सौ.ऐश्वर्या ब्रीद,
.
मानवी नातेसंबंधांच्या वेगवेगळया सकस अनुभवांचे संकेत आपल्या कलाकृतींतून ज्यांनी दिले, ज्यांचे सिनेमे पाहत आपली पिढी मोठी झाली त्या ज्येष्ठ निर्मात्या, दिग्दर्शिका, कथा, संवाद, पटकथाकार, गीतकार, समाजसेविका अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या तब्बल ७ राष्ट्रीय आणि अनेक राज्य पुरस्कार मिळविलेल्या ‘फिल्ममेकर सुमित्रा भावे’ यांची आपल्यातून कायमची एक्झिट मनाला चटका लावून गेली. वयाच्या ७७ व्या वर्षीही त्यांचे चित्रपटकथालेखन सुरू होते. समाजकारण, शिस्त, अभ्यासुवृत्ती इ.गुण त्यांनी आपल्या चित्रपटकलेतही जोपासले होते. समांतर सिनेमाच्याही पलिकडे जाऊन विविध सामाजिक विषय हाताळण्यात त्यांची हातोटी होती. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी वेगळ्या वळणावर नेऊन ठेऊन सामाजिक बदल घडवून आणले होते. त्यांच्या चित्रपट, लघुपट,मालिका यांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष दखल घेतली गेली. त्यांच्या दोघी,वास्तुपुरुष, देवराई,नितळ,वेलकम होम,कासव,अस्तु,संहिता इ.अनेक उल्लेखनीय विषयांवरील चित्रपटांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
.
चित्रपटसृष्टीतील प्रवेशाआधीपासूनच त्या समाजकारणाशी जोडलेल्या होत्या. स्त्रीविषयक समस्यांवर अभ्यास सुरू होता. संशोधक म्हणून समाजकार्याच्या कॉलेजमध्ये ‘संशोधनाच्या पद्धती’ या विषयावर शिकवत होत्या. या निमित्ताने अनेक अभ्यासप्रकल्पांमध्ये त्यांचा समावेश असायचा. दरम्यान आश्रमातील स्त्रीया, कुमारीमाता,गुन्हेगारी जगतातील काही खुनी स्त्रियांच्या कोर्ट केसेस यांचा अभ्यास केला. यानिमित्ताने स्त्री स्वतः स्वतःकडे कशी बघते याचा शोध लागला. त्यांच्यासोबत दिलखुलास, पोटातून येणारा संवाद साधला. तिच्यातील माणूसपणाशी पोहचल्या. हे सर्व करताना लक्षात आले की स्त्रीची प्रतिमा तिच्या स्वतःच्या,समाजाच्या आणि अभ्यासगतांच्याही मनात खूप गोंधळाची आहे. ही प्रतिमा बदलायची असेल तर नुसतं संदेश देऊन चालणार नाही तर चित्रपटासारख्या दृश्य माध्यमाचा वापर करायला हवा.आणि मग सुरू झाला स्वतःचा,समाजाचा,माणसांच्या नातेसंबंधांचा शोध! या आत्मशोधातून समृद्ध असे अनुभवविश्व तयार करण्याकडे वाटचाल सुरू झाली आणि पुढील प्रवास इथपर्यंत येऊन स्थिरावला होता.
.
पुण्याच्या स्त्री-वाणी संस्थेच्या संचालकपदावर काम करत असताना, तेथील झोपडपट्टीतील महिलांच्या संघर्षावर आधारित “बाई” हा पहिला लघुपट बनवला. या लघुपटाला सर्वश्रेष्ठ गैरफिल्मी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर “पाणी” या लघुपटाच्या माध्यमातून गावातील स्त्रियांचा एकत्र येऊन गावात पाणी आणण्याचा संघर्ष दाखविला. याही लघुपटाला सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. मुक्ती आणि चाकोरी या लघुपटांनंतर,अनेक निर्माते त्यांच्याकडून कथा लिहून घ्यायला लागले.मानवाच्या नातेसंबंधांचा अभ्यास करून, प्रश्न समजून घेऊन,व्यापक बनवून इतरांना त्याचा अनुभव देण्याच्या उद्देशाने चित्रपटाच्या दिशेने त्या चालत राहिल्या.
