*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा – बाल शिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक*

भारतामध्ये कर्तृत्ववान स्त्रिया अनेक आहेत, पण मला भावलेले एक व्यक्तिमत्व  ज्यांनी  देशात बाल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.  बालवाडी वर विविध प्रयोग करणा-या बाल शिक्षण तज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक. 
.
 त्यांच्या कार्याची ओळख आता मी तुम्हाला सांगते. ताराबाईंच्या मते  बालक म्हणजे पृथ्वीवरील देव आहेत. मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास त्यांच्या अगदी लहान वयापासून सुरू होतो. लहान वयातच मेंदूची जास्तीत जास्त वाढ होत असते. अशा वयात जर तुम्ही त्यांना योग्य ज्ञान दिले तर त्यांची पुढची वाटचाल  प्रगतीशील होते.  लहान मुलांना शिक्षण घेणे अवघड व त्रासदायक न वाटता मनोरंजक, हवंहवंस वाटावं यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. त्यांनी जाणले की बाल मनावर केलेले संस्कार आणि त्यांना दिलेले ज्ञान यामुळे त्यांचा बौद्धिक,मानसिक विकास सक्षम होतो. मुलांचा सर्वागीण विकास झाला तरच समाजाचा खरा विकास होतो. म्हणूनच भारतात शिशुविहार म्हणजे गंमत शाळा सुरू केल्या. शिशुविहार, शिशुवर्ग आणि बालवाडी ही त्यांनी भारताला दिलेली देणगी आहे.
.
ताराबाईंचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव केळकर, आईचे नाव उमाबाई. आई-वडील दोघेही बुद्धिमान होते. वडील सुबोध पत्रिका चे संपादक होते व आई स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहासाठी काम करीत असे. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी.ए झाल्या. गुजरात मधील राजकोट मध्ये प्राचार्य पदाची नोकरी सांभाळून त्या अनेक विषयांचा अभ्यास करत होत्या. हे करताना श्री बधेका यांच्या गीता शिक्षण पद्धतीची माहिती त्यांना मिळाली. नोकरी सोडून त्या सहाय्यक म्हणून भावनगरला गेल्या. त्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण  सहाव्या वर्षापासून सुरू होत होते.
.
त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी. त्यासाठी त्यांनी शिक्षण अभ्यासक मारिया मॉंटेसरी यांचे तत्वज्ञान अभ्यासायला सुरुवात केली. भारतीयांची मानसिकतेचा विचार करता त्यात थोडेफार बदल करून १९२६ साली नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना झाली आणि भारतात मॉन्टेसरी शाळांना सुरुवात झाली.
.
खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालवण्याचे ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापले. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आदिवासी परिसरात अंगणवाडी चालवली. पण प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न होता. सहा ते दहा वयोगटातील मुले धान्य पेरणीनंतर पूर्ण दिवस गुरांना रानात  चरायला  नेत. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेला  रानात घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्यास  कुरण शाळा असे नाव दिले. भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरण शाळा ( Medow’s school ) या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतल्या.
.
भारत सरकारने त्यांना शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्याला २६ जानेवारी १९६२ रोजी *पद्मभूषण* हा मानाचा किताब दिला! शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. आज गावोगावी अगदी गल्लोगल्ली मॉन्टेसरी दिसतात.  पालक मुलांना चौथ्या नव्हे अडीच  वर्षापासून शाळेत पाठवतात. याचमुळे पालकांची मानसिकता मुलांच्या शिक्षणाबाबतची  बदलली हे सिद्ध होते आणि ताराबाई मोडक यांच्या कार्याला योग्य न्याय मिळाला असे वाटते. 
.
लहान मुले सगळी हुशार असतात पण तितकीच हट्टी असतात. आज-काल आई-वडिलांकडे वेळेचे बंधन असते. अशावेळी मुलांचे हट्ट कसे हाताळायचे व त्यांचे संगोपन कसे करायचे हे ताराबाईंचे पुस्तक “बालकांचे हट्ट” यात खूप चांगल्या रीतीने सांगितले आहे. ताराबाईंची पुस्तके बालकांचे हट्ट, आमचे घर, बिचारी बालके उपलब्ध झाल्यास जरूर वाचावे. तसेच आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रमंडळी मध्ये जर कोणी चार ते दहा वर्ष वयाची लहान मुले असतील तर त्या पालकांना ही पुस्तके जरूर भेट स्वरूपात द्यावी.
.
 
शब्दांकन:अरुणा दळवी.


Leave a Reply