छत्रपती राजर्षी शाहू महाराज – मानवतेचा दीपस्तंभ

उदय जगन्नाथ कुडतरकर
मुलुंड (पूर्व)
                                                         छत्रपती राजर्षी शाहू महाराज – मानवतेचा दीपस्तंभ
डाॅ. मारोती कसाब यांनी महाराष्ट्र टाईम्स संवाद पुरवणीत लिहिलेल्या “अस्पृश्यता निवारणाची शताब्दी” या लेखातील काही भाग इथे उध्दृत करीत आहे. या लेखात डाॅ. मारोतीरावानी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी, उदारमतवादी, अस्पृश्यनिवारणवादी धोरणांचा गोषवारा घेतला आहे.
.
“कायद्याच्या आधारे भारतातील अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांनी जीवाची व सत्तेची बाजी लावून आपल्या कोल्हापूर संस्थानात कायद्याने अस्पृश्यता बंद केली. राज्यकारभाराची सूत्रे हाती येताच सन 1894 पासूनच राजर्षींनी गोरगरीब, दलित-पीडित जनतेसाठी सत्ता राबवायला सुरुवात केली. 1896 साली कोल्हापूर संस्थानात मोठा दुष्काळ पडला. त्याप्रसंगी त्यांनी स्वतः घोड्यावर बसून, प्रसंगी पायी फिरून, जनतेची दुःखे दूर केली. लोकांच्या अडीअडचणी जाणून प्रत्येकाला मदत करण्याचे धोरण आखले. आई, वडील आणि पोटच्या धाकल्या मुलाचा, प्रिन्स शिवाजीचा आकस्मिक मृत्यू त्यांच्या मनावर आघात करून गेला होता. काही काळ त्यांनी विरक्तीतही घालविला होता. त्यामुळे यापुढे दीन-पतितांचा उध्दार हेच त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते.
.
1901 पासून महाराजांनी कोल्हापुरात विविध जातींच्या मुलांसाठी वसतिगृहे उभारायला प्रारंभ केला. 1906 साली त्यांनी अस्पृश्य मुला-मुलींसाठीही वसतिगृहे उभारली. शाळा काढल्या…” सामान्य रयतेसाठी अखंडपणे झटणार्या या अलौकिक व्यक्तिमत्वाची आज अठ्ठाण्णव्यावी पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीस माझा माझ्या कुंचल्यातून मानाचा मुजरा!!


1 Comment

Leave a Reply