- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
कशी आणि कुठुकन सुरुवात करावी हे कळत नाहीय. मनुष्य जन्माला येतो त्या वेळी नियतीने नशीब ठरविलेले असते असे म्हणतात. पण कसे जगायचं आणि वागायचे हे थोरा मोठ्यांच्या संस्कारातुन घडायचं असते. आजी आजोबा, आई वडील यांचे आशिर्वाद आणि संस्कार मोलाचे असतात. असो! माझा जन्म कोकणात झाला. आम्ही सहा भांवडं. माझा नंबर चार. माझे वडील पोष्ट ऑफीस मध्ये मुंबईत नोकरीला. आई आणि आम्ही भावंडं गावाला. आम्ही सर्व मिळून शेती करायचो. सर्वाच शिक्षण गावी झालेलं. मोठ्या भावाला विस वर्ष झाली आणि तो मुंबई ला येऊन पोलीस मध्ये नोकरीला लागला. २२व्या वर्षी त्याचा विवाह झाला. आणि त्याला पोलीस घर मिळाले. आणि आमचे मुंबई-गाव येणेजाणे सुरू झाले. माझा विवाह १९६६ साली मुंबई मध्ये १८ व्या वर्षी झाला. नवीन वरात मोठ्या दिरभावोजींच्या घरी आय.आय.टी पवईला आली. दिर भावोजींच्या कुटुंबात आमचा नविन संसार सुरु झाला. वर्षभरात मुलगा झाला. घरच्या मंडळीना खुप आनंद झाला.माझे सासुसासरे शेती करायचे.गाव-मुंबई करत पाच वर्ष राहीले.
१९७२ साली भांडुप ला छोटे घर घेतले. त्या नंतर पाच वर्षांनी १९७७ साली मुलुंडच्या महानगरीत राहायला आलो. मुलुंडचं सौंदर्य अप्रतिम. शाळा शिक्षण छान. तिन्ही मुलांचं शिक्षण चांगले झाले. दोन मुले नोकरी निमित्त परदेशी गेली. एक मुलगा त्याच्या कुटुंबासह माझ्या जवळ आहे. मुले सुना नातवंडे प्रेमळ आहेत. मुलानी स्वतः च्या कष्टाच्या पैशानी आम्हा उभयतांना बरेचसे परदेश दाखविले. तिन्ही मुलांची मुलुंड मध्ये घरं आहेत. आम्ही शून्यातून विश्व ऊभे करून पाया रचला. आणि मुलांनी कळस चढवला. अजून सुख म्हणजे काय पाहीजे. मी मात्र ५० वर्षापूर्वी होते तशीच आहे आणि तशीच राहाणार.
मी मुलांच्या संसारात लुडबुड करत नाही. मला मुलगी नाही पण सुना मुली सारख्या आहेत. मी घरात झेपेल ,जमेल ते काम करते. त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि मन शरीर आनंदी राहाते. मी माझे सर्व छंद जोपासते.आणि जीवनात काय पाहिजे! आयुष्यात सुख दुःख ही येत असतात. पण ती मागे टाकून पुढे सरळ वाटेने चालायचं असते. समर्थांनी म्हटले आहे- जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे! हसा, मजा करा, सुख दुःख मागे टाकून आनंदी रहा. यालाच तर जीवन ऐसे नांव म्हणतात. धन्यवाद!