गोष्ट एका मुकीची

सौ. कल्पना राणे.
 
दोन दिवसापूर्वी मुकी गेल्याची बातमी समजली व मनाला चटका लावून गेली. साधारण ५० वर्षांपूर्वी आम्ही मुलुंडला राहायला आलो. शेजारच्या काकूंकडे मोलकरणीची चौकशी केली. दुसर्‍या दिवशी काकू  एका बाईला घेऊन आल्या. तिने कामाला सुरूवात केली.
.
बाईंच नाव दुर्गा सांगण्यात आल. गव्हाळ वर्ण, कपाळावर रुपयाएवढा ठसठशीत कुंकवाचा टिळा, दोन्ही हातात भरपूर हिरव्या बांगड्या, गळ्याबरोबर डोरलं, काष्ट्याची साडी,किरकोळ बांधा अशी काहीशी आठवतेय दुर्गा. पण ती मुकी आणि बहिरी होती ,त्यामुळे तिला सगळे ‘मुकी’ नावानेच संबोधत. तिच्याशी संवाद साधणं खूपच कठिण होत. हातवारे करून तोंडाने अ अ .. करून ती आमच्याशी संवाद साधत असे. हळूहळू मला तिची भाषा अवगत झाली. 
.
मुकीला कुठलेही काम सांगितलं की न कुरकुर करता ती करत असे. दांड्या कमीच मारायची. आजारी असली तर नवरा यायचा सांगायला. मला 3 मुलं. आमचा ५ जणांचा संसार. मुकीची खूप मदत व्हायची. ती घरची सदस्यच झाली होती. 
.
एके दिवशी मुकी आलीच नाही. सलग आठवडा ती आली नाही. निरोपही आला नाही. काळजी वाटायला लागली. शेजारच्या काकूंकडून ती आजारी असल्याचं कळलं. १५ दिवसांनी सकाळीच दारावरची बेल वाजली. दार उघडून बघते तर काय दारात मुकी उभी होती. पण तिचा अवतार बघून मनात धस्स झाल. रिकामं कपाळ, रिकामा गळा आणि रिकामे हात व खूप रडल्यामुळे खोल गेलेले डोळे अशा अवस्थेत समोर उभी होती. क्षणभर मला काय बोलावं समजेना. मी तिला आत घेतलं आणि तीने कामाला सुरूवात केली. तिच्याशी काय व कसं बोलावं, कसं सांत्वन करावं तेच कळेना. पण मी स्वतःला सावरलं. मी चहा टाकला. तिला बसायला सांगितलं. चहा पोटात गेल्यावर तिला चांगलीच तरतरी आली. मी खूणेने विचारलं काय झालं. तसं तिने हात, पाय, पाठ दाखवले. मारल्याचे वळ दिसत होते. दारू पिऊन नवर्‍याने खूप मारलं होतं. तिचे डोळे राग ओकत होते. तिने नावाप्रमाणे दुर्गेचा अवतार धारण केला होता. ‘ माझा नवरा मेला आता माझ्यासाठी ‘ असं ती हातवारे करून म्हणाली.
.
मग मी तिला औषध लावायला दिले. ती निघून गेली पण मला चैन पडेना. शेजारच्या काकू व ४ मैत्रिणी ज्यांच्याकडे  ती काम करायची त्यांना घरी बोलावून घेतलं. आम्ही तिच्या नवर्‍याला बोलवायचं ठरवलं. तसा निरोप पाठवला. २ दिवसानी तो आला. आम्ही त्याला  चांगलंच फैलावर घेतलं. परत असं केलंस तर पोलिसात देऊ असा दम दिला. तसा तो घाबरला. मी परत असं करणार नाही , मुकीची काळजी घेईन , तिचं औषधपाणी करतो असं बोलून तो गेला. 
२ दिवसांनी नेहमीच्या वेळेवर मुकी कामावर आली. कपाळावर मोठं कुंकू , गळ्यात डोरलं व हातात नवीन बांगडया घालून आली होती.  नवर्‍याने औषध लावलं असं खूणेने म्हणाली. त्या दिवशी ती फार खूश होती व मी सुध्दा !


Leave a Reply