मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन शनिवार दि. १६/०७/२०२२
रांगोळी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात झाली. २५ ते ३० जणांचीच बॅच असेल असे वाटत असताना तब्बल ३७ जणांनी सहभाग घेतला. खूप छान प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात, मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वर भालेराव,सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर आणि सांस्कृतिक निमंत्रक सौ.ऐश्वर्या ब्रीद यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सौ.करुणा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.सौ.माधुरी तळेकर यांनी प्रास्ताविक केले. आणि चहापानानंतर प्रशिक्षणाची सर्व सूत्रं सौ.ऐश्वर्या यांनी घेतली. त्यांच्या मदतीला सौ.करुणा सावंत आणि सौ. सोनल सावंत होत्या. नाव नोंदणीची जबाबदारी सौ.सोनाली कदम आणि सौ.मनीषा साळवी यांनी उत्तमरित्या पार पाडली. या शिबिरासाठी लागणारे ५० किलो रंग आणि ५० किलो रांगोळी बाजारातून आणण्यापासून ते सर्व सामान प्रत्येकी १ किलो पॅकिंग करण्यापासून ऐश्वर्या यांना सौ.रश्मी राणे, गणेश बांडे,परब मामा,भुवड मामा,राजेश,अनिल सितप,पिल्ले मामा यांची खूप मदत झाली. आज पहिल्या दिवशी मंडळाच्या अनेक महिला सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिबिरास भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.रणेशजी शिर्के यांचे मार्गदर्शन,सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ यांचे प्रोत्साहन आणि सांस्कृतिक समिती सदस्य यांचे सहकार्य यांमुळे शिबिर यशस्वी होणारच.
रांगोळी प्रशिक्षण शिबिर पहिला दिवस शनिवार दि.१६/०७/२०२२
************************************************
रांगोळी प्रधिक्षिका सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी प्रशिक्षणाची सर्व सूत्र हाती घेतली. आपल्या संस्कार परंपरेतील रांगोळीचे महत्त्व, संस्कार भारती रांगोळीतील चिन्हांच्या मागील अध्यात्म यांबद्दल माहिती देऊन शिबिरास सुरुवात केली. एकूण १८ चीन्हांपैकी पहिल्या दिवशी ६ चिन्हे(प्रतीके) त्यांची अध्यत्मिक माहिती देत शिकविण्यात आली. रांगोळी ५ बोटांत पकडुन ती जमिनीवर सलग सोडून चिन्हे काढावयास शिकविण्यात आले. वेगवेगळ्या वयोगटातील सर्व शिबिरार्थी, रांगोळी कला अत्यंत मेहनतीने,जिद्दीने आणि आवडीने शिकत होते.
रांगोळी प्रशिक्षण शिबिर(दुसरा दिवस) रविवार दि.१७/०७/२०२२.
************************************************
रांगोळी शिबिराचा आज दुसरा दिवस. पाच बोटांच्या साहाय्याने रांगोळी धरून जमिनीवर सलग सोडून चिन्हांचा सराव करताना मैत्रिणींचे कसब पणाला लागत होते. संस्कार भारती रांगोळी ओणवे उभे राहूनच काढावयाची असल्याने,अचानक शरीराला एवढा त्रास काही जणींना जमेनासा होत होता. तरी उकीडवे बसून,मध्येच उभे राहून,खाली बसून कसरत करत आवडीने सराव करताना पाहून त्यांच्या जिद्दीचे अप्रूप वाटत होते. आज त्यांच्या सरावामध्ये असलेली बऱ्यापैकी सफाई ही खूप कौतुकाची बाब होती. शिबिरात छोट्या ८ वर्षांच्या स्फूर्ती पासून ते साधारण ६५ वर्षांपर्यंतच्या आजीबाई ही सहभागी होत्या. कोणाला गुढगेदुखी,कोणाला कंबरेचा त्रास,कोणाला वाकता येत नाही ….तरी रांगोळीची आवड त्यांना मेहनत घेण्यापासून विचलित करत नव्हती. कोणी ठाणे,घाटकोपर येथून पावसापाण्यातून न कंटाळता येत होत्या.या मैत्रीणीना खरंच मनापासून सलाम सर्वात कौतुक सर्व महिलांमध्ये सहभागी असणारे एकमेव श्री.सतीश राणे यांचे. कोणत्याही प्रकारचे अवघडलेपण न आणता, अगदी जिद्दीनं सराव करत होते.
