*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा- गुंजन सक्सेना*

भारतीय समाजव्यवस्था ही पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृतीची. हळूहळू काळ बदलत आहे. शंभर वर्षांपूर्वी होणारी मुलींची  पाळण्यातली लग्ने बंद पडली. सावित्री बाई फुले यांच्यासारख्या अनेक समाज सेविकांनी स्त्री शिक्षणाला गती दिली, त्यामुळे स्त्री प्रगल्भ झाली. पंडिता रमाबाई,  रमाबाई रानडे यांचे कार्य मोलाचे आहे. ज्या पुरुषाने राजकीय सामाजिक शैक्षणिक कामे केली, अशा प्रत्येक पुरुषामागे या घरातील स्त्रीचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. लक्ष्मीबाई टिळक, येसूबाई सावरकर, कस्तुरबा गांधी अशा अनेक स्त्रियांनी कष्टप्रद जीवन भोगले.
.
आत्ताच्या काळातील अनुताई वाघ, गोदावरी परुळेकर, बाया कर्वे,  ताराबाई मोडक,  गंगुताई पटवर्धन, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ, तळागाळातील लोकांच्या पाठीशी उभे राहणार्‍या मेधा पाटकर, उद्योग क्षेत्रातील सुधा मूर्ती.  संगीतक्षेत्रातील हिराबाई बडोदेकर,  शोभा गुर्टू, प्रभा अत्रे,  किशोरिताई आमोणकर, लता मंगेशकर, आशा भोसले अशा अनेक, नृत्य क्षेत्रातील रोहिणी भाटे, सुचेता भिडे, हेमामालिनी, सीतारादेवी अशा अनेक नृत्यांगना, क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मेरी कोम ,सानिया मिर्झा, सिंधू, पी टी उषा, सायना नेहवाल.
.
अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांनी भारत देशाचे नाव उंचावर नेऊन ठेवले आहे. अनेक लेखिका, उदयोग क्षेत्रात काम करणाऱ्या, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना आपले कुटुंब सांभाळून सर्व गोष्टी करणे कठीण असते तरीही त्या खंबीर पणे लिलया सर्व गोष्टी करतात याचे खुप कौतुक वाटते. आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो.
.
मला नेहमीच धाडसी स्त्रियांबद्दल आकर्षण वाटत आले आहे. त्यामुळे  मला नेहमीच अभिमान वाटणाऱ्या युद्धात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या *”कारगिल गर्ल “* गुंजन सक्सेना चे कौतुक आणि अभिमान वाटतो. 1975 साली लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सक्सेना, यांच्या घरी एका आकाश तारकेने  जन्म घेतला. तिचे नाव गुंजन ठेवले. वडील आर्मी ऑफिसर असल्यामुळे घरात अतिशय शिस्त. मोठा भाऊ अंशुमान सक्सेना हा सुद्धा आर्मी ऑफिसर, घरातील वातावरण हे देश प्रेमाने  भरलेले, परंतु गुंजन चा ओढा आर्मी मध्ये न जाता, एअरफोर्समध्ये जाण्याचा जास्त होता.
.
भरती होण्यासाठी हंसराज कॉलेज दिल्ली येथून  सायन्स ग्रॅज्युएशन चे शिक्षण पूर्ण केले. नंतर पायलट ट्रेनिंग साठी एअरफॉर्स जॉईन करायचे होते. त्यासाठी च्या काही अटी-शर्ती होत्या. त्यानुसार गुंजन ची उंची  कमी पडत होती त्यासाठी तिने कष्ट घेतले. सर्व शारीरिक परीक्षा तिने पार पाडल्या व फिटनेस सर्टिफिकेट मिळवले.अशा रीतीने तिला पायलट ट्रेनिंग साठी एअर फोर्स मध्ये प्रवेश मिळाला. ट्रेनिंग साठी सर्व पुरुष विद्यार्थी होते एकही स्त्री नव्हती. स्त्रियांसाठी वेगळी बाथरूम नाही कपडे बदलण्याची रूम नाही, बोलायला कोणी नाही. पुरुषांची मक्तेदारी असलेले क्षेत्र.कॅन्टीन मध्ये, पार्टीमध्ये सर्व पुरुष वर्ग, त्यांच्या तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा, परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत व सर्व गोष्टींवर मात करत स्वतःचा पायलट ट्रेनिंग चा अभ्यास अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला.
.
गुंजनच्या कामावरील निष्ठेमुळे व शिस्तप्रिय वागणुकीमुळे हळूहळू तिचे पुरुष सहकारी पायलट तिला ओळखू लागले व तिच्याकडे मित्रत्वाने पाहू लागले. १९९९ साली कारगिल मध्ये दुश्मनांच्या हालचाली वाढल्या, शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी युद्धाचे आदेश दिले गेले,  त्यादरम्यान गुंजन चिता हेलिकॅप्टर ची पायलट होती.
.
कारगिल मध्ये घुसखोरीला सुरवात झाली त्यावेळी असे वाटले की ही मुजाहुद्दीनांची छोटी घुसखोरी असेल पण ती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कारगिल प्रश्न गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात आले. डीटीएच कमांडर यांनी पायलट गुंजन सक्सेना व को-पायलट श्रीविद्या राजन यांना विचारले, उड्डाण करायला आपणास काही समस्या नाही ना? दोघी आनंदाने आपल्या कामासाठी सज्ज झाल्या. सैनिकांना सामान पोहोचविणे, शत्रूंची माहिती देणे व जखमी सैनिकांना सुरक्षित परत आणणे. अतिशय धाडसाचे काम होते. पण अंगात देशप्रेमाचे सळसळणारे रक्त त्यामुळे शत्रूशी दोन हात करण्याची तयारी, मग काय अत्युच्च ठिकाणी अडकलेल्या जखमी सैनिकांना सुखरूप आणणे, त्यावेळी शत्रूचे वार चुकवत चुकवत आणण्याचे काम खुप कठीण होते. एकदा तर शत्रूचे एक मिसाईल अगदी जवळून गेलेले आणि चिता चॉपर मध्ये शत्रूशी लढण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. अनेक जखमी सैनिकांना सुखरूप आणण्याचे कार्य गुंजन व विद्या दोघीनींही केले. 
.
भारतीय युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग असणारी पहिली पायलट ही गुंजन सक्सेना होय. त्यावेळी तिचे वय अवघे पंचवीस वर्षाचे होते. तिला “कारगिल गर्ल “चा  किताब मिळाला.  खरेच तिच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आम्ही भारतीय नेहमीच तिचे ऋणी राहू. शासनाने तिला शौर्य पदक देऊन सन्मानित केले. 
.
आता ती ४५ वर्षाची आहे. तिने विंग कमांडर गौतम नारायण-इंडियन एअर फोर्स पायलट यांच्याशी विवाह केला आहे. प्रज्ञा नावाची कन्या त्यांना आहे. ती पण आईसारखीच धाडसी असणार याबद्दल शंका नाही. 
.
अशा भारतीय कर्तृत्ववान धाडसी स्त्री व्यक्तिमत्वाला माझा सलाम! भारतीय मातीत अशाच झाशीच्या राण्या जन्माला येतील आणि शत्रूला नामोहरम करतील यात शंकाच नाही.
.
*भारतमाता की जय! जय हिंद!!*
.
शब्दांकन: सौ.चित्रलेखा शिंदे.


Leave a Reply