माझ्या आवडीची कर्तृत्ववान स्त्री- राजमाता जिजाऊ

सिंदखेडकर लखुजीराजे जाधवराव यांची लेक होतीच तशी देखणी आणि बहुगुणी! जशी सोन्याच्या समईतील लखलखती सोनेरी ज्योतच! चपळ,नाजूक,सुंदर,प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दिपकळी! हसऱ्या शहाजी राजांच्या शेजारी जिजाऊ शोभावी कशी? अभिमन्यू शेजारी उत्तरा जशी! खरोखरच जिजाऊ सारखे कन्यारत्न श्री ने निर्माण केले होते. 
.
भोसले-जाधव सोयरीक जुळली. मंगलवाद्यांच्या दणदणाटात, शहाजीराजांच्या शेल्याशी गाठ मारून, जोडवी,तोडे आणि पैंजणांच्या मंजुळ निनादात, हंसगतीने पाऊले टाकीत जिजाऊने भोसल्यांच्या-आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. भोसल्यांच्या कुळात सौभाग्य आले. नवा आनंद आला. वऱ्हाडाची रुक्मिणी सोन्याच्या पावलांनी पुणे प्रांतात आली. 
.
 *बया दार उघड! बया दार उघड!*
.
आणि महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून बया जागी झाली. बया अस्वस्थ झाली. बयेने डोळे वटारले. शुंभ, निशुंभ,चंड,मुंड, महिषासुरादी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासह उठली.  दरवाजा खाड्कन उघडून बया क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. ही अनाथांची बया, दुःखीतांची बया,अपमानितांची बया, महाराष्ट्राची बया कोण? 
.
*जिजाबाई! मूर्तिमंत सौदामिनी!* जिजाबाईला दास्याची कल्पनाच सोसवत नव्हती. तिला स्वतःचे राज्य हवे होते. स्वतंत्र तख्त हवे होते. तिला हवा होता आपला झेंडा, आपली फौज, आपला तोफखाना, आपला सेनापती, आपला प्रधान. आमच्या देशावर राज्य करतील आमचे सार्वभौम चंद्रसूर्य आणि आमचाच सार्वभौम राजा!  हे तिचे स्वप्न होते. 
.
तिला रामायण महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण ,द्रौपदी,कुंती,विदुला,या सर्वांच्या कथा ऐकताना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. कुंती वीरमाता-राजमाता ठरली. मला तिच्याच पंगतीला बसायचे आहे. बसेन का? तिची जगदंबेवरील भक्ती वाढू लागली. आजची अत्याचाराची स्थिती मी पालटीन आणि भवानी देवी मला सहाय्य करील हा विश्वास तिला वाटू लागला.
.
जिजाबाईला सोनोपंत डबीर, दादोजी कोंडदेव, नारोपंत मुजुमदार,बाळकृष्णपंत हनुमंते इ. कारभाऱ्यांकडून राजकारण समजले,उमजले. ती जगदंबेला विनवू लागली की माझ्या मनीची आस पुरी कर.      
.
शालीवाहन शके१५५१, शुक्ल नाम संवत्सरात, उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात,वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर ,सिंह लग्नावर, शुक्रवारी,सूर्यास्तानंतर, शुभ क्षणी -अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना जिजाबाईसाहेब यांच्या उदरी शीवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला (दि.१९फेब्रुवारी,१६३०). 
.
त्यांनी शिवबाला, लहानपणी मातीच्या ढिगांवर राज्य करताना पाहिले होते. त्या मातीच्या ढिगाचा रायगड झाला. लहानपणी त्यांनी आपल्या मांडीच्या सिंहासनावर शिवबाला महाभारत सांगितले होते. आज सोन्याच्या सिंहासनावर शिवबा बसत होता. आजवर त्यांनी अनेकदा शिवबाला आसवांचा अभिषेक केला होता, आज त्याला वेदघोषात गंगोदकांनी राज्याभिषेक होत होता. शिवबाने आईचे पांग फेडले. महाराष्ट्र राज्याचा महाराजा, महाराणी,युवराज,आईसाहेबांच्या चरणी लिन झाले. कोणता आशीर्वाद त्यांनी या मुलाला दिला असेल? बाळांनो उदंड उदंड आयुष्याचे व्हा!! रामराज्य करा! 
.
*या सौदामीनीला माझा मानाचा मुजरा!!*
.
सौ.शिल्पा लाड


Leave a Reply