- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
माझ्या आयुष्याचे पुस्तक, निम्म्याहून जास्त वाचून , अनुभवून झालं.अजून काही पुढचे भाग आहेत वाचायचे . पुढच्या भागात काय आहे माहित नाही पण मागचे मात्र सगळे भाग कसे स्वच्छ ,स्पष्ट आहेत ..लख्ख प्रकाशा सारखे. आजही पुढचा मार्ग दाखवायला एकदम समर्थ.आपले विश्व म्हणजे आपले घर ,कुटुंब, नोकरी आणि परत घर या मध्येच असतं.कुटुंब म्हणजे लग्नाआधी माहेर आणि लग्नानंतर सासर आणि माहेर .सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं जसं बालपण असतं तसंच माझं बालपण होतं .वर्षाला दोन नवीन ड्रेस एक वाढदिवसाला आणि एक दिवाळीला .वाढदिवस म्हणजे आईने बनवलेलं मस्तपैकी मांसाहारी जेवण. केक नाही की पार्टी नाही आणि जर चुकून वाढदिवस सोमवार, मंगळवार, गुरुवार ,शनिवारी आला तर त्या दिवशी श्रीखंड आणलं जायचं पण दुसऱ्या दिवशीच्या मांसाहारी पदार्थाच्या जेवणाने खऱ्या अर्थाने वाढदिवस संपन्न व्हायचा .खूप छोट्या-छोट्या अपेक्षा असायच्या पण त्या नक्की पुरवल्या जायच्या. घरा नंतरचं पहिलं बाहेरचं जग म्हणजे शाळा. हा अत्यंत आपुलकीचा विषय ज्याच्यावर तासनतास बोललो तरी पण शब्द कमी पडतील . शाळा म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय.
.
शाळा, शिक्षक ….. मैत्रिणी हे कसे एका सुंदर माळेसारखे आहेत, एक जरी मणी कमी असला तर माळ गुंफता येत नाही.अशी ही माझी शाळा…..सगळं आठवलं की क्षणार्धात काळ मागे सरकतो आणि आठवतं ते माझं शाळेचे दप्तर , एक ॲल्युमिनियमची पत्र्याची पेटी ,आधी ताईने वापरली होती आणि एखाद्या खानदानी दागिन्या सारखी परंपरेने माझ्याकडे आली होती .त्या पेटीतील पुस्तके ज्याच्यावर नेहमी दोन नावं असायची एक माझ्या मैत्रिणीचं जिच्याकडून सगळी पुस्तके अर्धा किमतीत घेऊन मी ती वापरायची आणि दुसरं म्हणजे ……माझं नाव. दहावीला नवनीत चे 21 प्रश्नसंच मात्र नवीन घेतलेले होते. आधीच्या
वर्षीचे पेपर असायचे ना सोडवलेले. शाळा म्हणजे मैत्रिणी… शाळा म्हणजे धमाल….. शाळा म्हणजे लक्षात राहणाऱ्या सहली. सातवीला असताना आमची सहल पुण्याला जाणार होती. तीन दिवसांचा मुक्काम होता पुण्याला …..या सहलीचं नावीन्य म्हणजे पुण्याला जाण्यासाठी बस किंवा रेल्वे किंवा विमानाने जाऊ शकणार होतो असे तीन पर्याय होते .चक्क पंचवीस मिनिटांच्या विमानप्रवासा करता आम्ही चार ते पाच तास खर्च केले पण त्यावेळी विमान प्रवास म्हणजे खूप मोठी गोष्ट .विमानतळावर जाण्यासाठी बस निघाली आणि शाळेत सोडायला आलेल्या आयांनी डोळ्याला रुमाल लावला .
.
