मला आठवतं की मायेच्या कोशात वाढलेलं निर्धास्त बालपण संपलं. एक आईबाबा आणि भावंडांबरोबरचं ते जग आणि आता त्यांच्यापासून दूर असलेलं नवरा आणि सासरच्या माणसासोबतचं दुसरं जग. एका जगात आपली रक्ताची, मायेची, प्रेमाची,हक्काची माणसं, जिथे आपल्यावर निर्हेतुक प्रेम केलं जातं, कुठलाही कृत्रिमपणा नाही, आपल्या चुकांचा बाऊ न करता त्यांना सावरून घेतलं जातं, त्या कोशात आपण किती सुरक्षित असतो नाही?
.
मला आठवतं, आई आम्हा भावंडाना शाळेचा टिफिन द्यायची. आमचं काम फक्त शाळेत जायचं. बाकीचा सगळा भार ती एकटीने पेलायची. आणि बाबा…त्यांच्यावर तर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी. तेव्हा विचार नाही केला कधी त्या दोघांवर असलेल्या भाराचा,त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचा. तयानी मात्र आपल्या मुलांना त्यांच्यापरीने व्यवस्थित सांभाळलं. कधी शाळेची पिकनिक जाणार असेल तर मी हट्ट करायचे की मलाही जायचं आहे. पण बाबा ठाम नकार द्यायचे. पैशांचा प्रश्न होता म्हणून नाही , पण पुढे म्हणायचे की मी तुम्हाला घेऊन जाईन फिरायला. तेव्हा खूप राग यायचा की हे प्रत्येकवेळी नाही म्हणतात. पण चरफड करण्यापलीकडे काही करता यायचं नाही,कारण बंडखोरी करण्याचे संस्कार नव्हते. धाक होता मोठ्यांचा त्यावेळी. मग हुंदका आवरत मैत्रिणींना नाही सांगायचे आणि आपल्या मनाची समजूत काढायची.
.
मला आठवतं, कॉलेज च्या पहिल्या दिवशी सुद्धा माझ्या नकळत ,कॉलेजला मी बरोबर पोहचले की नाही हे पहायला आले.आणि मला हे जेव्हा समजले तेव्हा राग आला की आता मी काय लहान आहे का? पण ते असं का करतात हे समजून घेता आलं नाही. त्यांना काळजी होती पण त्यांच्या मनाची अवस्था समजून घेण्याची क्षमता माझ्यात नव्हती. मलाही त्यांची काळजी नव्हती असं नाही. त्यांना कामावरुन येण्यासाठी उशीर झाला तर दाराच्या फटीतून त्यांच्या येण्याची चाहूल लागते का याची वाट पहायची. ते दिसले की शांत झोप लागायची. अजूनही आठवतात ते दिवस. बाबांचा पगार झाला केक,जिलेबी,बुंदी ठरलेली. किती आनंद मिळायचा यातूनही.
.
असेच दिवस सरले आणि एकदा आयुष्यातील ते वळण आलं. जिथे हे सगळं अंतरवार होतं त्या बाबांना त्यांच्याकडे असेपर्यंत इतकं जपलं, एक दिवसाच्या पिकनिकलाही कधी एकट सोडलं नाही, त्याच मुलीला कायमचं आपल्यापासून दूर पाठवताना, परक्याच्या हाती सोपवतांना, काय वाटलं असेल? तेच बाबा आता मुलीला सांगत होते,बाळा,ही आता तुझी माणसं आहेत. लग्नापर्यंतचे सगळे सोपस्कार शांतपणे पार पाडणारे माझे आईबाबा,मी सासरी आल्यावर ढसाढसा रडले. कारण पहिल्यांदाच असं घडलं होतं की बाबांनी त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून कायमचं दूर,अनोळखी लोकांकडे जाण्याची परवानगी दिली होती. काय अवस्था असेल त्यांच्या मनाची.
.
पण मला हे तेव्हा कळले जेव्हा मी लग्न होऊन दुसऱ्या जगात आले,जिथे एक सून महणून,पत्नी म्हणून संसाराची जबाबदारी अंगावर येऊन पडली. जिथे सगळंच वेगळं होतं. आता स्वतःचा डबा स्वतःच बनवायचा. आधी आपोआप प्रेम,माया मिळायची. इथे ती मिळवण्यासाठी धडपड!!! आणि अशीच मनाची घालमेल सुरू असतांना, माझ्या साथीदाराने माझ्या डोक्यावर आश्वासक हात ठेवला. त्याच्या नजरेत मला जन्मभराची साथ देण्याचे भाव दिसले आणि मी देवाचे आभार मानले!! त्याच्या कुशीत शिरून खूप रडून घेतले. माझ्या मनावरचे ओझे वाहून गेले. आणि संसाराची जबाबदारी पेलण्याचे बळ माझ्यात आले. मी बाबांना लगेच फोन करून सांगितले की काळजी करू नका. तुमचे प्रतिरूप इथेही आहे सतत माझ्या सोबत आणि माझे बाबा निर्धास्त झाले! आपल्या आईवडिलांचे सुख आपल्या सुखातच असते, नाही का! आणि हे मला स्वतः आईच्या भूमिकेत शिरल्यावर समजले. माझी मुलगी पिकनिकला किंवा बाहेर जाते तेव्हा ती सुखरूप घरी येईपर्यंत जीव कासावीस होतो. आता समजते की माझ्या आईबाबांची माझ्याबद्दलची काळजी किती रास्त होती ते.
.
आपण कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासाठी आपण कायम लहानच असतो! त्यांच्या प्रेमाची परतफेड कधीच करू शकत नाही. म्हणूनच देवाकडे सात जन्म हाच जोडीदार मिळावा असं आपण म्हणतो तेव्हा त्याचबरोबर सात जन्मच नाही,तर प्रत्येक जन्मात हेच प्रेमळ आईबाबा मिळावेत अशी प्रार्थना मी देवाकडे करते कारण आपल्या आईवडिलांचा प्रेमळ वरदहस्त आपल्या डोक्यावरती कितीही दूर असले तरी कायमच असतो.
सौ. करुणा सावंत.