जरा विसावू या वळणावर……..या वळणावर!
.
आज मी वयाच्या सत्तरीच्या जवळ आलेली माझ्या नातवंडांची आजी आहे. मी नातवंडांबराेबर असताना त्यांना बघून मला माझ्या बालपणाच्या गोष्टी आठवतात.
.
माझे बालपण लालबाग मधील इमारतीत गेले. त्यावेळी आम्ही शेजारी मुले मुली एकत्र खेळायचाे, अभ्यास करायचो, तसेच भांडायचो, पण भांडण विसरुन पुन्हा एकत्र यायचाे. सार्वजनिक गणपती बघायला, राणीच्या बागेत आम्ही सर्व एकत्र माेठ्या माणसांबरोबर जायचाे. त्यावेळी आम्हाला खूप मजा यायची. त्यावेळी शेजारी आपले नातेवाईक वाटायचे. शेजारी लग्न असले की, आम्हाला आमच्या घरी लग्न असल्यासारखे वाटून तयारी ला लागायचाे. त्यावेळी शेजारी कोणीही काही गाेडधाेड केले की एकमेकांना द्यायचे. त्यातही आम्हाला खूप आनंद वाटायचा. त्यामुळे आम्हाला दुस-यांना द्यायची, मदत करायची सवय लागली. सगळ्यांची परिस्थिती सारखी असल्यामुळे भेदभाव नव्हता. प्रत्येकाला ४/५ भावंडे असल्यामुळे अभ्यासाची शिकवणी जमत नव्हती. आमच्या शेजारची माेठी मुले – भावंडे आम्हाला अभ्यासात मार्गदर्शन करायचे. भांवडे असल्यामुळे वाटून खायला, प्यायला व चांगल्या गोष्टी शिकलाे. यांत आम्हाला आनंद मिळायचा. आम्ही वयाच्या सहाव्या वर्षी म्युनिसिपल शाळेत पहिलीला प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेत जाण्याआधी आम्हाला खेळायला खूप काळ मिळाला. इयत्ता आठवीपासून परेलच्या शिराेडकर शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम व खेळ असल्यामुळे आम्हाला अभ्यासाबरोबर हा सुद्धा आनंद मजा उपभाेगायला मिळाली. ह्या सगळ्या आठव़णीने आज ही मन आनंदाने बहरुन येते. बालपण देगा देवा- गत स्मृतींना उजाळा द्यावा.
.
शिक्षण संपल्यावर नाेकरी सुरू झाली. तिथे नवीन माणसे , नवीन अनुभव मिळाले. नंतर लग्न झाल्यावर घर व नाेकरी अशी कसरत सुरु झाली. तिच कसरत आज माझ्या मुली करीत आहेत. त्यांच्या कडे बघुन मला माझे दिवस आठवतात.
.
मला माझ्या बालपणी जो आनंद मिळाला ताे आत्ताच्या मुलांना मिळत नाही त्याचे दु:ख हाेतं. आज खेळायच्या वयात त्यांच्यामागे शाळा, अभ्यास व पाळणाघर लागलेले आहे. काहींना भावंडं नसल्यामुळे, आई वडील नाेकरी करीत असल्यामुळें प्रेम मिळत नाही. त्यामुळेे ती हट्टी व चिडचिडी झालीत.
.
तरी आपल्याला जमेल तसे आपण या पिल्लांना आनंदी व समंजस करु.
.
या बाळांनाे या रे या।
लवकर भरभर सारे या।
मजा करा रे मजा मजा।
आज दिवस तुमचा समजा।।