मागे वळून पाहतांना…! सौ.नागरत्ना सावंत.

आपल्या महिला आघाडीच्या, आताच्या ल़ेखमालेचा विषय  मी वाचला ,आणि हा विषय मनाला खुपच भावला, आवडला. खरंच आपल्या आयुष्यातील गतकाळातील आठवणींचा,सुख दुःखांचा खजिना आज आपल्याला या निमित्ताने मोकळा करायची संधी महिला आघाडीने दिली ,त्याबद्दल धन्यवाद!.
 
हा विषय वाचताच  मी माझ्या आयुष्यात मागे  डोकावून पाहिले,तर जणु काही एखाद्या चलतचित्रा प्रमाणे मी माझ्या बालपणात गेले. माझे बालपण कोकणातील कुडाळ तालुक्यातील खेड्यात गेले. माझे वडील गावातील प्रसिद्ध व्यापारी,शेतकरी. त्यामुळे घरची परिस्थिती व्यवस्थित असल्यामुळे माझे बालपण छान अगदी फुलपाखराप्रमाणे भुर्रकन उडून गेले. अगदी ” रम्य ते बालपण”  घरचे वातावरण अगदी सानेगुरुजींच्या कथेप्रमाणे. आम्ही सात भावंडे. आमच्यातच मज्जा मैत्री ,मस्ती. माझ्या आई वडीलांना शिक्षणाची अतिशय आवड, तसेच मलाही. माझे १०वी पर्यंत चे शिक्षण गावात झाले. त्या नंतर पुढील शिक्षणासाठी मला माझ्या काका काकींजवळ मुंबईला यावे लागले. पदवी पर्यंतचे शिक्षण रामनारायण रुईयामधून पुर्ण केले. त्या नंतर मी नोकरी च्या शोधात होते.
.
लेखी परिक्षा,मुलाखती झाल्या. आता माझी नोकरी सुरू होणार या स्वप्नरंजनात असतानाच , परमेश्र्वराच्या मनात मात्र काही वेगळेच होते. तीन महिन्यात माझा विवाह जमून,मी विवाहित होऊन सासरी आले.हा माझ्या आयुष्यातील पहिला  बदल होय. घरी सासू,सासरे,दिर , नणंदा. मीच मोठी सून असल्यामुळे जबाबदारीही होतीच.वर्षभरात मी बाळाची  आई झाले. मुलाचे संगोपन आणि गृहिणी पदाची धुरा छान सांभाळत होते.आणि माझे नोकरीचे स्वप्न कुठल्याकुठे  विरून गेले होते.मिस्टरांच्या मिलचा संप चालु होता.त्यांनी नोकरी मध्ये बदल केला. पाच वर्षांत दुसरी मुलगी झाली.त्यापूर्वी मी घरी ट्युशन क्लास चालू केले होते.तसेच दोन्ही मुलांचे संगोपन,बालपण, बाललीला यांचा आनंद घेत होते.परंतु माझ्या मनातील नोकरीचे स्वप्न काही जात नव्हते.घरातून माझ्या सासू,सासऱ्यांचा मला छान सपोर्ट होता. मला त्यांची मदत होती.
.
मुलगी दिड वर्षाची झाल्यावर एक दिवस माझे स्वप्न सत्त्यात आले.  I.E.S. मुलुंडच्या शाळेमधून मला मुलाखतीसाठी पत्र आले होते. दुसऱ्या दिवशी माझी मुलाखत झाली. आणि तिसऱ्या दिवशी माझी शिक्षक म्हणून शैक्षणिक कारकीर्द सुरु झाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पाँईट होता. नोकरीमध्ये माझ्यासमोर येणारा प्रत्येक विद्यार्थी आणि पालक एक परमेश्वराचा अंश आहे असे मानून प्रामाणिकपणे नोकरी केली. आणि मी मागे वळून न पाहता यशाची शिखरे गाठत गेले. चौथ्यावर्षी मला मुलुंड रोटरी क्लब चे  आदर्श शिक्षक म्हणून स्मृती चिन्ह,सन्मान पत्र मिळाले. त्या नंतर शाळेतील व शालाबाह्य स्पर्धांची अनेक बक्षिसे मिळाली. तसेच मी माझ्या विध्यार्थ्यांना मिळवून दिली. तसेच मला राज्य स्तरावर निबंध स्पर्धेतील स्मृती चिन्ह व सन्मानपत्र मिळाले.अनेक कार्यक्रमांची, सादरीकरणाची बक्षिसे मिळाली. अशाप्रकारे यशस्वी शैक्षणिक कारकीर्द म्हणून मला  संस्थेचा २०१६- २०१७ आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हा काळ म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळच होता.
.
त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील जबाबदारी नणंदा ,दिर यांची लग्ने,कार्यक्रम व्यवस्थीतरित्या पार पाडले. त्यानंतर सात वर्षापूर्वी माझ्या दोन्ही मुलांची लग्ने करून दिली. मुलगा, सुन,नात पुण्यात राहतात. मुलगी मुंबईत राहते.माझ्या सासू बाईंच्या सहकार्याने माझी नोकरी व घरच्या सर्व जबाबदारी व्यवस्थित पणे पार पाडल्या. त्यांचीही सेवा केली. गेल्या वर्षी त्यांचे निघन झालं.
.
आता आम्ही दोघेही सेवानिवृत्त आहोत. गावी घर बांधले आहे.अधुनमधून गावी जाऊन येऊन असतो. तेथील वातावरणात व आमच्या बागेत रमतो. तसे माझे आयुष्य धकाधकीचे, धावपळीचे गेले. त्यामुळे आता सेवानिवृत्तीच्या या वळणावर निवांत जीवन जगावेसे वाटते.  मला आध्यात्मिक आवड असल्याने मला सकारात्मक विचार आवडतात. अगदी लॉकडाऊनच्या काळातही नियमित योग, प्राणायाम, मेडीटेशन आणि महिला आघाडीच्या कार्यक्रमात सहभागी होत असते.
.
कारण आयुष्याच्या सारीपाटावर तडजोड ही महत्वाची गोष्ट. ती नसेल तर मनस्ताप होतो.संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि परिस्थितीवर  आपले नियंत्रण नसते. तर ते परमेश्वराच्याच हातात असते. अशावेळी सकारात्मक विचार व योग्य वर्तन एव्हढेच आपल्या हातात असते.
.
“*कालाय* *तस्मै* *नमः* “


Leave a Reply