‘अनुभव ‘ हा आपला गुरु आहे असं म्हणतात . आता माझच बघा ना ! साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दर वर्षीप्रमाणे आम्ही गणपती गौरीला पुण्याला संध्याकडे (मुलगी) गेलो होतो. विसर्जन झाल्यावर मुलगा आणि सून रजा नसल्यामुळे परत निघाले. प्रीतीच्या (नातं) आग्रहामुळे आम्ही दोघे आणि तेजस (नातू ) यांनी मुक्काम वाढवला. ४ दिवसांनी दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने आम्ही निघालो. गाडीला गर्दी होती पण खिडकी मिळाल्याने तेजस खूष होता.
थोड्या वेळाने गाडीचा वेग मंदावला . आम्हाला वाटलं सिग्नल लागला. पण बराच वेळ गाडी जागची हलली नाही. इतक्यात कोणीतरी सांगत आलं की मालगाडी पुढे रुळावरून घसरली आहे. त्यामुळे गाडी पुढे जाणार नाही. काहीजणांनी लोणावळा स्टेशन जवळ असल्याने रुळावर उडी मारून चालत जाण्याचा निर्णय घेतला. पण आम्हाला ते शक्य नव्हते. थोड्यावेळाने गाडी सुरु झाली व लोणावळा स्टेशनपर्यंत गेली व पुढे जाणार नाही असं सांगितलं. मग आम्ही सगळे खाली उतरलो व जवळच असलेल्या बस स्टॅण्डवर आलो. पण तिथे खूप गर्दी होती.
४-५ जास्तीच्या बस सोडण्यात येतील असं सांगितलं म्हणून आम्ही बसची वाट बघू लागलो. बस येताना दिसली म्हणून पदर खोचून सज्ज झाले तर गूळाच्या ढेपेला मुंगळे चिकटवावे तशी माणस बसमध्ये शिरली व बस सुरु झाली. गर्दी असल्याने ४ बस आल्या तरी आम्हाला त्यात शिरकाव करता आला नाही. जस काही आम्हाला कोणीतरी स्टॅच्यू केल्याप्रमाणे आम्ही एकेच जागी उभे होतो.
तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. अंधार पडू लागला . प्रायव्हेट गाडीवाले पण विचारायला आले ताई घरापर्यंत सोडू का. रात्रीची वेळ, पाऊस आणि अनोळखी माणसे त्यामुळे मनाची द्विधा मनःस्थिती झाली. तेजसही कंटाळला होता रडवेला झाला होता. त्यावेळी मोबाइलचा वापर सर्रास केला जात नव्हता. त्यामुळे फोन बूथ शोधून मुलाला व जावयाला फोन लावला व असं ठरलं कि ती रात्र हॉटेलमध्ये राहायचं व सकाळी मुलगा गाडी घेऊन न्यायला येईल.
मग हॉटेल शोधलं व रूम बुक केली. तर तेजस म्हणाला टीव्ही असलेली रूम घ्या व मला पावभाजी खायची. ते ऐकून आम्हाला हसायलाच आलं व मनावरचा ताण हलका झाला. मग रूम ताब्यात घेतली . पावभाजी खाऊन झोपायची तयारी केली. आजोबाची गोष्ट ऐकत तेजस झोपी गेला. एव्हाना पावसाचा जोर खूप वाढला होता त्यामुळे आम्हाला दोघांना झोप लागली नाही. सकाळ झाली व मुलगा गाडी घेऊन आला . मग निघायची तयारी केली तस तेजस म्हणाला मला ही रूम आवडली आहे आपण इकडेच राहूया . तसे आम्ही तिघे खोखो हसू लागलो व त्याची समजूत काढून मुलुंडच्या प्रवासाला लागलो.
तेव्हापासून कोठेही जायचे असेल किंवा यायचे असेल तर दिवसाच्या गाडीचे आरक्षण करतो. अजूनही जेव्हा आम्ही पुण्याला येतो तेव्हा त्या प्रवासाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
सौ. कल्पना राणे