त्यावेळी विमान प्रवासाची धास्ती खूप होती. सहलीची फी होती दोनशे रुपये. खूप मोठी रक्कम होती. बाबांकडे फी मागताना जड गेलं.पण बाबांनी माझी ही इच्छा पूर्ण केली. आज देशा- विदेशात मी फिरते पण ते दोनशे रुपये आत्तापर्यंतच्या माझ्या सहली मधले सगळ्यात अमूल्य आहेत. आमची शाळा खूप मोठी आहे. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यात आमची प्रयोगशाळा होती. प्रयोग वह्या तिथेच ठेवल्या जायच्या . मॉनिटर असल्यामुळे हे काम माझ्याकडे असायचे पण हे काम मी कधीच स्वखुशीने केलं नाही. खूप दडपण यायचं प्रयोगशाळेत जायला. त्याला कारणही तसंच होतं. प्रयोगशाळेत एका काचेच्या कपाटात मानवी सांगाडा होता. शाळेतल्या मुलांनी तो स्मशानातून आणला अशी भीती घातली होती . प्रयोगवहया ठेवताना एक तर मी नेहमी कोणालातरी सोबत घेऊन जायचे नाहीतर सतत देवाचं नाव घ्यायचे . आता हे सगळं आठवलं की खूप हसायला येतं.
.
शाळा ,शाळेतील शिक्षक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. दहावीला असताना मराठीच्या तासाला येवलेकर बाईं प्रेमस्वरूप आई….. वात्सल्यसिंधू आई…. ही माधव ज्युलियन यांची कविता शिकवत होत्या .कवितेचा अर्थ समजावताना बाईंच्या डोळ्यात पाणी आलं ते पाहून माझ्या डोळ्यात पण पाणी आलं .मला माहित नाही ते का आलं ? कसं आलं ? पण जेव्हा एखाद्याशी भावनिक नातं असतं त्यावेळी त्याचं दुःख आपण पाहू शकत नाही हे खरं .शाळा संपली आणि कॉलेज सुरू झालं. पत्र्याच्या पेटीची जागा काखेतल्या बॅगेने घेतली .माझ्या बॅगेला दोन कप्पे होते. एकामध्ये सुट्टे पैसे ठेवायचे आणि दुसऱ्यात पेन पेन्सिल. ती खूप खूप वापरली ,जुनी झाली तरी टाकावीशी नाही वाटली .पण आतलं कापड फाटलं आणि शेवटी तिला सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला. सगळ्या वस्तू बाहेर काढल्या तरी बॅग जड ती जडच . नंतर कळलं की फाटक्या कप्प्यातून खाली जाऊन बरीच नाणी अडकली होती. सगळी नाणी काढली आणि त्या दिवशी मला १२७ रुपयांची लॉटरी लागली. कॉलेजच्या दिवसात ती खूप मोठी रक्कम होती .तसं म्हटले तर बायकांची पर्स म्हणजे अलिबाबाची गुहाच असते.
.
आयुष्याचा हा टप्पा खूप छान होता. ना कसले दडपण ना कसलं ओझं , फक्त आईबाबांचं ऐकायचं , हट्ट करायचा नाही, आईला मदत करायची , अभ्यास करायचा की झालं आपलं टारगेट अचिव्ह .आयुष्याचं पुस्तक प्रत्येकाचे वेगळं असते. त्यातल्या अनुभवांचा खजिना ही प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यात काही जपून ठेवलेली मोरपीसं असतात…तर काही चॉकलेटच्या चांद्या असतात ….पिंपळाचे सुकलेलं जाळीदार पान असतं ….नाहीतर बालमैत्रिणी चे फोटो. .आईबाबांचा लग्नाचा फोटो असो कि शाळेतला शिक्षकांसोबतचा वर्ग फोटो असो ..प्राथमिक इयत्तेत असतानाचं प्रगती पत्रक असो ..आणि बरंच काही .यादी खूप मोठी आहे.
.
आज मागे वळून पाहताना मी खूप समाधानी आहे .मला मार्गदर्शन करणारे ,सांभाळून घेणारे खूप मिळाले.त्यांचा मला सहवास लाभला .मला खूप जिवाभावाचे मित्र- मैत्रिणीला लाभल्या. मी आज सगळ्यांची खुप आभारी आहे. फक्त एकच म्हणावेसे वाटते की
.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर. ……..