.
सुमित्रा भावे आणि सहदिग्दर्शक सुनील सुकथनकर या जोडगोळीने १९९५ साली “दोघी” हा रूढार्थाने पहिला चित्रपट केला आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने तो गौरविला गेला. त्यानंतर सर्वार्थाने वेगळा असा “वास्तुपुरुष”ला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर स्क्रीझोफोनीया या आजारावर आधारित देवराई,अल्झायमर वर आधारित अस्तु,नीतळ,कासव इ.चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. वेलकमहोम मधील एकत्र कुटुंबीपद्धती मधील चांगले वाईट अनुभव. दहावी”फ” मधील शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्यांचे भावविश्व,मानसिक आरोग्यावर बोलणारा “कासव” सारखा विषय असो,लेखिका म्हणून त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घातला. त्यांच्या सिनेमाचा विषय हा सामान्य प्रेक्षकाला भेडसावणारा असायचा. त्यांच्या जगण्यात कुठेना कुठेतरी झिरपत असायचा. सामान्य माणसाला आपली वाटावी अशी सत्याच्या जवळ नेणारी कथा,रोजच्याच जीवनातील संदर्भ, हलकीफुलकी मांडणी, खरीखुरी वाटणारी पात्रे,त्यांचे सहज अभिनय हे त्यांच्या चित्रपटांचे वेगळेपण होते. मानवाच्या बाहेरच्या आणि आतल्या मनोविश्वात डोकावणारे अशा दोन्ही प्रकारचे सिनेमे त्यांनी केले. स्त्रीतल्या बाईपणाला केंद्रस्थानी ठेवून,मानवी भावभावनांचे अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवले. स्त्रीला चित्रपटाची हिरॉईन न करता रूढार्थाने स्वतःच्या आयुष्याची नायिका बनवले. गेल्या ३५ वर्षातील मराठी सिनेमाचं संकलन करायचं झालं तर सर्व स्तरावरील सर्वोत्तम असं सर्वच सुमित्रा भावेंच्याच सिनेमात सापडेल.
.
सुमित्रा भावेंच्या चित्रपटात नेहमीच साहित्यमुल्यांचे दर्शन घडते.पात्र,संवाद,दृश्यरचना यातील सकस अभिजात साहित्याचा सुंदर डौल मोहवून टाकतो.त्यांचे वडील लेखक आणि वाचक. पती उत्तम समीक्षक.घरात साहित्यिकांचा सतत राबता.अनिल अवचट,मिलिंद बोकील यांसारखे दोस्त. त्यामुळे या व्यक्तींचे सामाजिक कार्य चित्रपटांतून रेखाटता आले. सिनेमातील स्त्रिया निरक्षर आहेत. बोलीभाषा वेगळी आहे. त्यांच्यापर्यंत दृष्यमाध्यमातून पोहचतांना ग्रामीण साहित्याचीच जोड लागली आणि त्यांनी सिनेमा साहित्यात नेऊन ठेवला. एका मुलाखतीत त्यांना विचारले की एखादी कथा कशी सुचते? यावर त्यांनी दिलेले उत्तर फारच गमतीशीर आहे.त्या सांगतात की ‘मी स्वतःच्या हाताने कमी लिहिते.मी प्रसंग डोळ्यांसमोर उभे करून संवाद तोंडाने म्हणते आणि शेजारी कोणीतरी ते उतरवून घेतात.’ संवाद,प्रसंग,कल्पना,आर्ट, वेशभूषा,कॅमेरा अँगल,म्हणजे सर्वार्थाने स्वतःचा सिनेमा कागदावर अशाप्रकारे उमटतो. आयुष्यात भेटलेल्या व्यक्ती,प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे करतात.इथे त्यांच्या अफाट स्मरणशक्तीचे दर्शन घडते.इथे त्यांनीच सांगितलेली त्यांची एक आठवण सांगावीशी वाटतेय. लहानपणी खडबडीत भींतीवरील ठिपके,रेघोट्या यांवरून एखादा ठिपका म्हणजे राजपुत्र,बाकीचे ठिपके सैन्य वगैरे वगैरे…आणि त्यावरून गोष्टी रचत. प्रत्येक अनुभवाची कथा! मग सुरुवात, शेवट तयार करायची त्यांना सवयच लागली. या सवयीतूनच उच्च दर्जाच्या चित्रपटकथा फुलल्या असाव्यात. पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने सुमित्रा भावेंच्या लिखाणावर डॉक्टरेट मिळवली आहे.बंगलोर मधील शाश्वती फौंडेशन तर्फे दरवर्षी एका भारतीय लेखिकेचा सन्मान केला जातो. सुमित्रा भावेंच्या सिनेमा हस्तलेखांना (स्क्रिप्ट) पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.’साहित्य मूल्य असलेली सिनेमा स्क्रिप्ट्स” अशी वेगळी ओळख त्यांच्या चित्रपटलेखनाला मिळाली.
