गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर चालत चालत अगदी एका टोकाला आल्यावर खूप दूर आल्याची जाणीव झाली आणि तिथल्या एका दगडावर जरा टेकले. सुर्य समुद्रात गडप होण्याच्या तयारीत होता आणि मला जसा लहानपणी दिसायचा तसाच दिसला. तेव्हा वाटायचं हा पाण्यात जाऊन लपतो आणि सकाळी परत दुसऱ्या दिशेने वर येतो. आज इतक्या वर्षात त्याच्या दिनचर्येत काहीच बदल झालेला नाही. आपण मात्र पार बदलून गेलो.
.
खेडेगावात गेलेलं बालपण आणि शाळेसाठी मुंबईत आल्यावर ते घाबरलेलं, भिरभिरतं, धास्तावलेलं असूनही स्वप्नवत वाटणारं ते सुंदर अल्लड वय. शाळा करता करता एकीकडे स्वयंपाक करण्याची लागलेली खूप आवड. नवीन काहीतरी शिकण्याची उत्सुकता. आई गावाला असताना मुंबईतील वडिलांचा संसार नीट सांभाळायचे, स्वयंपाकही उत्तम करायचे. झालं हे कारण मिळालं आणि अठराव्या वर्षीच एका महिन्याच्या आत ठरवून लग्नही झालं. लग्न होऊन नव्या घरी आले. सासर नावाचं घर. ना इथे कोणी धड ओळखीचं ना कोणाजवळ हितगुज सांगण्यासारखं कोणी अगदी जवळचं! सार्यांशी जुळवून घेता घेता उडणारी तारांबळ, डोळ्यातलं पाणी लपवण्याची सवय, एकीकडे मुलं होत होती त्यांचं करण्यात,वाढदिवस, आजारपण हे करण्यात मी मात्र चांगलीच अडकून पडत होते. स्वतःसाठी वेळ वाट्याला येत नव्हता. मुलांच्या शाळा, अभ्यास सारं अगदी हौसेने आणि आनंदाने पार पाडलं जात होतं.
बघता बघता मुलं मोठी झाली.
.
लग्न होऊन आपापल्या घरी गेली आणि खूप मोठा वाव मिळाला. दिवस जाता जाईना. काय करावं बरं!. मग कुठे महिलामंडळ शोध, कुठे नवीन नवीन मैत्रिणी शोध ,असं सारं सुरू झालं. आणि यातूनच समाजाशी आजूबाजूच्या लोकांशी संबंध येऊ लागले. आता स्वतःसाठी बराच वेळ मिळतो. एक जाणीव मात्र व्हायला लागली की आता पूर्वीप्रमाणे काही हवं नको नाही, कसला हट्ट नाही, कोणाविषयी आतून दाटून येणारे प्रेम नाही , सारं कसं अगदी मोकळं मोकळं! मनात येतं ,त्यावेळी एक वस्तू घेतानाचा आटापिटा, लग्नकार्याच्या निमित्ताने केलेले दाग दागिने , साड्या, घर साजवण्यासाठी घेतलेल्या वस्तू हे खरंच सार गरजेचं होतं का? संसार नावाचा बगीचा सजवण्यात किती वेळ गेला. आत्ता या क्षणाला घरात सारे सुख ओसंडून वाहते आहे. मुलींच्या संसारातल्या गुजगोष्टीं बरोबर येणाऱ्या गोड तक्रारी, फुलपाखराप्रमाणे अवचित आलेली गोड चिमणी नातवंडं. सुखाचा पेला अगदी काठोकाठ भरल्याप्रमाणे वाटतो.
.
पण आजूबाजूला आजारी वृद्ध,एकटी पडलेली माणसं कुठेतरी मन हेलावून टाकतात. माझ्या आयुष्यात देखील खूप चांगल्या व्यक्ती आल्या आणि मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांचा आधार वाटला. आणि मग मनात येतं की आपण जमलं तर समाजासाठी काही करता आलं तर पहावं. कुणाला शब्दाचा-प्रेमाचा आधार द्यावा. निदान सोबत तरी करावी आणि उरलेलं आयुष्य सार्थकी लावावं! आता यातून बाहेर पडायला हवं. गवताच्या पात्यावरील दवबिंदू प्रमाणे अलगद वेगळे झाले पाहिजे. अगदी पानावरून घरंगळून पडलो तरी मातीत रुजण्या एव्हढं मजबूत!
.
बापरे !सूर्य बुडाला होता. आजूबाजूला अंधार दाटून आला होता. मागचं सारं आठवताना डोळ्यांसमोरून एक सुखाची लहानशी लाट येऊन निघून गेल्यासारखं वाटलं!