीपाडवा निमित्त च्या रांगोळ्या, लेझीम आणि पुढे गाण्यांचा कार्यक्रम असे माझे सगळे उपक्रम रद्द झाले. पुढील १५ दिवस संपूर्णपणे घरी रहायचे हा विचारच मी करू शकत नव्हते. परंतु बाहेरील संकटाची आणि परिस्थितीची जाणीव मात्र होती. तेवढ्यातच एका संस्थेने गुढीपाडवा निमित्त online रांगोळी स्पर्धा जाहीर केली. विषय अर्थातच कोविड! ही रांगोळी मी घरातच छोट्या जागेत साकारली आणि मनात आले, या कठीण परिस्थितीत माझी ही कला आणि माझे छंदच माझी सोबत करतील! आणि असा सूरु झाला माझा लॉकडाऊन चा सुंदर प्रवास!!!!*
.
*पुढे मी घरातच एकेक करत आतापर्यंत बऱ्याच छोट्या मोठ्या रांगोळ्या काढल्या. गाण्यांचा कार्यक्रम रद्द झाला होता, रीहर्सल्स बंद झाल्या होत्या. मग घरीच सराव सुरू केला आणि बघता बघता ८-९ गाणी व्हिडीओ स्वरूपात आणि 3/४ गाणी ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड झाली. वेगवेगळ्या प्रकारची सुमधुर गाणी मी नेहमीच ऐकते आताही वेळ भरपूर असल्याने इतर गोष्टी करताना सतत गाणी ऐकणे सुरूच असते. सूर आणि नादाच्या श्रावणातून मनाला निखळ आनंद मिळत गेला. मी पट्टीची गायिका नव्हे पण गाण्याची सुप्त आवड आधीपासूनच मनात रुजलेली आहे. माझे वडील संगीताचे चाहते. तबलाही वाजवायचे. कदाचित तिथूनच आली असावी ही आवड माझ्या अंगी!! एका नृत्याचीही तयारी सुरू होतीच. कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आता घरीच सराव सुरू ठेवला. त्यामुळे मनासोबतच शरीराचाही मस्त व्यायाम होतोय. या काळात माझा सिन्थेसायझरचा क्लास ही बन्द झालाय. गुरूंच्या online मार्गदर्शनातून हाही सराव सुरू ठेवलाय. हे सर्व रुटीन छंद सुरू असतांनाच मनात आले एखादे चित्र ही रेखाटून पाहू. माझी ही आवड माझी लेक शाळेत असताना तिच्या चित्रकलेत मार्गदर्शन करतांना तेवढ्यापुरताच मर्यादित राहिली होती. आता हातात पेन्सिल आणि जुन्या चित्रकलेच्या वहीतील कागद घेऊन बसले. आवड असली की सवड आणि मार्गही मिळतो म्हणतात न तसेच काहीसे झाले माझे.
.
शोधाशोध केल्यावर जुने कोरे कागद, स्केच पेन, रंगीत पेन्सिल्स, खोडरबर मिळाले. बाहेर सगळं बन्द असल्याने घरातीलच हे जुने सामान वापरून मी माझा हाही छंद जोपासू लागले. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला. त्याच बरोबर देशातील लॉकडाऊन ही वाढत गेला. या काळात आतापर्यंत तब्बल २१ चित्रे चितारली. चित्र तयार झाले की फोटो काढून सर्वाना व्हाट्सअप्प वर पाठवून देणे आणि मग सगळीकडून आलेले कौतुक (कवितेतूनही मिळालेली उत्तमोत्तम दाद) अनुभवण्यात दिवस छान निघून जातोय. या सर्व कौतुकातून आणि मिळालेल्या टिप्स यातून माझी चित्रकला अधिकाधिक बहरतेय.
.
लेख किंवा ब्लॉग लिहिण्याच्या या छोट्या उपक्रमाच्या निमित्ताने उत्फुर्तपणे लिहिण्याचा वेगळा, मलाच माहीत नसलेला एक छान पैलू समोर आलाय. आणि आता हा लिखाणाचा नवीन छंद मी आता पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. व्हाट्सएप वरील विविध स्पर्धांमुळे स्वरचित कविता करण्याचाही एक योग आला आणि स्पर्धा जिंकलेही. रोजचाच कंटाळवाणा स्वयंपाक बनवण्याचा मला आणि घरच्यांना खाण्याचा कंटाळा आला होता. मग रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याचे ठरले. या काळात माझ्या लेकीलाही वेगवेगळे पदार्थ बनविण्याची आवड निर्माण झाली. यु ट्यूब वर बघून ती वेगवेगळे पदार्थ बनवू लागलीय. मग तिला त्यात छोटी मोठी मदत करण्यात वेळ छान निघून जातोय. आता दर शनिवारी महिला मंडळ व्हाट्सएप ग्रुप वरील विविध स्पर्धामध्ये सहभागी होणे, खेळ खेळणे हा अजून एक नवीन छंद जडला आहे.*
.
*माझ्या या सर्व उपक्रमांमध्ये, कला आणि छंद जोपासण्यामध्ये माझ्या घरच्यांची नेहमीच बहुमोल साथ मिळते. परिवार, नातेवाईक तसेच मित्रमैत्रिणी यांच्याकडून होणारे कोडकौतुक, शाबासकीची थाप माझा आत्मविश्वास वाढवते. पुढील आविष्कारासाठी स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. आपल्या कला इतरांसोबत शेअर करण्यात एक वेगळाच आनंद मला मिळतो. हे सर्व करताना मनात नेहमी येते…. आपले छंद किंवा कला इतरांना जर आनंद देऊ शकत असतील तर त्याने माझाही आनंद द्विगुणीत होईल. माझी रांगोळीची कला माझ्या इतर मैत्रिणींमध्ये रुजवायला मला खरंच खूप आवडेल.*
.
*आता मीच माझ्या मनाशी पण केला आहे, हा लॉकडाऊन चा काळ संपला तरी वेळ काढून नवीन नवीन गोष्टी करत रहायच्या. चित्रकलेची आवड अशीच जपत रहायची. हा कठीण काळ लवकरच संपावा परंतु ह्या काळात सुरू झालेला माझा हा प्रवास मात्र असाच अखंड सुरू राहावा हीच इच्छा!! माझ्या या चित्रांच्या फ्रेम्स बनवून, मला माझे नवीन घर सजवायचे आहे. एखादी भिंतही वारली चित्रांनी रंगविण्याचा मानस आहे.*
.
*या लॉकडाऊन काळातील माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी एक शिकले, मनातील वाईट विचारांच्या भुतांना टाळण्याचे एकमेव साधन म्हणजे आपले छंद! छंद मनावरील ताण कमी करतात. आपल्याला आयुष्यातील विशिष्ट मार्ग शोधण्यास मदत करतात. तसेच ते वेळ सत्कारणी लावण्याचे एक उत्तम साधन आहे. आपण आपल्या मुलांनाही त्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आवडीच्या गोष्टींत, खेळात पारंगत केले पाहिजे. कोणतीही छोटीमोठी कला अवगत असेल तर सतत सराव करणे हे नक्कीच आपल्या हातात असते.* .
*नजर शोधते नित्य नवे,*
*खजिन्यात आता काय हवे,*
*पिसांचे रंग ध्यानीमनी दिसे,*
*हा छंद जीवाला लावी पिसे!*
.
सौ.ऐश्वर्या ब्रीद*