.
त्यांचे सर्वच सिनेमे, वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविले गेले. तेथे त्यांना जाणवायचं की एखाद्यानं एखादाच सामाजिक सिनेमा केलेला आहे. तसंच त्यात फार काही विशेषही केलेलं नाहीय. तरी त्याचा उल्लेख दिग्गज म्हणून होतो आणि तोही त्याच आवेशाने तिथे वावरतो. कलाक्षेत्रातील या प्रवृत्तीबद्दल त्यांना नेहमीच खंत वाटायची. ही कला इतकी सोपी आणि स्वस्त नाही असे त्या म्हणत.अशा प्रवृत्तींमुळेच चित्रपटकलेला अभिजात कलेचा दर्जा मिळालेला नसावा असे त्यांचं स्पष्ट मत होतं. तिथपर्यंत पोहचण्यासाठी अपार कष्टांची, प्रचंड अभ्यासाची गरज आहे आणि तेच होत नाही. प्रत्येकाला फेमस व्हायचंय पण फोकस रहायचे नाहीय असं त्या म्हणत. नवीन निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांना त्यांचे सांगणे असायचे की स्वतःकडे पहा.देशी विदेशी, वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट पहा. कला आणि त्यातील तंत्र यांचा अभ्यास करा. त्याशिवाय ही कला पूर्णपणे कधीच साध्य होणार नाही.
.
सुमित्रा भावेंनी अत्यंत कमी मोजक्या साधनसामुग्री मध्ये,काटेकोर बजेट मध्ये पण उत्तम नटसंचासोबत,शिस्तबद्ध असे प्रगल्भ आशयाचे सिनेमे केले.कधी भव्य स्क्रिप्ट लिहितांना लक्षात आलं की बजेट वाढेल तर त्या ती स्क्रिप्ट पूर्ण करून सरळ बाजूला ठेवत.विनोबाजींच्या ‘भूदान’ चळवळीवर लिहितांना लक्षात आले कि यासाठी खुप फिरावे लागेल आणि यात बजेट वाढेल, त्यांनी स्क्रिप्ट पूर्ण करून तशीच ठेऊन दिलीय. पैसे मिळवण्याचा त्यांचा पिंड आणि मानसिकता नव्हती!!
.
त्यांचे सिनेमे वैश्विक आहेत परंतु मराठी आहेत म्हणून कमी लोकांपर्यंत पोहचलेत. पण आता या इंटरनेटच्या जमान्यात ते जगभरात पोहचतील असा त्यांना विश्वास होता.त्यांच्या ‘साखरेपेक्षा गोड’या शॉर्ट फिल्मला इंटरनेटवर भरमसाट प्रतिसाद आहे. आपले चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवले गेलेत, आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी नावाजलेत यातच त्यांना आनंद आणि समाधान होते. काही कोटी मिळवले नाहीत याचे दुःख कधीच नव्हते!
.
आपल्या या कलाकृतींतून खूप अमूल्य ठेवा त्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलाय. त्यांनी लिहिलेल्या भूदान चळवळ आणि नर्मदा आंदोलन या भारतीय समाजप्रवाहाच्या महत्त्वाच्या घटनांवर आधारित स्क्रीप्टसवर लवकरात लवकर भारतीय चित्रपटसृष्टीला अभिमानास्पद असे उच्च दर्जाचे सिनेमे घडोत हीच सुमित्रा भावे यांना त्यांच्या सहृदयांकडून मनःपूर्वक आदरांजली ठरेल!!