आता प्रशिक्षणाचा तिसरा दिवस पुढील शनिवारी. मधल्या ५ दिवसांत सरावाचा गृहपाठ देऊन आजचा दुसरा दिवस संपन्न झाला.
रांगोळी प्रशिक्षण शिबिर तिसरा दिवस शनिवार दि.२३/०७/२०२२
************************************************
मागील आठवड्यात शिकवलेल्या चिन्हांचा सराव गृहपाठ प्रामाणिकपणे केल्याचा प्रत्यय आज येत होता. आज बोटांतून रांगोळी नीट सोडता येत होती. रांगोळी सोडताना हातावर बऱ्यापैकी नियंत्रण जमत होते हे लक्षात येतं होते. हात आणि मनगट यांवरील नियंत्रण खूप महत्त्वाचे आणि ते फक्त आणि फक्त सरावानेच येणार हे प्रत्येकीने अनुभवले. आजची पुढची चिन्हे शिकवल्यानंतर, ती लगेच आत्मसात करणे शक्य झाले ते मधल्या ५ दिवसांमध्ये केलेल्या गृहपाठानेच ! आज सर्व चिन्हे शिकवून आणि तांचा सराव घेऊन पूर्ण झाली. शेवटी चिन्हांचा वापर करून गणपती बाप्पा दाखवला आणि प्रत्येकीने आपली कल्पनाशक्ती वापरून बाप्पाची कलाकृती साकारली.
उद्या शेवटचा आणि महत्वाचा दिवस. उद्या सर्व सहभागी प्रथमच संपूर्ण रंगीत रंगावली साकारणार आहेत.
रांगोळी प्रशिक्षण शिबिर अंतिम दिवस रविवार दि.२४/०७/२०२२
********************************
आज सुरुवातीला सर्वांनी चिन्हांचा वापर करून मोर,बाप्पा सारखी स्वतःची कल्पनाशक्ती लावून निरनिराळी सुंदर रांगोळी चित्रे काढली.
फक्त सफेद रांगोळीने संस्कार भारती पूर्ण वर्तुळाकार रांगोळी दाखवल्या नंतर सर्वांनी खरोखरच तोंडात बोटे घालावीत अशा एका पेक्षा एक अप्रतिम रांगोळ्या घातल्या. आता त्यांना रंग कसे घालावेत, त्यावर थेट चिन्हे कशी रेखटावीत यांचे बारकावे दाखवले. आणि पुन्हा एकदा आश्चर्यकारकरित्या अविश्वासनीय कलाकृती साकारल्या गेल्या.आज प्रत्येक सहभागी कलाकाराच्या पुढ्यात त्यांनी स्वतः साकारलेली सुंदर रंगावली आणि त्याखाली त्यांचे ठळक नाव … त्यांना आज मिळालेली नवी ओळख….चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद गगनात मावेनासा होता. रांगोळी साकारणाऱ्या या साक्षात महालक्ष्म्या आणि त्यांच्या रांगोळ्या यांचे दर्शन घेण्यासाठी मंडळातील अनेक प्रेक्षकांनी शिबिरास भेट देऊन कौतुक केले. शिबिराच्या शेवटी, मंडळाचे कार्यकारिणी आणि सांस्कृतीक समिती सदस्य, माहिती तंत्रज्ञान समिती प्रमुख श्री. संतोष सावंत आणि सांस्कृतिक प्रमुख सौ.रश्मी राणे यांनी सर्वांचे कौतुक केले. रांगोळी शिबिर प्रशिक्षिका सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी आभारप्रदर्शन करतांना, मंडळाचे सहकारी कर्मचारी, रांगोळी प्रशिक्षणात मदत करणाऱ्या सहकारी सौ.करुणा सावंत,सौ.सोनल सावंत यांचे आभार मानले. तसेच या शिबिरात भाग घेणारे सर्व सहभागी, पाठींबा देणाऱ्या प्रमुख सौ.रश्मी राणे, महिला प्रमुख सौ.माधुरी तळेकर, संपूर्ण सांस्कृतीक समिती,नेहमीच पाठीवर शाबासकीची थाप देणारे मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशजी शिर्के काका, सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ सदस्य यांच्या सहकार्यामुळेच शिबिर सफळ संपूर्ण संपन्न झाल्याचे सांगितले.