- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
खरंच किती समाधान वाटत आहे! सतत ऊर्जा घेऊन…वयाचा विचार न करता…म्हणजे सर्व गोष्टी एका पाठोपाठ चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून सरकत आहेत. प्रथम माझे रम्य ते बालपण निसर्गरम्य अशा गगनबावडा शेजारील भुईबावडा गावी इयत्ता चौथी पर्यन्त गेल्यामुळे व एकत्र कुटुंबात असल्यामुळे चांगले संस्कार होत होते. परंतु शिक्षणाची आवड असल्यामुळे आईवडिलांचे प्रेम,आपुलकी बाजूला ठेवून, भविष्य घडविण्यासाठी माझे भाऊ मला मुंबईला घेऊन आले.
.
आम्ही मुंबईला उच्चभ्रू वस्तीमध्ये वाळकेश्वरला राहत होतो. बाणगंगा म्युनिसिपल शाळेत माझे सातवी पर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाचा पाया भक्कम झाला. शाळेत संगीत शिक्षक सुप्रसिद्ध रेडिओ स्टार आर.एन. पराडकर सर असल्यामुळे संगीताची आवड निर्माण झाली. आणि ती आवड आजपर्यंत जपते आहे. नंतर इ. आठवी ते अकरावी साठी मी ठाकूरद्वार येथील मराठा मंदिर शाळेत प्रवेश घेतला.
.
हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला माझ्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हायस्कुल च्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेता आला. आंतरशालेय स्पर्धा व अनेक उपक्रमांमध्ये भाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले. त्यामुळे जीवन समृद्ध झाले. असे सर्व सुरळीत सुरू असताना लग्न झाले. सासरी सुद्धा मोठा एकत्र कुटुंब ग्रुप मिळाला. वेळ असल्यामुळे सर्वांच्या आग्रहास्तव परळला एक संस्थेमध्ये क्राफ्ट टीचर डिप्लोमा (सरकारी)पूर्ण केला. नोकरीच्या ऑफर्स होत्या. मुलाला चांगले घडविण्यासाठी मुलुंडला १९७७ मध्ये आलो. शिकविण्याची आवड असल्यामुळे ५वी ते १०वी शिकवण्या (मराठी/हिंदी) घेत होते. नंतर नलिनीबाई पुरंदरे हायस्कुल मध्ये क्राफ्ट टीचर साठी नोकरी होती परंतु मुलांना उच्चशिक्षित करायचे होते. त्यामुळे नोकरी स्वीकारली नाही. दोन्ही मुले स्थिरस्थावर झाल्यानंतर वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठा मंडळ मुलुंड,मुंबई या संस्थेची सभासद झाले. त्यामुळे आजतागायत माझ्या आवडीप्रमाणे माझ्या कलागुणांचा आनंद घेत आहे.
.
कुठल्याही संकटाचा सामना करायचा असेल तर प्रत्येकाने आपले जगणे पहिल्यांदा आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न करायला हवे. हे ज्यांना जमते ती माणसे कायम तरुण व निरोगी राहतात. जगण्यावरचे प्रेम,श्रद्धा निरंतर असू द्या! आपल्यातील ऊर्जा वाहती ठेवा! असे केले तरच ते जगणे आनंदी होईल. आनंदाने जगणे ही देखील कला आहे. कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार. ती कोणालाच चुकणार नाहीत. तेव्हा मागे वळून पाहतांना कृतकृत्य वाटत आहे. ह्यालाच म्हणतात ‘जीवन ऐसें नाव’!